चिपळूणचा पूर ३६ घंट्यांनंतर ओसरला : १२ जणांचा मृत्यू

  • व्यापारी आणि नागरिक यांची कोट्यवधी रुपयांची हानी  

  • सर्वत्र चिखलाचे साम्राज्य  

  • पूरग्रस्तांना मिळत आहे सर्वांकडून साहाय्य

चिपळूण – २१ जुलै २०२१ या दिवशी झालेल्या ढगफुटीमुळे येथील वाशिष्टी आणि शिव नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि २२ जुलैच्या  पहाटेपासून चिपळूण शहरासह खेर्डीमध्ये पुराचे पाणी भरण्यास प्रारंभ झाला. या महापुराने शहरातील व्यापारी आणि नागरिक यांची कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे. २६ जुलै २००५ या दिवशी आलेल्या महापुरापेक्षा भयाण महापूर येथील नागरिकांनी अनुभवला. या महापुरात अडकलेल्या नागरिकांना एन्.आर्.डी.एफ्., कोस्टगार्ड, आर्मी, पोलीस यांच्या तुकड्यांसह चिपळूण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटनांनी सुरक्षित स्थळी हालविले. या महापुरात आतापर्यंत १२ नागरिकांचा बळी गेला आहे.

चिपळूण शहरासमवेत खेर्डी गावातही अशीच परिस्थिती अनुभवायला मिळाली. खेर्डीमध्ये प्रारंभी घरांमध्ये पाणी शिरले. हे पाणी वाढत चालल्यानंतर मात्र नागरिकांनी साहाय्य मागितले. अनेक ठिकाणी इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेले. त्यामुळे नागरिक इमारतीच्या छताकडे गेले आणि साहाय्यासाठी टाहो फोडला. अशीच परिस्थिती मजरेकाशी, पेठमाप, गोवळकोट या भागांमध्येही होती. पुरात अडकलेल्या नागरिकांनी स्वत:चा जीव मुठीत घेऊन इमारतींच्या छतांवर किंवा घराच्या पोटमाळ्यात रात्र अक्षरश: जागून काढली.

बचाव कार्यात प्रारंभी आलेले अडथळे

प्रतिकात्मक छायाचित्र

येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांच्यासह शिवसेनेचे सचिन कदम, नगरसेवक उमेश सकपाळ, येथील सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी सचिन बारी, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी विधाते, नायब तहसीलदार तानाजी शेजाळ आणि अन्य संघटनांनी पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यास प्रारंभ केला; मात्र अनेक ठिकाणी अनुमाने १५ फूट पाणी असल्याने त्यांना ते शक्य झाले नाही. यानंतर मात्र प्रशासनाने एन्.आर्.डी.एफ्., कोस्टगार्ड, आर्मीचे पथक आणि बोटींना पाचारण केले. त्यानंतर मात्र पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित  स्थळी हालवण्यात आले. या पुराची पहाणी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री अधिवक्ता परब यांनी केली आणि नागरिकांना आवश्यक ते साहाय्य केले.

२३ जुलैच्या सकाळपासून हळूहळू पाणी ओसरण्यास प्रारंभ झाला. यानंतर पावसाचे प्रमाणही न्यून झाले. खेर्डी, काविळतळी, मार्कंडी, रेडिज पेट्रोल पंप परिसर, विरेश्‍वर तलाव परिसर आणि भोगाळे येथील पाणी प्रथम ओसरले.

सर्वत्र चिखलाचे साम्राज्य

जिथे जिथे पाणी ओसरले होते. तेथे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पहायला मिळत आहे. गाड्यांमध्ये, घरांमध्ये आणि दुकानांमध्ये चिखलमय पाणी झाले आहे. यामुळे व्यापार्‍यांच्या मालाची अतोनात हानी झाली आहे. वाहने इतरत्र वाहून गेली असून काही वाहने गटारात जाऊन अडकली आहेत. वाहून आलेली वाहने एकमेकांवर आदळून त्यांचीही हानी झाली आहे.

पूरग्रस्तांना मिळत आहे सर्वांकडून साहाय्य

येथील पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी अनेक आध्यात्मिक संस्था, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षही पुढे आले आहेत. नरेंद्र महाराज संस्थानच्या वतीने १०० कार्यकर्ते आणि रुग्णवाहिका साहाय्याला आल्या आहेत. त्यांच्याकडून पूरग्रस्तांना अन्नाची पाकिटे वाटली जात आहेत. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी साहाय्य केले आहे. नीलेश राणे यांनी पूरग्रस्तांसाठी विशेष साहाय्य केले आहे. याशिवाय लांजा येथील भाजपच्या वतीनेही साहाय्य करण्यात आले आहे.