राज्यातील १६ जिल्ह्यांत १ सहस्र १२९ पाणीपुरवठा योजना बाधित !

४२ कोटी ८८ लाख रुपयांचा व्यय अपेक्षित !

मुंबई – कोकण, पश्चिम महाराष्ट्र, तसेच राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतीवृष्टी आणि महापूर यांमुळे राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये १ सहस्र १२९ पाणीपुरवठा योजना बाधित झाल्या आहेत. बाधित जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून त्यादृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, काही पाणीपुरवठा योजना तातडीने चालू करण्यासाठी विद्युत्जनित्र, ‘क्लोरिनेशन’ करणे, टँकरने पाणीपुरवठा करणे, कूपनलिका आणि पंप यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा जलवाहिनी दुरुस्त करणे इत्यादी गोष्टींसाठी ११ कोटी २२ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनांच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी ३१ कोटी ६५ लाख रुपयांचा व्यय अपेक्षित आहे. अशा प्रकारे एकूण ४२ कोटी ८८ लाख रुपयांचा व्यय या योजनांसाठी लागणार आहे.