पुष्कळ पाऊस पडल्याने धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करूनही त्याचा परिणाम झाला नाही ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांकडून सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची पहाणी

सांगली – कोयना धरणातून पाणी न्यून सोडले; मात्र धरणाच्या बाहेर पुष्कळ प्रमाणात पाऊस पडल्याने धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करूनही त्याचा विशेष परिणाम झाला नाही, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह येथील स्टेशन चौकातील पूरस्थितीची पहाणी करतांना ते बोलत होते. या वेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस यांनी त्यांना नकाशाद्वारे परिस्थितीची माहिती दिली. अजित पवार यांनी पलूस येथून त्यांच्या दौर्‍याला प्रारंभ केला. त्यानंतर सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन त्यांनी सांगली शहरातील महापुराची पहाणी केली.