पंडित नेहरू यांच्या ‘शांतीदूत’ धोरणामुळे देश कमकुवत बनला ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई – मी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आदर करतो. त्यांना वाटायचे, ‘शांतीदूत बनावे, तसेच कबुतरे उडवावीत.’ कदाचित् हा त्यांचा कमकुवतपणा होता. त्यांच्या या धोरणामुळे देश कमकुवत बनला, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. कारगिल विजयदिवसाच्या निमित्ताने २६ जुलै या दिवशी राजभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार मंगलप्रभात लोढा यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

कोश्यारी पुढे म्हणाले, ‘‘वर्ष १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी अणुबॉम्बची चाचणी केली. तो अणुबॉम्ब २० वर्षांपासून तसाच ठेवण्यात आला होता. सरकार घाबरायचे; पण वाजपेयी यांनी ही चाचणी घडवून आणली. जगाने आपल्यावर निर्बंध आणले; पण अटलजी यांचा आपल्या देशातील नागरिकांवर विश्वास होता. आपल्याला देशात शांततेचे वातावरण हवे आहे. आपण कुणालाही शत्रू मानत नाही परंतु आपल्या देशाला मात्र चारही बाजूंनी शत्रूंनी घेरले आहे. लडाखमध्ये सद्यःस्थितीत ४ विमानतळे उभी रहात आहेत. सीमेवर हे आवश्यक आहे. हे इतकी वर्षे झाले नाही; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे.’’