४ दिवसांनंतर पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग अवजड आणि अत्यावश्यक वाहतुकीसाठी चालू : सांगलीत संथगतीने पुराला उतार

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

कोल्हापूर, २६ जुलै (वार्ता.) – पुराचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्याने पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग ४ दिवसांपासून बंद होता. या रस्त्यावरील पाणी थोडे अल्प झाल्यानंतर हा मार्ग सकाळी ११ वाजता केवळ अवजड आणि अत्यावश्यक वाहतुकीसाठी चालू करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने दूध, इंधन, पाणी, प्राणवायू घेऊन जाणारी वाहने सोडण्यात येत आहेत. कोल्हापुरात पूर परिस्थिती आता निवळण्यास प्रारंभ झाला असून पंचगंगा नदीची पाणी पातळी सायंकाळी ४८ फूट नोंदवण्यात आली. सांगलीत मात्र पुराला संथगतीने उतार असून सायंकाळी कृष्णा नदीची पाणी पातळी ५१ फूट नोंदवण्यात आली. शहरातील मारुति चौक, स्टेशन चौक यांसह अद्याप अनेक उपनगरांमध्ये पाणी आहे.

अन्य घडामोडी

सांगली

१. सांगली शहरात पाणी ओसरण्यास प्रारंभ झाला असून अन्य राज्यांतील नगर परिषद, महापालिकेच्या स्वच्छतेची पथके सांगलीत येणार आहेत, अशी माहिती सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

२. सांगलीत महापालिकेकडून २० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

कोल्हापूर

१. राधानगरी धरणाचे काल स्वयंचलित ४ द्वार उघडले होते. आज त्यातील २ द्वार बंद झाले असून उर्वरित द्वारांद्वारे एकूण ५ सहस्र ६८४ क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीत चालू आहे.

२. महापुराने १ लाख ४५ सहस्र ९३० लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून ५४ सहस्र ९४९ प्राण्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे. पुराने ३५४ गावे अंशत: बाधित असून ३४ गावे पूर्णत: बाधित झाली आहेत.

३. महापुराने ७ व्यक्तींचे निधन झाले असून ६३ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.

४. ४८७ नळ पाणीपुरवठा योजना बंद असून येत्या ७२ घंट्यांत १३८ आणि येत्या ५ दिवसांत उर्वरित योजना चालू करण्यात येणार आहे, असे महावितरणने सांगितले.

५. अपंग व्यक्तींना प्रती व्यक्ती ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.