खुनी काँग्रेसला शिक्षा हवी !
देशात आणि विदेशात अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती आहे. महाराष्ट्र आणि शेजारील गोवा राज्यातही अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेकांचा बळी गेला आहे, तर शेकडो लोक बेघर झाले आहेत. त्यावर देशभरात चर्चा चालू आहे. हे संकट मोठे आहे. त्याच वेळेला एका विषयावरही चर्चा होणे आवश्यक आहे आणि तो म्हणजे म. गांधी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात झालेल्या ब्राह्मणांच्या हत्या होय ! प्रसिद्ध लेखक आणि इतिहासकार विक्रम संपत यांनी प्रसिद्ध इंग्रजी वृत्तवाहिनी ‘टाइम्स नाऊ’वर पत्रकार नाविका कुमार यांच्याशी केलेल्या चर्चेच्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी, तसेच म. गांधी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात घडवण्यात आलेल्या ब्राह्मणविरोधी दंगली यांची माहिती दिली.
हे सूत्र सध्याच्या पिढीला किंवा मागील १-२ पिढ्यांनाही नीटसे ठाऊक नाही; कारण त्या वेळच्या सत्ताधारी काँग्रेसवाल्यांनी हे सूत्र जाणीवपूर्वक दडपले; कारण या दंगली काँग्रेसवाले आणि ब्राह्मणविरोधी संघटना यांनी घडवल्या होत्या. या दंगलीमध्ये २ ते ५ सहस्र ब्राह्मणांच्या हत्या करण्यात आल्या, तर २० सहस्र दुकाने आणि घरे जाळण्यात आल्याचा आरोप विक्रम संपत यांनी या वेळी केला. ‘मृतांची संख्या ८ सहस्रही असू शकते’, असा दावाही त्यांनी केला. ‘पुरोगामी’ म्हटल्या जाणार्या, तसेच शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशी घटना घडली होती, हे लक्षात घ्यायला हवे. आता हे सूत्र पुढे आले आहे. त्यामुळे यावर चर्चा होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाला काँग्रेसवाले आणि ब्राह्मणविरोधी संघटना यांनी केवढा मोठा कलंक लावला आहे, हे जगाला कळले पाहिजे.
‘शिळ्या कढीला ऊत आणण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे समाजात अशांतता आणि कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होईल’, अशा प्रकारची विधाने केली जातील; मात्र हा शुद्ध ढोंगीपणाच असेल. ज्या वेळी या दंगली झाल्या, त्या वेळी ‘अशांतता कुणी निर्माण केली ?’ ‘कायदा आणि सुव्यवस्था कुणी बिघडवली ?’ याची चर्चा तर झालीच पाहिजे. याला दोषी असणार्यांची नावे, त्यांच्या संघटना याही जगासमोर आल्या पाहिजेत. ५ सहस्र लोकांची हत्या करणे, २० सहस्र घरे आणि दुकाने जाळणे ही लहान घटना नाही. सध्याच्या पुराची हानी पहाता ही हानी त्याहून अधिक आहे, हे लक्षात घ्यायला हवे. वर्ष १९८४ मध्ये काँग्रेसवाल्यांनी देहलीमध्ये साडेतीन सहस्र शिखांची हत्या केल्याचा आरोप आहे. ‘काँग्रेसवाल्यांनी केलेल्या ब्राह्मणांच्या हत्याकांडाविषयी देशात चर्चा होऊन याची चौकशी केंद्रातील भाजप सरकारने करून संपूर्ण घटनाक्रम जगासमोर ठेवावा’, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते. गांधी यांची हत्या चित्पावन ब्राह्मण असणारे पंडित नथुराम गोडसे यांनी केल्यामुळे आणि ते महाराष्ट्रातील असल्याने जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील ब्राह्मणांना लक्ष्य करण्यात आले. इंदिरा गांधी यांची हत्या शिखांनी केल्याने शिखांना लक्ष्य करण्यात आले होते. निधर्मी भारतात आणि लोकशाहीप्रधान देशात अशा घटना घडल्या होत्या, हा देशाला लागलेला मोठा कलंक आहे.
पुरो(अधो)गामी गप्प का ?
या दंगलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू नारायण सावरकर यांची हत्या करण्यात आली. एकूणच या दंगलीमध्ये इतक्या हत्या आणि जाळपोळ होऊनही कुणावरही गुन्हा नोंदवण्यात आला नाही कि कुणाला अटक करण्यात आली नाही. यावरून हे किती मोठे षड्यंत्र होते, हे लक्षात येते. हिटलर, स्टॅलिन, मुसोलिनी यांनाच नाही, तर चीनच्या माओ यालाही लाजवणारे हे कृत्य होते; कारण या सर्व हुकूमशहांनी केलेली हत्याकांडे जगाला ठाऊक आहेत; मात्र महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या हत्यांच्या घटना दडपूनच टाकण्यात आल्या, हे लक्षात घ्यायला हवे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत झालेल्या २-३ पुरोगाम्यांच्या हत्यांवरून निरपराध सनातनवर तुटून पडणारे, तिच्यावर बंदीची मागणी करणारे या ५ सहस्र हत्यांविषयी, नारायण सावरकर यांच्या हत्येविषयी कधीच का बोलले नाहीत, असे प्रश्न उपस्थित होतात. आताही ते याविषयी बोलणार नाहीत का ? महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणद्वेषी लोकांचा आणि संघटनांचा मोठा भरणा आहे. त्यांना काँग्रेसच्या काळात सरकारी सन्मानही मिळत होता. अशांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड ब्राह्मणद्वेषी असणारे वैचारिक प्रदूषण निर्माण केले आहे. याचा कुणी प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला ‘सनातनी’ म्हणून हिणवण्यात येते. ‘पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा पेशवाई आणण्याचा प्रयत्न केला जात आहे’, अशा प्रकारची आरोळी ठोकली जाते. ज्या पेशव्यांनी अटकेपार झेंडे रोवले, देहलीवर मराठ्यांची सत्ता स्थापन केली, त्यांचा सन्मान करण्याऐवजी त्यांच्यावर शिंतोडे उडवण्याची प्रथा या ब्राह्मणद्वेष्ट्यांनी निर्माण केली आहे.
वृत्तपत्रांनी पुढाकार घ्यावा !
तत्कालीन काँग्रेस सरकारच्या दबावामुळे तेव्हाच्या मोजक्याच दैनिकांना या दंगलींचे वृत्त प्रसिद्ध करता आले होते; मात्र विदेशी माध्यमांनी याविषयी विस्तृत लिखाण प्रसिद्ध केले. त्यांनी स्पष्टपणे म्हटले, ‘गांधी यांचे अनुयायी आणि ब्राह्मणद्वेषी संघटना यांनी या दंगली घडवून आणल्या.’ यावर महाराष्ट्रातील पुरो(अधो)गामी बोलतील का ? तेच नव्हे, तर आताच्या माध्यमांनी याविषयी लिखाण करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे ‘टाइम्स नाऊ’ या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तवाहिनीने यावर चर्चा केली आणि हा इतिहास जगासमोर आणण्याचा कौतुकास्पद प्रयत्न केला, त्याला पुढच्या टप्प्यांत नेण्याचा प्रयत्न देशातील आणि विशेषतः पुरोगामी महाराष्ट्रातील पुरोगामी दैनिकांनी, निर्भिड वर्तमानपत्रांनी करून महाराष्ट्राला डाग लावणार्यांना उघडे पाडले पाहिजे. ‘पंडित नथुराम गोडसे यांनी गांधी यांची हत्या केली आणि तो महाराष्ट्राला लागलेला डाग आहे’, असे जर त्यांना वाटत असेल, तर त्यांनी महाराष्ट्रात ५ सहस्र ब्राह्मणांच्या झालेल्या हत्यांमुळे लागलेल्या डागाविषयीही बोलायला हवे. ‘एकाने गाय मारली म्हणून दुसर्याने वासरू मारले, तर ते क्षम्य आहे’, असे कधीही म्हणता येणार नाही, हे महाराष्ट्रातील प्रबुद्ध पत्रकारांना ठाऊक असणारच. विक्रम संपत यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे. हा इतिहास जनतेला ठाऊक झाला पाहिजे.