गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसार करतांना श्री. बालाजी कोल्ला यांना आलेल्या विविध अनुभूती

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मी ७ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. प्रारंभी मी व्यष्टी साधनेअंतर्गत केवळ नामजप करत होतो. मागील ३ वर्षांपासून मी गुरुपौणिमेनिमित्त प्रसार सेवा करत आहे. गेली दोन वर्षे माझी पत्नी सौ. कल्पना प्रसार सेवा करण्यासाठी मला सातत्याने प्रोत्साहन देत आली, तसेच सौ. सुगंधी जयकुमार यांनी त्यासाठी मार्गदर्शन केले. यामुळे ही सेवा करणे मला सुलभ झाले.

श्री. बालाजी कोल्ला

१. गुरुपौर्णिमेच्या कालावधीत प्रसार करतांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन् आणि साधक यांचा सत्संग मिळणे अन् त्यांच्याकडून शिकायला मिळणे

१ अ. गुरुपौर्णिमेनिमित्त विज्ञापने मिळवण्याची सेवा करतांना ‘ती केवळ सेवा नसून सत्संग आहे’, असे जाणवणे : या वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसार सेवेसाठी मला पू. उमाक्का (पू. (सौ.) उमा रविचंद्रन्) आणि सुगंधीअक्का (सौ. सुगंधी जयकुमार) यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांनी मला ‘प्रार्थना कशी करायची ? आणि स्वयंसूचना कशा घ्यायच्या ?’, हे शिकवले. पू. उमाक्कांनी स्वतः माझ्यासाठी आवश्यक प्रार्थना लिहून दिल्या. मी आणि श्री. प्रभाकरमामा यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त विज्ञापने मिळवण्याची सेवा चालू केली. प्रभाकरमामा माझ्या वेळेच्या उपलब्धतेनुसार माझ्या सोयीने सेवेची वेळ जुळवून घेत असत. त्यांनी माझा सर्वांशी परिचय करून दिला. अगदी पहिल्या दिवसापासून माझ्यासाठी ती केवळ सेवा नसून माझ्यासाठी सत्संगच होता, ज्याचे मी शब्दांत वर्णन करू शकत नाही. आम्ही परिचित, तसेच अपरिचित ५० व्यक्तींना गुरुपौर्णिमा विशेषांक वितरित केले.

१ आ. एका जिज्ञासूने प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र पाहून ‘यांच्या तोंडवळ्यावर केवढे हे तेज !’, असे उद्गार काढणे ! : मला सेवा करतांना एक लक्षणीय अनुभूती आली. कोलाथूर येथील श्री. राजू नावाच्या जिज्ञासूंना मी प्रथमच भेटणार होतो. त्यासाठी त्यांनी मला केवळ पंधरा मिनिटांची वेळ दिली होती. गुरुपौर्णिमा महोत्सवाची निमंत्रण पत्रिका मी त्यांच्या हातात दिली. पत्रिकेवरील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र पाहून त्यातून त्यांना चांगली स्पंदने जाणवली आणि ‘यांच्या तोंडवळ्यावर केवढे हे तेज !’, असे उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी साधनामार्गाविषयी पुष्कळ माहिती जाणून घेतली. ते तळमळीने गुरूंचा शोध घेत आहेत. आमचे संभाषण एक घंटा चालले. गुरूंच्या कृपेने मी त्या वेळी अखंड भावावस्था अनुभवत होतो. ते गुरुपौर्णिमा महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यानी काही ग्रंथ खरेदी केले. ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ या ग्रंथाचा अर्धा भाग त्यांनी एका दिवसात वाचला. अशा प्रकारे प्रसार करतांना सेवेसह मला प्रतिदिन सत्संग मिळत होता.

२. गुरुपौर्णिमेच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे आणि भावजागृती होणे

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांचे अस्तित्व जाणवणे : गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला आलेली अनुभूती अविस्मरणीय अशी होती. आदल्या दिवसापासूनच मला गुरुपौर्णिमा असल्याप्रमाणे वाटत होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यापासूनच मला परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते. ‘ते प्रत्येक क्षणी माझ्या समवेत आहेत’, असे मला वाटत होते. मी प्रतिदिन सकाळी गायत्री मंत्राचे पठण करतांना मला गायत्रीदेवीचे अस्तित्व जाणवते. आज मात्र अखंडपणे मला परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते. परात्पर गुरु डॉक्टरांचा सुहास्य तोंडवळा मला सतत दिसत होता.

२ आ. गुरुपूजनाच्या वेळी मला पुष्कळ भाव जाणवत होता. गुरुपूजनानंतर ‘ज्योतसे ज्योत’ ही आरती करतांना मला गुरुपरंपरेतील गुरूंच्या चित्रांवर सोनेरी किरण दिसत होते. मला ‘सेवाकेंद्र म्हणजे वैकुंठलोकच बनले आहे’, असे वाटत होते.

२ इ. या वेळी गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसार आणि सेवा करतांना माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘परात्पर गुरूंनी मला धरले आहे’, असे मला जाणवत होते.

परात्पर गुरुदेवांच्या चरणकमली मी कोटीशः वंदन करतो.’

– श्री. बालाजी कोल्ला, चेन्नई (२७.७.२०१९)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक