साधकांना स्वतःत अडकू न देता तत्त्वनिष्ठ करणारे विश्वव्यापी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि शिष्य म्हणून साधकांनी करावयाचे कर्तव्य !
१. स्वतः अवतारी गुरु असूनही सनातनच्या साधकांना इतर संप्रदायांतील साधकांप्रमाणे व्यक्तीनिष्ठ राहू न देता आणि स्वतःच्या देहात अडकू न देता तत्त्वनिष्ठ रहाण्यास शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘परात्पर गुरुदेवांनी प्रथमपासूनच साधकांना शिकवले आहे, ‘‘संतांच्या देहात अडकू नका; कारण संत हे देहधारी असल्याने त्यांना मृत्यू हा असतोच. संतांचे तत्त्वच महत्त्वाचे आहे.’ तत्त्व हे अविनाशी असल्याने ते आपल्याला चिरकाल मार्गदर्शन करू शकते; परंतु संतांच्या देहाचे तसे नसते. संत जिवित असेपर्यंतच आपल्या वाणीद्वारे साधकांना मार्गदर्शन करत असतात. बर्याच संप्रदायांमध्ये साधक संतांच्या देहातच अडकून बसतात. नंतर संतांनी देहत्याग केला की, त्यांना पुष्कळ दुःख होते. काहीजण तर ‘आता मठात संत नाहीत, तर तेथे जाऊन काय उपयोग ?’, असे म्हणून ते साधना करणेही सोडून देतात. तशी आपली गत होऊ नये; म्हणून गुरुदेवांनी सर्व साधकांना प्रथमपासूनच तत्त्वनिष्ठ रहाण्याचे प्रशिक्षण दिले आहे. म्हणूनच सनातनच्या अनेक साधकांनी गुरुदेवांना पाहिले नसूनही ते आध्यात्मिक उन्नती करून घेत आहेत; कारण त्यांची गुरुदेव सांगत असलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या तत्त्वांवर पूर्ण श्रद्धा आहे.
२. संतांच्या देहापेक्षा त्यांची शिकवणच मोठी असल्याने स्वतःच्या कृतीतून साधकांना व्यक्तीनिष्ठतेतून तत्त्वनिष्ठतेकडे सहजतेने जाण्याचा महामंत्र देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
गुरुदेव साधकांना नेहमी म्हणतात, ‘‘संतांच्या देहापेक्षा त्यांची शिकवणच मोठी आहे. त्यातच ईश्वरप्राप्तीचे सार आहे. अरे, मला काय नमस्कार करता, देवाला करा. तोच एकमेव शाश्वत आहे. माझा देह काय आज आहे, तर उद्या नाही.’’ त्यांनी कधीच कुणाकडून नमस्कार करून घेतला नाही. यातूनच त्यांनी साधकांना सहजतेनेच व्यक्तीनिष्ठतेतून तत्त्वनिष्ठतेकडे जाण्याचा महामंत्र दिला.
३. स्वतःच्या छायाचित्राची पूजा करण्यापेक्षा चिरंतन टिकणार्या देवतांच्या चित्राची पूजा करायला सांगणारे गुरुदेव !
एकदा एका संतांनी गुरुदेवांना सांगितले, ‘‘घरोघरी तुमचे छायाचित्र साधकांच्या पूजेत हवे.’’ त्यावर गुरुदेव म्हणाले, ‘‘मी काय माझ्या देहत्यागानंतर फार तर १०० वर्षे लोकांच्या लक्षात राहीन; परंतु आपल्या ज्या देवता आहेत, त्या मात्र चिरंतन आहेत. त्यांची पूजा केली, तर साधकांना अधिक लाभ होईल.’’ खरे संतच असे सांगू शकतात.
४. बाहेरील कित्येक मठ आणि आश्रम हे आध्यात्मिक केंद्रे न रहाता स्वतःची प्रसिद्धी करून घेण्याची केंद्रे बनलेली असून असे मठ आणि संप्रदाय लोकांना ईश्वरप्राप्तीविषयक काय शिक्षण देणार ?
आजकाल समाजात दांभिकपणा पुष्कळ वाढला आहे. स्वतःला संत म्हणवणार्यांचे सध्या सर्वत्र पीक आले आहे. कित्येक मठ आणि आश्रम हे आध्यात्मिक केंद्रे न रहाता स्वतःची प्रसिद्धी करून घेण्याचीच केंद्रे बनली आहेत. तेथे अध्यात्म हे ‘अध्यात्म न रहाता, तोही एक व्यवहारच बनला आहे.’ असे मठ आणि संप्रदाय लोकांना ईश्वरप्राप्तीविषयी काय शिक्षण देणार ?
५. समाजाकडून साधना करवून घेण्यासाठी झटणे, हेच सनातनच्या साधकांचे ‘शिष्य’ म्हणून असलेले कर्तव्य !
संप्रदायात जाणे आणि तेथे जाऊन काहीतरी साधना करणे, हाही लोकांच्या दृष्टीने एक दिखावाच झाला आहे. त्यामुळे अनेक मठ आणि आश्रम यांतील चैतन्य हरपले आहे. आपल्याला हे सर्व पालटायचे आहे. त्यासाठी परात्पर गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे ‘सर्वांना खरी ईश्वरप्राप्ती कशामुळे होईल ?’, याविषयीचे शास्त्रशुद्ध शिक्षण देऊन समाजाकडून तशी साधना करवून घेण्यासाठी झटणे, हेच आपल्या सनातनच्या सर्व साधकांचे ‘शिष्य’ म्हणून एक कर्तव्य आहे.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२६.३.२०२०)