उतारवयातही तळमळीने सेवा करणार्या आणि प.पू. गुरुदेवांप्रती भाव असणार्या पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) जगूबाई गोविंद पद्मन (वय ८७ वर्षे)!
श्रीमती जगूबाई गोविंद पद्मन (वय ८७ वर्षे) यांचे ९.७.२०२० या दिवशी निधन झाले. २७.७.२०२१ या दिवशी त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सौ. रेखा कुरकुटे (मुलगी), कोथरूड, पुणे.
१. कष्टप्रद जीवन
‘लहानपणापासून माझ्या आईचे आयुष्य कष्टात गेले. आई लहान असतांनाच तिच्या आई-वडिलांचे छत्र हरपले. तिने सावत्र दीर आणि नणंदा यांची सेवा स्वतःच्या मुलांप्रमाणे केली. त्या काळात आई पहाटे ३ वाजता उठून जात्यावर धान्य दळून स्वयंपाक करत असे आणि सर्वांना आनंदाने खाऊ-पिऊ घालत असे.
२. काटकसरी
ती ‘स्वतःचे आणि मुलांचे कपडे घरीच हाताने शिवणे, तिखट कुटणे, पितळ्याच्या भांड्यांना स्वतः कल्हई करणे, किराणा माल आल्यानंतर त्यातील सामानाच्या पुड्यांना बांधलेले दोरे नीट ठेवणे आणि नंतर ते वापरणे, कागद नीट सांभाळून ठेवणे’, असे करत असे.
३. नीटनेटकेपणा
ती प्रतिदिन कपड्यांच्या घड्या इस्त्री केल्याप्रमाणे घालत असे. ती कपाटात कपडे व्यवस्थित आणि नीटनेटके ठेवत असे. ती अंथरुणावर झोपलेली असतांनाही चादरीला सुरकुती पडू देत नसे.
४. भजनांची आवड
तिला भजनांची पुष्कळ आवड होती. तिला चालायला त्रास होत असूनही सप्ताहातून २ वेळा ती दूर अंतरावर असलेल्या मंदिरात जाऊन भजने म्हणायची.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव
२५.८.२०१८ या दिवशी तिला अर्धांगवायूचा सौम्य झटका आला. तेव्हाही तिला परम पूज्यांचा विसर पडला नाही. ‘माझ्याकडे जे आहे, ते सर्व (पैसे आणि अलंकार) परम पूज्यांना दे’, असे तिने मला सांगितले. त्या वेळी ती आनंदी होती. ती ‘माझे परम पूज्य, माझे परम पूज्य’, असे म्हणत आनंदाने टाळ्या वाजवत होती. ती ‘मला परम पूज्य दिसले आणि ते ‘तुम्हाला चांगले मरण येणार’, असे म्हणाले’, असे सांगत होती.
श्रीमती भारती पद्मन (सून), हडपसर, पुणे.
१. साधना
‘सासूबाई गेल्या २० वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होत्या. त्या प्रतिदिन ३ – ४ घंटे नामस्मरण करायच्या. त्यांची प.पू. गुरुदेवांवर पुष्कळ श्रद्धा होती.
२. सेवाभाव
अ. घरी संत किंवा साधक आल्यावर सासूबाई त्यांची सेवा तळमळीने करत असत. त्या साधकांसाठी स्वयंपाक करण्याची सेवा मनापासून करत असत.
आ. त्यांना संधिवाताचा पुष्कळ त्रास होता, तरीही वयाच्या ७७ – ७८ व्या वर्षापर्यंत त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या वितरणाची सेवा केली. त्या जिज्ञासूंना दैनिक ‘सनातन प्रभात’ची माहिती भावपूर्णरित्या सांगायच्या. त्यामुळे जिज्ञासू त्यांच्याकडून दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि सात्त्विक उत्पादने घ्यायचे.
इ. त्या गुरुपौर्णिमेच्या सेवांमध्येही सहभागी व्हायच्या. त्या कार्यक्रमाच्या वेळी प.पू. गुरुदेवांच्या प्रतिमेसाठी फुलांचा हार बनवण्याची सेवा भावपूर्णरित्या करायच्या.
३. सुनेला सेवेला जाण्यास सहकार्य करणे
मला सेवेला जायचे असल्यास त्यांचे मला पुष्कळ सहकार्य असायचे. त्यांनी मला सेवेला जातांना कधीही विरोध केला नाही. त्या मला ‘तू सेवेला बाहेर गेल्यानंतर घरातील सेवा करतांना मला आनंद मिळतो’, असे म्हणत.
४. परिस्थिती स्वीकारणे
त्या रुग्णाईत असतांनाही आनंदी असायच्या. त्यांना पुष्कळ त्रास होत असूनही त्यांनी कधीही गार्हाणे केले नाही. त्या २ वेळा पलंगावरून खाली पडल्यावर त्यांना थोडे लागले होते; पण त्यांनी त्याचा कधी बाऊ केला नाही. ‘माझे भोग आहेत. ते मला संपवायचे आहेत’, असे त्या सांगायच्या.
५. आमच्यात आध्यात्मिक मैत्रीचे नाते होते. आम्ही आमच्याकडून झालेल्या चुका एकमेकींना सांगून त्या स्वीकारायचो आणि क्षमायाचना करायचो.
६. कृतज्ञताभाव
त्या मला नेहमी म्हणायच्या, ‘‘तुझ्यामुळे मला साधना शिकायला मिळाली.’’ त्यांचा हा कृतज्ञताभाव सतत जागृत असायचा.
७. सासूबाईंच्या मृत्यूनंतर आलेली अनुभूती
सासूबाईंचे देहावसान झाल्यानंतर मला घरात पुष्कळ चैतन्य जाणवत होते. ‘त्यांच्यासारखा सेवाभाव आणि भक्ती माझ्यात यावी’, अशी मी श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना करते.’ (जुलै २०२१)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |