मराठी सारस्वताचा मानबिंदू असणारी ‘ज्ञानेश्वरी’ आता हिंदी भाषेत उपलब्ध होणार !

प्रा. वेदकुमार वेदालंकार यांच्याकडून ३ सहस्र ओव्या अनुवादाचे काम पूर्ण !

प्रा. वेदकुमार वेदालंकार

संभाजीनगर – ‘अमृताते हि पैजा जिंके ।’ असा मराठी भाषेचा मान उंचावणार्‍या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा आद्यग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’ आता हिंदीमध्ये अनुवादित होत आहे. ज्ञानेश्वरीचा मराठीतील ठेवा अन्य भाषेतही उपलब्ध व्हावा, यासाठी प्रा. वेदकुमार वेदालंकार यांनी हिंदी भाषेत ज्ञानेश्वरीचा अनुवाद करण्याचे ठरवले असून त्यांनी आतापर्यंत ४ सहस्र ओवींचा हिंदी भाषेतील अनुवाद पूर्ण केला आहे. यापूर्वी त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचाही पद्यानुवाद केला होता.

याविषयी प्रा. वेदालंकार म्हणाले, ‘‘श्री गणेशाच्या वर्णनाने चालू होणार्‍या ज्ञानेश्वरीचे पहिले ३-४ अध्याय लहान आहेत; पण त्यांचा अनुवाद करतांना त्यातील भाव जगावा लागतो. ओवी अनुभवता येणे ही प्रक्रिया असली, तरी भाषिक अर्थाने ती अन्य भाषिकांपर्यंत पोचावी, यासाठी तिचा अनुवाद करण्याचा निर्णय घेतला आहे. एरव्ही अन्य लेखकांच्या साहित्यांचा अनुवाद करतांना फारसे शब्द अडायचे, असे कधी घडले नाही; पण ज्ञानेश्वरी हा मुळात चिंतनाचा भाग आहे. त्यामुळे तिचा अनुवाद करणे अवघड आहे; पण जमत आहे. आतापर्यंत ४० पुस्तके प्रकाशित झाल्यानंतरही अनुवादाचे काम करतांना नवा आनंद मिळत आहे.’’

प्रा. वेदकुमार वेदालंकार यांचा परिचय !

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्राचार्य म्हणून निवृत्तीनंतर भाषा अनुवादाच्या क्षेत्रात प्रा. वेदालंकार यांनी मोठे योगदान दिले आहे. बनारस विश्वविद्यालयात शिक्षण घेणार्‍या वेदालंकार यांचे संस्कृत, मराठी आणि हिंदी या भाषांवर प्रभुत्व आहे. त्यांनी संत गोरा कुंभार, संत चोखामेळा अशा ९ संतांच्या ६५० अभंगांचा अनुवाद केला आहे. चोहा, चौपाई, गीत आदी छंदात त्यांनी अनुवाद केला आहे. महाराष्ट्र सरकार आणि हिंदी साहित्य अकादमी यांच्या वतीने त्यांना ‘गजानन माधव मुक्तिबोध’ पुरस्कार त्यांना मिळाला आहे. पुणे येथील गुरुकुल प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अनुवादाच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. नवनवीन पुस्तकांचे वाचन करतांना मराठी संत साहित्य हिंदीमध्ये घेऊन जाण्याचे त्यांचे कार्य मौलिक मानले जाते. आता ज्ञानेश्वरी हिंदी भाषिकांपर्यंत पोचणार आहे.