आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही मुंबईमधील ३ लोकप्रतिनिधी घेत आहेत नगरसेवकपदाचेही मानधन !
जनतेच्या पैशाचा अपव्यय करणारे राजकारणी स्वत:च्या खिशातील पैशांचा असा अपव्यय होऊ देतील का ?
मुंबई – आमदार किंवा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पूर्वीच्या नगरसेवकपदाचे त्यागपत्र देऊन त्यासाठी मिळणारे मानधन न घेणे, हे नैतिकदृष्ट्या अपेक्षित आहे; मात्र मुंबईतील ३ लोकप्रतिनिधी आमदार आणि खासदार म्हणून निवडून आल्यानंतर संबंधित सभागृहासह नगरसेवकपदासाठी मुंबई महानगरपालिकेकडून प्रतिमास मिळणारे २५ सहस्र रुपये इतके मानधन आणि सभेसाठी मिळणारा १५० रुपये इतका भत्ताही घेत आहेत. यामध्ये भाजपचे आमदार पराग शहा, शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे आणि समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांचा समावेश आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेकडे मागितलेल्या माहितीतून हा प्रकार उघड झाला आहे.
भाजपचे खासदार मनोज कोटक आणि शिवसेनेचे आमदार रमेश कोरगावकर हे महानगरपालिकेकडून मानधन किंवा भत्ता घेत नाहीत. नगरसेवकपदावरून विधानसभा किंवा लोकसभा यांची निवडणूक लढवल्यानंतर तेथे निवडून आल्यानंतर त्यांच्या पक्षाने खरेतर त्यांच्या नगरसेवकपदाचे त्यागपत्र घेणे अपेक्षित आहे. पक्षाचे जरी त्यागपत्र घेतले नाही, तरी आमदार किंवा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधीला विधानसभा किंवा लोकसभा यांचे सदस्य म्हणून मानधन प्राप्त होत असते, तसेच आमदार किंवा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ते लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून कार्यरत नसतात. त्यामुळे नगरसेवकपदासाठी मिळणारे मानधन खरेतर या लोकप्रतिनिधींनी नाकारणे अपेक्षित आहे. तसे न करता दोन्ही सभागृहांचे मानधन स्वीकारणे ही एकप्रकारे प्रशासनाची फसवणूकच आहे. नगरसेवक असलेले प्रतिनिधी राज्य किंवा देश पातळीवरील पुढील सभागृहात लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेल्यास महानगरपालिका किंवा अन्य प्रशासकीय यंत्रणा यांच्याकडून संबंधित लोकप्रतिनिधीला दिले जाणारे मानधन रहित करण्याविषयी खरेतर सरकारने नियमावली घोषित करणे अपेक्षित आहे. (प्रशासनात काम करणारे अधिकारी किंवा सत्ताधारी यांनी असे प्रकार चालू ठेवणे म्हणजे जनतेच्या पैशाच्या अपव्ययाशी काही देणे-घेणे नसल्याचे उदाहरण होय. अशा प्रकारे स्वत:च्या खिशातील पैशाचा अपव्यय अधिकारी आणि सत्ताधारी होऊ देतील का ? कुठे जनतेच्या भाजीच्या देठाचीही हानी होऊ न देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि कुठे जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणारे सध्याचे राजकारणी ! – संपादक)