केंद्रीय मंत्री नारायण राणे यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याकडून महाड येथील पूरग्रस्त भागाची पहाणी !

पंतप्रधान आवास योजनेतून पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन !

मुंबई – केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांसह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी २५ जुलै या दिवशी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये येथील पूरग्रस्त भागाची पहाणी केली. या वेळी नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान आवास योजनेतून पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले.

२३ जुलै या दिवशी पूरग्रस्त भागात प्रशासकीय अधिकारी पोचले नसल्याविषयी प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली होती; मात्र २५ जुलै या दिवशीच्या दौर्‍यानंतर देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांनी राज्य सरकार अन् प्रशासकीय यंत्रणा यांवर टीका करण्याचे टाळले. माध्यमांच्या प्रतिनिधींना उत्तर देतांना ही वेळ टीका करण्याची नसल्याचे त्यांनी नमूद केले.

पक्की घरे देऊन पीडितांचे पुनर्वसन करणार ! – नारायण राणे, केंद्रीय उद्योगमंत्री

घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये प्रशासकीय यंत्रणा प्रामाणिकपणे काम करत आहे. ज्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत, त्या सर्व नागरिकांचे पुनर्वसन पंतप्रधान आवास योजनेतून केले जाईल. केंद्र आणि राज्य शासन यांद्वारे ही योजना चांगल्या प्रकारे राबवली जाईल. ग्रामस्थ सांगतील त्या ठिकाणी पक्की घरे देऊन पीडितांचे पुनर्वसन करण्यात येईल. पुनर्वसनासह आवश्यक त्या सर्व नागरी सुविधाही देण्यात येतील. या सर्व दुर्घटनेचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी देणार आहे.