चिपळूण येथील ३०० पूरग्रस्त कुटुंबांना ब्राह्मण महासंघाच्या वतीने एका मासाचे ‘किराणा किट’
पुणे, २७ जुलै – अतीवृष्टीमुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हाहाःकार उडाला आहे. पुराने अनेकांचे जीव घेतले, अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. चिपळूण येथील परिस्थितीही भयावह झाली होती; मात्र आता चिपळूण शहरातील पूर ओसरत असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांकडून साहाय्य कार्याला पुन्हा एकदा प्रारंभ झाला आहे. अशा वेळी साहाय्याचे अनेक हात पुढे येत आहेत. ब्राह्मण महासंघही या कार्यात सहभागी होत आहे. ३०० कुटुंबांना एका मासाचे किराणा किट देण्यात येईल. त्यासाठी ५०० किलो गहू, ३०० किलो तांदूळ, २०० किलो पीठ, तेल, तूप नवीन साड्या, ‘ड्रेस’, २०० बाटल्या फिनेल, पाणी अशा १७५ वस्तूंचे मिळून ४ लाख रुपयांचे साहित्य ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुणे येथून विधिवत् पूजा करून वेगळ्या ट्रकने चिपळूणसाठी लवकरच रवाना होईल.