राज्यात अतीवृष्टीमुळे ४ दिवसांत २०० जणांचा मृत्यू, तर २४ जण घायाळ !
आपत्काळाला आरंभ झाला असल्याने आतातरी साधना करायला हवी, हे लक्षात घ्या !
मुंबई – राज्यात २२ ते २४ जुलै या कालावधीत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येथे झालेल्या अतीवृष्टीतील बळींची संख्या २०० वर पोचली असून अजूनही २५ लोकांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात ४८ जण घायाळ आहेत. दरड कोसळल्याने, तसेच पुरामुळे गेल्या २४ घंट्यांत रायगडमध्ये ३५ लोकांचा मृत्यू झाला असून सातारा येथे ४, तर वर्धा अन् अकोला जिल्ह्यांत प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे.
कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे सांगली जिल्ह्यातील २ लाख ६ सहस्र, तर पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ५० सहस्र लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ येथील काही जिल्ह्यांत झालेल्या अतीवृष्टीमुळे पुष्कळ प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली आहे. रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत पूरपरिस्थिती आता नियंत्रणात आली आहे.
राज्यातील १ सहस्र २८ गावांना महापुराचा फटका बसला असून २ लाख लोक बाधित झाले आहेत, तर २९ सहस्र पशूधनाची हानी झाली आहे. पूरग्रस्त आणि स्थलांतरित लोकांच्या साहाय्यासाठी २५९ ठिकाणी साहाय्य केंद्रे चालू करण्यात आली असून ७ सहस्र ८३२ तात्पुरती निवारा केंद्रे चालू करण्यात आली आहेत.