लहानपणापासूनच मायेतील जीवनाची नाही, तर आश्रमजीवनाची ओढ असलेला सनातनच्या पुरोहित पाठशाळेतील पुरोहित-साधक श्री. चैतन्य दीपक दीक्षित !
‘मे २०१७ मध्ये चैतन्य रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आला. तो सनातनच्या पुरोहित पाठशाळेत सेवा करतो. त्याच्या वडिलांना जाणवलेली त्याच्याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
१. चैतन्यचे आवडते छंद
अ. ‘दंडसाखळी फिरवणे, बुद्धीबळ खेळणे, किल्ला सिद्ध करणे आणि वैज्ञानिक वस्तू सिद्ध करणे’, हे चैतन्यचे आवडते छंद आहेत.
आ. ‘संस्कृत’ हा त्याचा अत्यंत आवडीचा विषय आहे. तो विविध संमेलनांत संस्कृत नाटकेही सादर करायचा.
२. अनुभूती
२ अ. श्रीविठ्ठलाने चैतन्यला वाचवल्याची आलेली अनुभूती
२ अ १. एका विवाहासाठी पंढरपूरला गेल्यावर चैतन्यने पोहण्याचा हट्ट करणे, तो पोहत नदीच्या मध्यापर्यंत गेल्यावर पाणी खोल असल्याने दमून गटांगळ्या खाऊ लागणे आणि काही वेळाने तो घाबरलेल्या स्थितीत किनार्यावरून धावत येणे : चैतन्य ११ वर्षांचा असतांना आम्ही माझ्या एका मित्राच्या विवाहासाठी पंढरपूर येथे गेलो होतो. मधल्या वेळेत आम्ही श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी गेलो. तेथे चैतन्यने चंद्रभागेत पोहण्याचा हट्ट केला; म्हणून मी त्याला काठाजवळच पोहण्याची अनुमती दिली. तो नदीत पोहण्यासाठी उतरला आणि हळूहळू माझी दृष्टी चुकवून मध्यापर्यंत गेला अन् दिसेनासा झाला. मी त्याला शोधू लागलो. मध्यावर पाणी अधिक होते. तेथे जाईपर्यंत त्याला दम लागला आणि तो गटांगळ्या खाऊ लागला. मला तो दिसत नव्हता. मी दूरपर्यंत पाहिले; परंतु तो माझ्या दृष्टीक्षेपात आला नाही. त्यामुळे मी फार घाबरलो. नंतर काही वेळाने तो धापा टाकत घाबरलेल्या स्थितीत किनार्यावरून धावत येतांना मला दिसला.
२ अ २. चैतन्यला एका मुलाने वर उचलून पाणी अल्प असलेल्या ठिकाणी नेणे आणि तेथून किनार्यावर जाण्यास सांगणे, नंतर तो मुलगा न दिसणे अन् ‘प्रत्यक्ष विठ्ठलानेच चैतन्यला वाचवले’, असे जाणवणे : मीही त्याच्याजवळ धावत गेलो. मी त्याला ‘कुठे गेला होतास ?’, असे रागावूनच विचारले. तेव्हा त्याने सांगितले, ‘‘मी पाण्यात बुडतच होतो. एका पायरीजवळ कसातरी पोचलो; पण ती पायरी फार उंच होती आणि पाणी पुष्कळ खोल होते. मला फार दमायला झाले होते. मी गुरुदेवांना सारख्या हाका मारत होतो. थोड्या वेळाने तेथे काही मुले पोहण्यासाठी आली. मी त्यांना हात दाखवला. त्यातील एकाने मला वर उचलले आणि पाण्याची पातळी न्यूनतम असलेल्या ठिकाणी नेले. तेथून त्याने मला किनार्यावर जाण्यास सांगितले.’’ मी त्याला म्हणालो, ‘‘तो मुलगा कुठे आहे ? पटकन सांग. मला त्याचे पाय धरायचे आहेत.’’ तेव्हा चैतन्य म्हणाला, ‘‘मीही नंतर मागे वळून पाहिले; पण तो मुलगा मला दिसला नाही.’’ तेव्हा मला फार गहिवरून आले. ‘साक्षात् विठ्ठलच माझ्या मुलाला वाचवण्यासाठी आला’, असेच मला वाटले. तेव्हा माझे डोळे कृतज्ञतेने भरून आले.
२ आ. साधकांच्या माध्यमातून नामजपादी आध्यात्मिक उपाय मिळणे : चैतन्य दहावीत असतांना त्याला ‘डेंग्यू’ झाला होता. तेव्हा
श्री. पाटणेगुरुजी आणि सौ. शुभांगी पाटणे हे त्याला नामजपादी आध्यात्मिक उपाय सांगायचे. गुरुदेवांनीच अन्य साधकांच्या माध्यमातून त्याची काळजी घेतली. तो दहाव्या इयत्तेत शिकत असतांना डेंग्यूमूळे ६ मास रुग्णाईत होता, तरीही त्याने चांगले गुण मिळवले.
३. रामनाथी आश्रमात गेल्यावर एका संतांशी झालेले संभाषण !
एकदा आम्ही रामनाथी आश्रम पहाण्यासाठी गेलो होतो. तेव्हा एका धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी आम्हाला एक संत भेटले. तेव्हा त्यांच्याशी झालेले संभाषण येथे दिले आहे.
संत : ‘तुम्हाला तुमच्या मुलाला आश्रमात पाठवावे’, असे का वाटले ? (संतांचे बोलणे ऐकून मला फार गहिवरून आले.)
मी : वर्ष २०१३ पासून उन्हाळ्याच्या सुटीत आम्ही चैतन्यला पुरोहित पाठशाळेच्या वासंतिक वर्गासाठी रामनाथी आश्रमात पाठवायचो. तेव्हापासून त्याने आश्रमात पूर्णवेळ रहाण्याचा हट्ट चालू केला होता. त्याने महाविद्यालयात प्रवेश घेतला; परंतु त्याला तेथील वातावरण रुचायचे नाही. तो सेवेलाच अधिक वेळ द्यायचा. त्याचा हट्ट आणि ईश्वरेच्छा यांपुढे आम्हाला नमावेच लागले. गुरुदेवांच्या कृपेमुळेच आम्ही त्याला आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी पाठवू शकलो.
मी : आरंभी आम्हाला काही नातेवाइकांचा विरोध झाला. चैतन्य आश्रमातून घरी आल्यावर पाठशाळेत शिकवल्याप्रमाणे भावपूर्णरित्या पूजा करायचा. त्याची पूजेची मांडणीही पद्धतशीर असायची. हे सर्व पाहून नातेवाइकांनाही पुष्कळ आनंद झाला. नंतर संपूर्ण कुटुंबामध्ये त्याचा हा वेगळा आणि आदर्श निर्णय सर्वांनाच आवडला.
संत : हे उदाहरण शिकण्यासारखे आहे. कलियुगात प्रत्येक आई-वडिलांना ‘आपला मुलगा आधुनिक वैद्य किंवा अभियंता व्हावा’, असे वाटते; परंतु काही साधक माता-पित्यांनाच ‘माझा मुलगा एक चांगला साधक किंवा संत व्हावा’, असे वाटते. अन्य कुणाला असे वाटत नाही. कलियुगातील हीच पिढी पुढे हिंदु राष्ट्र सांभाळेल.’
‘गुरुदेव, चैतन्यची पुढील आध्यात्मिक उन्नती जलद गतीने करवून घ्या’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. दीपक जगन्नाथ दीक्षित (वडील), डोंबिवली, ठाणे. (३.४.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |