हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि वाचक यांच्यात धर्मदृष्टी निर्माण होण्यासाठी ‘सनातन प्रभात’चे मोलाचे योगदान ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त वक्त्यांनी व्यक्त केलेले मनोगत आणि हिंदु राष्ट्रविषयक मार्गदर्शन
‘वाचकांनो, मला ‘सनातन प्रभात’चे संपादक, वार्ताहर आणि वितरक यांच्याप्रती आवर्जून कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लोकांपर्यंत ‘सनातन प्रभात’ पोचवण्याचे कार्य केलेले आहे. आज हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि वाचक यांच्यामध्ये ईश्वरदृष्टी, धर्मनिष्ठा, संस्कृतीनिष्ठा आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची ओढ निर्माण झाली असेल, तर त्यात ‘सनातन प्रभात’चे योगदान मोलाचे आहे. हा खारीचा वाटा नव्हे, तर निश्चितपणे सिंहाचा वाटा मानावा लागेल.
१. नास्तिकतावाद्यांकडून हिंदूंच्या सण-उत्सवांवर टीका होत असतांना ‘सनातन प्रभात’मधून हिंदूंना योग्य विचारप्रक्रिया सांगण्याचे कार्य केले जाणे !
नास्तिकतावाद्यांकडून हिंदूंचे सण-उत्सव यांवर अनेक वेळा आरोप केले जातात. या आरोपांचे खंडण करून वाचकांना योग्य दृष्टी देण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे. काही वर्षांपूर्वी नाशिक येथील कुंभमेळ्याच्या वेळी ‘पाणी अल्प असल्याने कुंभमेळा रहित करा आणि पाणी वाचवा’, अशा प्रकारची आवई उठवण्यात आली. त्याच वेळी जळगाव येथे २५ ते ३० लाख मुसलमान एकत्र आले होते. त्यांना ‘वझू’ (इस्लाममधील एक कृती) करण्यासाठी लाखो लिटर पाणी प्रतिदिन दिले जात होते. त्या वेळी कुणी काहीही बोलले नाही. पत्रकारिता अशा प्रकारची एकांगी असू नये. आज लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटल्यानंतर माध्यमांकडून सत्यनिष्ठ आणि योग्य बाजू
मांडली गेली पाहिजे.
आताही कोरोना काळात शिवजयंती असू द्या किंवा महाशिवरात्री असू द्या, हिंदूंनी स्वत:च्या मनाला मुरड घालून सरकारचे अनेक नियम पाळलेले आहेत. असे असतांना ईदसाठी बाजारात होणार्या गर्दीकडे मात्र कुणी लक्ष देत नाही. हिंदु समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य आणि योग्य विचारप्रक्रिया सांगण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे.
२. बंगालमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचारांना ‘सनातन प्रभात’ने वाचा फोडणे !
नुकत्याच झालेल्या बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर तेथे १० सहस्रांहून अधिक हिंदूंच्या हत्या झाल्या आणि अनेक महिलांवर अत्याचार झाले. त्यामुळे लाखो हिंदूंनी बंगालमधून पलायन केले. बंगालमध्ये पूर्वनियोजितपणे केलेला हा कटच म्हणावा लागेल. एवढे होऊनही देशातील वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे यांनी हे आपल्यासमोर परखडपणे मांडण्याचा किती प्रयत्न केला ? अशा वेळी जेव्हा मी ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांकडे पहातो, तेव्हा निश्चितपणे सांगेन की, त्यात या विषयावर अनेक लेख आणि संपादकीय अग्रलेख लिहिले गेले. तसेच या संदर्भात प्रश्न विचारले गेले की, वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये हिंदूंची जी स्थिती झाली, त्याप्रमाणे झालेल्या बंगालच्या स्थितीला उत्तरदायी कोण ? हिंदूंना वाली कोण ? वर्ष १९७१ मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला, तेव्हा सहस्रो हिंदु महिलांवर अत्याचार झाले. आज तीच स्थिती बंगालमध्ये आहे. प्रसारमाध्यमे मूग गिळून गप्प आहेत आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांनी हात वर केले आहेत. तेथील हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु बांधव आधारहीन झाले आहेत. त्या सर्वांना मानसिक किंवा प्रत्यक्ष भेटून आधार देण्याची आवश्यकता आहे. या सर्वांसाठी आवाज उठवण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून होत आहे.
३. कोणत्याही आपद्स्थितीत मंदिरे साहाय्यासाठी पुढे येतात, तशा मशिदी आणि चर्च संस्था पुढे का येत नाहीत ?
सामाजिक माध्यमांमध्ये ‘कोरोनाच्या काळात मंदिरे काय करत आहेत ?’, असा प्रश्न विचारला जात आहे. मला सांगावेसे वाटते की, महाराष्ट्रातील संत गजानन महाराज मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, तुळजापूरचे भवानीदेवी मंदिर, लेण्याद्रीचे श्री गणेश मंदिर आदी सर्वांनी पुढे येऊन त्यांच्या भक्तनिवासात किंवा परिसरात कोविड केंद्रे उभारण्यासह कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आज कुठल्या मशिदी, मदरसे आणि चर्च संस्था यांनी पुढे येऊन आपल्या बांधवांना साहाय्य केले आहे का ?
हिंदु बांधवांना सोडा, त्यांच्या स्वबांधवांना, तरी साहाय्य केले आहे का ? असे प्रश्न विचारण्याचा अधिकार हिंदुत्वनिष्ठांना आहे. या सर्व विषयांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केवळ ‘सनातन प्रभात’ने केला आहे.
४. कोरोना महामारीच्या काळातही ख्रिस्त्यांचे हिंदूंना बाटवण्याचे षड्यंत्र चालूच !
कोरोना महामारीच्या काळात हिंदुत्वनिष्ठांनी सर्वांना निःस्वार्थपणे साहाय्य करण्याचा प्रयत्न केला; परंतु ख्रिस्त्यांनी अव्याहतपणे हिंदूंचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र चालूच ठेवलेले आहे. ख्रिस्ती संघटना ‘अनफोल्डींग वर्ल्ड’च्या मुख्याधिकार्यांनी नुकतेच सांगितले, ‘‘आम्ही २५ वर्षांत भारतात जे धर्मांतर करू शकलो नाही, ते या कोरोना महामारीच्या दीड वर्षात केले. भारतातील ५० सहस्र गावांमध्ये पोचून १ लाख हिंदूंचे धर्मांतर केले.’’ ही धोक्याची घंटा आहे. देशात कुठेही आपत्कालीन स्थिती निर्माण झाली की, जनतेच्या साहाय्यासाठी मंदिरे सरसावतात; पण ख्रिस्ती त्यांचा डाव साधत असतात. आज देशात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे मोठ्या प्रमाणात तुष्टीकरण करण्यात येते. त्यांच्यासाठी मंत्रालये, कायदे, शैक्षणिक संस्था आणि विविध अधिकार निर्माण करण्यात येतात. दुसरीकडे हिंदू ९ राज्यांमध्ये अल्पसंख्यांक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी पंजाबमधील मलेरकोट नावाचा जिल्हा मुसलमानबहुल घोषित करण्यात आला. त्यानंतर तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह सांगतात, ‘‘ईदनिमित्त मुसलमान बांधवांना ही भेट आहे !’’ या देशात मुसलमानबहुल भाग झाल्यावर त्यांना अख्खा जिल्हा भेट म्हणून दिला जात असेल, तर मग या देशात हिंदू बहुसंख्य असतांना त्याला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी विरोध का केला जातो ? या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्याची वेळ आलेली आहे. या सर्व गोष्टी ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवण्याचे कार्य केले जात आहे.
५. हिंदूंच्या देवता, संस्कृती आणि राष्ट्रपुरुष यांच्या अवमानाला वैध मार्गाने विरोध कसा करावा ? याची दिशा ‘सनातन प्रभात’मधून मिळते !
आज विविध व्यासपिठांवरून हिंदु देवतांची विटंबना, राष्ट्रपुरुषांचा अवमान होत असतो. हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचे कार्य चालू असते. या सर्वांना धर्मशिक्षित हिंदूंनी वैध मार्गाने विरोध कसा करावा ? तसेच बुद्धीभेद करणार्यांचे परखडपणे खंडण कसे करावे ? हे ‘सनातन प्रभात’मधून शिकायला मिळते. फ्रान्समधील ‘शार्ली हेब्दो’ या नियतकालिकाने पूर्वी महंमद पैगंबर यांची विटंबना केली होती. आता ‘शार्ली हेब्दो’ने, ‘भारतात ऑक्सिजनचा तुटवडा असतांना हिंदूंच्या ३ कोटी ३३ लाख देवता काय करत आहेत ?’, असा प्रश्न विचारला. ‘शार्ली हेब्दो’ला ‘हिंदु धर्मात ३३ कोटी देवता आहेत’, हेही ठाऊक नाही. या अवमानाविषयी ‘सनातन प्रभात’च्या मुख्य पानावर ठळकपणे बातमी प्रसिद्ध करण्यात आली आणि त्या बातमीतून ‘आकाशातील बाप तुम्हाला साहाय्य करील’, असे चर्चमधून सांगितले जाते, तर ‘शार्ली हेब्दो आताच्या स्थितीवरून त्यावर प्रश्न का विचारत नाही ?’, असा प्रश्न कुणी उपस्थित केला, तर त्यावर शार्ली हेब्दो काय उत्तर देणार आहे ?’, असे विचारण्याचे काम केले.
गोव्यामध्ये एका ख्रिस्ती पाद्र्याने वक्तव्य केले होते, ‘छत्रपती शिवाजी महाराज गोव्यावर आक्रमण करण्यासाठी आले असता ख्रिस्त्यांनी सेंट झेविअरला प्रार्थना केल्यावर छत्रपती शिवराय परत गेले.’ अशा प्रकारे छत्रपती शिवरायांचा अवमान गोव्यात केला गेला. अशा गोष्टींचा वैध मार्गाने विरोध करण्याची दिशा ‘सनातन प्रभात’ या नियतकालिकांमधून मिळते. आज गोव्यासारख्या ठिकाणी ‘पाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या धर्मांधांच्या संघटनेचे कार्यक्रम होतात. अशा आघातांनाही ‘सनातन प्रभात’च्या गोवा-सिंधुदुर्ग आवृत्तीच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे कार्य केले जाते.
६. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी इस्रायलचा आदर्श घेऊन पुढे गेले पाहिजे !
एकूण सर्व गोष्टी पहाता हिंदुत्वनिष्ठ, धर्मनिष्ठ आणि देशभरातील प्रत्येक नागरिक यांच्यामध्ये एक राष्ट्रनिष्ठा निर्माण झाली पाहिजे. भारतानंतर स्वतंत्र झालेल्या इस्रायलच्या प्रत्येक नागरिकामध्ये राष्ट्रनिष्ठा आहे. आज सर्व बाजूंनी इस्लामी राष्ट्रांनी वेढलेल्या आणि केवळ ९० लाख लोकसंख्या असलेल्या इस्रायलने १४५ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या इस्लामी राष्ट्रांना प्रत्युत्तर देण्याची कडवी भूमिका घेतली आहे. या राष्ट्रनिष्ठ भूमिकेचे नेहमी स्वागतच केले जाते. हा आदर्श ठेवून आपण पुढे गेलो, तर निश्चितपणे देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेविषयीची परखड भूमिका आणि हिंदु राष्ट्राची भूमिका आपल्याला मांडता येईल. इस्रायलचा आदर्श घेऊनच हिंदु राष्ट्राच्या दृष्टीकोनातून पुढे गेले पाहिजे आणि हा आदर्श मांडण्याचे कार्य या ठिकाणी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
७. हिंदुत्वनिष्ठांना आवाहन !
अनेक वर्षांपासून ‘सनातन प्रभात’शी विज्ञापनदाते, हिंदुत्वनिष्ठ, जिज्ञासू, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी जोडले गेलेले आहेत, त्याविषयी आम्ही सर्वांप्रती कृतज्ञ आहोत. हिंदु राष्ट्राचे कार्य करतांना ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार नसाल, तर वर्गणीदार व्हा आणि इतरांनाही होण्यास सांगा. राष्ट्र-धर्माच्या कार्यासाठी अव्याहतपणे कृतीशील असणार्या ‘सनातन प्रभात’साठी तन-मन-धनाने प्रत्येकाने योगदान द्यावे, अशी मी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो, तसेच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत योगदान देण्यासाठी सर्वांना भक्ती, शक्ती, बुद्धी आणि बळ द्यावे’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो.
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हिंदूंना दिशा देणारे ‘सनातन प्रभात’ नियतकालिक चालू केले !
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी २२ वर्षांपूर्वी दूरदृष्टीने ‘सनातन प्रभात’ हे नियतकालिक चालू केले. त्या वेळी देशभर काँग्रेसची सत्ता होती. धर्मांधांचा उद्दामपणा वाढलेला होता आणि हिंदुत्वनिष्ठांमध्ये एक मरगळ होती, तसेच ‘लव्ह जिहाद’, मंदिरांचे सरकारीकरण अन् धर्मांतर असे अनेक आघात हिंदूंवर होत होते. अशा परिस्थितीत त्यांनी सर्वांना दिशा देणारे, त्यांच्यात ऊर्जा निर्माण करणारे आणि त्यांना बळ देणारे ‘सनातन प्रभात’ हे नियतकालिक चालू केले. आज आपण पहात आहोत की, त्यांच्या या दूरदृष्टीचा किती प्रचंड प्रमाणात लाभ झालेला आहे आणि अविरतपणे होत आहे.
‘सनातन प्रभात’विषयी हिंदुत्वनिष्ठांच्या मनात कृतज्ञता !आज लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आधारहीन झाल्यासारखी स्थिती आहे. फार थोडी वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या लोकांपर्यंत खरी बाजू पोचवण्याचे कार्य करत आहेत. या सर्वांमध्ये अग्रकमाने उल्लेख करता येईल, तो म्हणजे ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचा ! जेव्हा माझी हिंदुत्वनिष्ठांशी चर्चा होते, तेव्हा अनेक जण कृतज्ञतापूर्वक सांगतात की, ‘सनातन प्रभात’मुळे या गोष्टी परखडपणे आमच्या समोर येतात. त्यामुळे आमच्यामध्ये एक दृष्टी निर्माण झाली आहे.’ |
मरकज आणि कुंभमेळा यांची तुलना करणार्या तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांनी वस्तूस्थिती समजून घ्यावी !
श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘मागील २ मासांमध्ये काही तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांकडून एक आवई उठवण्याचा प्रयत्न करण्यात आला, ‘कोरोनाची पहिली लाट देहलीच्या मरकजमधून संपूर्ण देशभर पसरली, तशी दुसरी लाट ही हरिद्वार येथील हिंदूंच्या कुंभमेळ्यामधून पसरली.’ सर्वप्रथम कुंभमेळा आणि मरकज यांची तुलनाच होऊ शकत नाही. ‘मरकजच्या माध्यमातून संपूर्ण देशभर कोरोना पसरवला गेला’, असा आरोप सर्वांकडून झाला. मरकजचे प्रमुख मौलाना साद या गोष्टीसाठी संपूर्णपणे कारणीभूत असतांना त्याने माफी मागितली नाही. पोलिसांना तो कार्यक्रम बंद पाडावा लागला. या मरकजवाल्या कोरोनाबाधितांकडून अनेक महिलांशी गैरवर्तन करण्यात आले. या सर्व गोष्टी कुठे आणि हरिद्वारचा कुंभमेळा कुठे ? सरकारने अनुमती दिल्यानंतरच कुंभमेळा चालू झाला. येणार्या प्रत्येक भाविकाची ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी करण्यात आली. त्यानंतर कुंभमेळ्याच्या प्रवेशद्वारावर कोरोनाविषयक सर्व गोष्टी पडताळल्यानंतरच भाविकांना कुंभमेळ्यामध्ये सहभागी होता आले. तेथे सर्व साधू-संतांनी लोकांमध्ये कोरोनाविषयी जागृती करण्याचा प्रयत्न केला.’’