सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतीवृष्टीने हानी झालेले साकव, पूल आणि रस्ते यांची कामे तातडीने पूर्ण करा ! – पालकमंत्री उदय सामंत यांची प्रशासनाला सूचना

अतीवृष्टीमुळे कोसळलेला मल्हार पूल

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – कणकवली तालुक्यातील कनेडी-नाटळ मार्गावर असलेला मल्हार पूल नुकत्याच झालेल्या अतीवृष्टीमुळे कोसळला. पूल तुटल्यामुळे ५ हून अधिक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. या पुलाची पालकमंत्री उदय सामंत आणि शिवसेनेचे नेते यांनी पहाणी केली. या वेळी पालकमंत्री सामंत यांनी ‘या पुलाला पर्यायी साकव उभारा, तसेच अतीवृष्टीमुळे हानी झालेले साकव, पूल आणि रस्ते यांची कामे ताडीने पूर्ण करा’, अशा सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेनेचे नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, संजय पडते, प्रांताधिकारी वैशाली राजमाने आदी उपस्थित होते.

यानंतर पालकमंत्री सामंत यांनी तिलारी प्रकल्प, जिल्ह्यातील पूरस्थिती आणि कोरोनाविषयीची स्थिती या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. या वेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

चिपळूण येथील साहाय्यकार्यात सहभागी झालेल्या मालवण येथील आपत्कालीन गटाचा सत्कार

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आलेल्या महापुराच्या वेळी तेथे साहाय्यासाठी गेलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील ‘मालवण आपत्कालीन ग्रुप’च्या सदस्यांचा या वेळी पालकमंत्री सामंत यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

मल्हार पूल त्वरित बांधण्याची आमदार नीतेश राणे यांची मागणी

कणकवली – तालुक्यातील कनेडी, नाटळ आणि अन्य गावांना जोडणारा मल्हार नदीवरील पूल तातडीने बांधण्यात यावा. त्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.