ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावरील नियोजित रस्त्यामुळे गडाला धोका !
कराड (सातारा) येथील दुर्गप्रेमी संघटनांचा आरोप
कराड, २५ जुलै (वार्ता.) – येथील किल्ले सदाशिवगड येथील नियोजित रस्त्याच्या कामामुळे गडावरील मंदिर आणि इतर वास्तूंना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच भविष्यात या रस्त्यामुळे किल्ल्यावर अतिक्रमणही होऊ शकते. रस्ते झालेल्या अन्य किल्ल्यांवरील अनुभव चांगले नाहीत. यामुळे सदाशिवगडाचे अस्तित्वच धोक्यात येईल. त्यामुळेच सदाशिवगडावरील नियोजित रस्त्याचा प्रस्ताव रहित करावा, अशी मागणी कराड तालुक्यातील दुर्गप्रेमी संघटनांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
किल्ले सदाशिवगड येथे आजही आबालवृद्ध पायी जातात. गड परिसरात वन विभागाची सीमा आहे. सदाशिवगड ते मच्छिंद्रगड अशी सह्याद्रीची डोंगररांग आहे. याठिकाणी सागरेश्वर अभयारण्य आहे. बिबट्या, हरिष, काळवीट यांसारखे वन्यप्राणी या परिसरात वावरत असतात. अशी स्थिती असतांना तेथे रस्त्याचा घाट घातला जात आहे. गडांचे महत्त्व दुर्गमतेत आहे. रस्ते करून ते नष्ट केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना तिलांजली देण्याचेच कार्य केले जात आहे. सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास दुर्गप्रेमी संघटनांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी दुर्गप्रेमींनी दिली आहे.