साधकांवर आनंदाचा वर्षाव करणारी आणि संतांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ८७ वर्षे) यांची पुणे येथील वास्तू !
पू. (श्रीमती) निर्मला दातेआजींची पुण्यातील वास्तू म्हणजे पुण्यातील सनातनचे सेवाकेंद्रच होते. प्रसारकार्याच्या निमित्ताने परात्पर गुरु डॉ. आठवले अनेक वेळा या वास्तूत वास्तव्यास असत. परात्पर गुरु डॉक्टर आणि अनेक संत यांच्या चरणस्पर्शाने ही वास्तू पावन झाली होती. पू. आजींनी रामनाथी आश्रमात जाण्यापूर्वी ही वास्तू एका बांधकाम व्यावसायिकाला (बिल्डरला) विकली. या वास्तूविषयी साधिका सौ. अनुराधा निकम यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता पुढे दिली आहे.
‘वैशाख कृष्ण पक्ष दशमी (४.६.२०२१) या दिवशी पुणे येथील सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्त दैनिक ‘सनातन प्र्रभात’मध्ये त्यांच्याविषयी लेख प्रसिद्ध झाला होता. हा लेख वाचल्यानंतर माझी पुनःपुन्हा भावजागृती होत होती. पू. दातेआजी म्हणजे निरागसता, त्याग आणि निरपेक्षता यांचे मूर्तीमंत प्रतीक आहेत. त्यांचे साधक कुटुंबीय साधकांना साधनेसाठी प्रेरित करणारे आहेत आणि त्यांची वास्तुदेवता ईश्वराच्या चरणकमलांनी पावन झालेली आहे.
१. पू. आजींच्या घरी झालेली त्यांची प्रथम भेट !
मी वर्ष २००१ मध्ये ‘ज्ञानेश प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालया’च्या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुण्या अन् वक्त्या म्हणून सौ. ज्योती दाते (पू. आजींची सून) यांना निमंत्रण देण्यासाठी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजींच्या घरी गेले होते. (६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अनुराधा निकम या धनकवडी (पुणे) येथील ‘ श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळा’च्या संस्थापिका आणि अध्यक्षा आहेत. ‘ज्ञानेश प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय’ हे या मंडळाच्या अंतर्गत आहे. सौ. निकम या वर्ष २००१ पासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहेत.’ – संकलक) त्या वेळी पू. आजींनीच दार उघडले. पू. आजींची आणि त्या वास्तूची ही माझी प्रथम भेट होती. पू. आजींकडे आणि त्या वास्तूकडे मी पहातच राहिले. ‘हे काहीतरी अलौकिक आहे’, असे मला वाटले. त्या दिवशी मला शाळेच्या स्नेहसंमेलनाचे पुष्कळ काम होते; पण माझा पाय तिथून निघत नव्हता. फुलांच्या भोवती गुंजारव करणार्या भुंग्यासारखी माझी स्थिती झाली होती.
२. पू. आजींची वास्तू म्हणजे आनंदाचे घर !
मला पू. दातेआजी, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांची वास्तू यांच्याप्रती पुष्कळ ओढ वाटत असे. त्या वास्तूत गेल्यावर मला प्रत्येक वेळी पुष्कळ आनंद वाटत असे. ते आनंदाचे घर होते. आनंदाचे वर्णन करता येत नाही, हेच खरे !
३. ‘पू. आजींचे घर विकणार आहेत’, हे कळल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे
अ. ‘पू. आजींचे घर विकणार आहेत’, हे कळल्यावर आनंदाचे अगणित प्रसंग चित्रफितीप्रमाणे माझ्या नेत्रांपुढून सरकू लागले.
आ. ‘ईश्वर सर्वज्ञ आहे’, या विचाराने माझ्या मनाला स्थिरता आली आणि मला शांत वाटले.
इ. ‘ईश्वर अनंत कोटी ब्रह्मांडांचा निर्माता आहे. हा भवसागर पार करतांना तो मला व्यापकत्वाकडे नेत आहे’, असे मला वाटले.
४. पू. आजींच्या वास्तुदेवतेने मला माझ्या साधनेच्या प्रवासात दिशादर्शन केले. तिने माया आणि ब्रह्म यांचा अर्थ सुस्पष्ट केला.
५. साधिकेने वास्तुदेवतेला केलेले भावपूर्ण आत्मनिवेदन आणि तिच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !
‘हे वास्तुदेवते, तुझ्या चरणी काढलेली सुंदर रांगोळी, तुझ्या भाळीचा तेजोमय आकाशकंदील, साधकांची आतुरतेने वाट पहात असलेली तू ! ‘तुझ्या चरणी साष्टांग नमस्कार करून तुला आलिंगन द्यावे’, असे मला वाटते. हे वास्तुदेवते, भगवंताने तुला आमच्या मायेतून मुक्त केले. तू ईश्वरेच्छा स्वीकारलीस. हे वास्तुदेवते, ईश्वराच्या चरणकमलांनी पावन झालेली तू त्रेतायुगातील श्रीरामाच्या अनेक आश्रमांप्रमाणेच कलियुगातील ईश्वराच्या अनेक आश्रमांमधील एक आहेस. हे वास्तुदेवते, तुझ्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. तुझ्या चरणी साष्टांग नमस्कार आणि तुला भावाश्रूपूर्ण आलिंगन !’
– सौ. अनुराधा निकम, फोंडा, गोवा. (८.६.२०२१)