एकमेवाद्वितीय तीर्थक्षेत्र असलेला भूवैकुंठातील सनातनचा रामनाथी आश्रम !

‘परशुराम भूमी असलेल्या निसर्गरम्य गोमंतकात, अघनाशिनी नदीच्या परिसरात, श्री रामनाथ आणि श्री शांतादुर्गा या दोन मंदिरांच्या मध्ये दाटीपासून दूर असलेला अन् राजहंसाप्रमाणे शोभिवंत असा, हा रामनाथीचा आश्रम आहे. श्रीकृष्णाचे गोकुळ, श्रीरामाची अयोध्या, त्याप्रमाणे सनातनचा रामनाथी आश्रम हा श्रीमन् नारायणाचे (परात्पर गुरु डॉक्टरांचे) वैकुंठ आहे. कलियुगात धर्मग्लानीच्या काळातही त्याची सात्त्विकता पूर्णपणे टिकून आहे; कारण भगवान श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र या क्षेत्राचे रक्षण करत आहे. या उदयोन्मुख अद्वितीय क्षेत्राची ओळख धर्मनिष्ठांना आहेच; पण सर्व हिंदूंना ती व्हावी आणि त्यांनी या क्षेत्राचा लाभ करून घ्यावा, या हेतूने हे लेखरूपी कृतज्ञतापुष्प श्रीगुरुचरणी अर्पण करते.

संकलक : सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

भारतभूमीतील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या तुलनेत उदयोन्मुख सनातनच्या रामनाथी आश्रमाची वैशिष्ट्ये !

तीर्थक्षेत्र म्हणजे काय ?

‘तृ-तर तारयति इति तीर्थम् ।’ म्हणजे ‘तारून नेणारे स्थान, क्षेत्र, ठिकाण, जागा किंवा तपोभूमी.’ साधना करायची भूमी, ध्यानाचे स्थान, भवसागरातून तरून जाऊन ईश्वरप्राप्तीच्या मार्गाकडे वळवणारे ठिकाण, म्हणजे तीर्थस्थान.

१. सप्तनद्यांचे संगम असलेला सनातनचा रामनाथी आश्रम

‘भारतवर्ष ही देवभूमी आणि तीर्थभूमी आहे. येथे सहस्रो तीर्थक्षेत्रे आहेत. त्यांतही ३४ क्षेत्रे मोक्षदायक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यात सप्तनद्या, सप्तपुरी, चार धाम, बारा ज्योतीर्लिंगे आणि चार कुंभक्षेत्रे ही जागृत स्थाने म्हणून प्रसिद्ध आहेत. एवढी तीर्थक्षेत्रे असली, तरी सनातनचा रामनाथी आश्रम हे अद्वितीय असे तीर्थक्षेत्र आहे, असेच म्हणावे लागते. येथील चैतन्य वर्ष २०१७ ते २०२० ची गुरुपौर्णिमा या चार वर्षांत फारच वाढले आहे. हा आश्रम सप्तनद्यांचे संगमस्थान बनले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी महर्षींचे आज्ञापालन करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त साधकांना श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीविष्णु आणि श्रीसत्यनारायण या रूपांत दर्शन दिल्यामुळे अन् ते साक्षात् गुरुदेव असल्यामुळे या ठिकाणी शरयू, यमुना, गंगा, नर्मदा, सरस्वती आणि कृष्णा या ६ नद्या सूक्ष्मरूपात आहेत, तर गोमंतकातील अघनाशिनी ही ७ वी नदी स्थूल आणि सूक्ष्म रूपात येथे वास करत आहे. ‘अघनाशिनी नदी म्हणजे पापांचा नाश करणारी’ असा अर्थ असून हे संस्कृतमधील नाव आहे. आता ती नदी ‘झुवारी’ नदी म्हणून ओळखली जाते.

दैवी कण

२. दैवी कणांची निर्मिती

या ठिकाणी चैतन्याचे घनीकरण होऊन सोनेरी, चंदेरी, गुलाबी, पिवळे, निळे, मोरपंखी, जांभळे आणि हिरवे असे विविध रंगी तेजस्वी दैवी कण सापडले. ही अद्वितीय घटना आहे.

३. चैतन्यदायी वस्तूंचा संग्रह

परात्पर गुरु डॉक्टरांच्या उत्तराधिकारी असलेल्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि काही साधक यांनी लक्षावधी किलोमीटर प्रवास करून भारतातील अन् भारताबाहेरील काही देशांत भ्रमण करून हिंदूंच्या धार्मिक स्थळांना (तीर्थस्थाने, मंदिरे, समाधीस्थाने इत्यादींना) भेटी दिल्या. या प्रवासात आशीर्वादरूपात अन् प्रसादरूपात मिळालेल्या दैवी वस्तूंचा दुर्मिळ संग्रह येथे आहे.

४. सर्व देवतांचे स्थान आणि सात्त्विकता अन् पावित्र्य भरभरून असलेले क्षेत्र

४ अ. ‘यु.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या यंत्राद्वारे केलेले परीक्षण : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या सनातनच्या तीनही गुरूंचे, म्हणजे साक्षात् दत्तगुरूंचे हे निवासस्थान आहे. येथील दगड-मातीतही सकारात्मक ऊर्जा आहे. ‘यू.ए.एस.’ या उपकरणाद्वारे परीक्षण केल्यानंतर एका संतांच्या खोलीतील मातीमध्ये ४.७२ मीटर, तर ते पाणी घालत असलेल्या तुळशीतील मातीत ९.७५ मीटर सकारात्मक ऊर्जा आढळली. आश्रमक्षेत्रात कुठेही नकारात्मक ऊर्जा नाही.

‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

४ आ. साधकांची प्रत्येक कृती सात्त्विक असणे : श्रीविष्णूचे (परात्पर गुरु डॉक्टरांचे) हे निवासस्थान म्हणजे साक्षात् वैकुंठधाम आहे. या ठिकाणी साधना करण्याच्या हेतूने भारतातील आणि जगभरातील साधक एक परिवार बनून प्रेमाने नांदतात. त्यामुळे ‘हे श्रीकृष्णाचे गोकुळच आहे’, असे वाटते. या ठिकाणी व्यष्टी साधनेच्या माध्यमातून व्यष्टीची, तर समष्टी साधनेच्या माध्यमातून ‘समाजाची सात्त्विकता कशी वाढेल ?’, या दृष्टीने प्रत्येक गोष्टीचे आध्यात्मिकरण करण्यावर भर दिला जातो. प्रत्येकाचा ओढा सात्त्विकतेकडे असतो. येथे ‘रंग, नक्षी, पोशाख, दागिने, केशरचना, मेंदी, बोलणे, चालणे सार्‍याच गोष्टी, फार काय, तर कचरापेटीही सात्त्विक असायला हवी, असे श्री गुरूंनी स्वतःच्या आचरणातून शिकवले आहे.

सौ. शालिनी मराठे

४ इ. सर्व देवतांचे स्थान : परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली साधना म्हणून साधकांनी अष्टदेवतांची चित्रे सिद्ध केली आहेत. त्या चित्रांत त्या त्या देवतेचे तत्त्व अधिकाधिक आणण्याचा प्रयत्न केला आहे. अशी सात्त्विक चित्रे उपलब्ध झाल्यामुळे या चित्रांतून त्या त्या देवतेचे दर्शन घडते. त्यामुळे साधकांचा भाव जागृत होतो. त्यांना अनुभूती येतात आणि त्यांच्या साधनेला गती येते. (अन्य क्षेत्रात एखाद्याच प्रमुख देवतेचे स्थान असते, उदा. रामेश्वर (शिव), हरिद्वार (विष्णु), मोरगाव (गणपति), तुळजापूर (श्री दुर्गादेवी). काही वेळा ती क्षेत्रे संप्रदायांचीही असतात) ; पण रामनाथी आश्रमाच्या क्षेत्रात ‘शिव, श्रीकृष्ण, श्रीराम, हनुमंत, दत्तगुरु, गणपति, श्रीलक्ष्मी आणि श्री दुर्गा या देवता, तसेच पुरीचा जगन्नाथ, तिरुपतीचा बालाजी, पंचमुखी हनुमान, शिवलिंग, विठ्ठल-रखुमाई, श्रीविष्णूचा ६ वा अवतार परशुराम यांच्या मूर्ती आहेत. तसेच येथे प.पू. भक्तराज महाराज आणि श्री गुरु यांच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) पादुकाही आहेत. आश्रमाच्या प्रांगणात पुर्वाभिमुख श्री सिद्धिविनायक मंदिर आणि उत्तराभिमुख श्री भवानीदेवीचे मंदिर आहे. त्यामुळे सर्व हिंदूंना आपापल्या इष्टदेवतेचे दर्शन होऊन साधनेला प्रेरणा मिळते. तसेच हे ‘कलियुगातील एक जागृत तीर्थस्थान आहे’, याची प्रचीती येते.

४ ई . देवता आणि गुरु यांचा आशीर्वाद : येथे महर्षींच्या आज्ञेने कमलपिठाची स्थापना करण्यात आल्यामुळे हे श्रीलक्ष्मीचे (पद्मावतीचे) स्थान आहे. या आश्रमाला श्री विद्याचौडेश्वरीदेवीचे आशीर्वाद आहेत. या स्थानाला परात्पर गुरु डॉक्टरांचे गुरु आणि सनातन संस्थेचे प्रेरणास्थान असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘गोव्यातील रामनाथी आश्रम पुढे ‘विश्वदीप’ होईल’, असा आशीर्वाद दिला आहे.

४ उ. सात्त्विक चिन्हे आणि कलशारोहण : या परिसरात महर्षींच्या आज्ञेने ३ कलशांचे आरोहण केले आहे. तसेच गज, कपि आणि सिंह हे ध्वज लावलेले आहेत. महाद्वारी ऐरावताची स्थापना केली आहे. या सर्व शुभचिन्हांमुळे येथील पावित्र्य टिकून रहाते.

४ ऊ. येथील परिसर अतिशय स्वच्छ राखला जातो. साधना म्हणून या गोष्टीवर फार कटाक्ष असतो. यात मुळीच सवलत घेतली जात नाही. त्यामुळेच या क्षेत्रात देवत्व टिकून राहिले आहे.

– सौ. शालिनी मराठे


यज्ञभूमी आणि नित्य मंत्रपठण

समष्टी कल्याणासाठी सनातनच्या आश्रमात यज्ञ पार पडणे

या ठिकाणी परात्पर गुरु डॉक्टर यांनी विश्वकल्याणाचा संकल्प केला आहे आणि अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींनी २२० हून अधिक यज्ञ केले आहेत. अधून-मधून यज्ञ चालूच असतात. त्यामुळे हे स्थान म्हणजे यज्ञभूमी किंवा तपोभूमीच आहे. या ठिकाणी ध्यानमंदिरात योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या सांगण्यावरून ‘दत्तमाला मंत्रपठण’ चालू झाले. त्यानंतर काही मासांतच ध्यानमंदिरासमोरच्या रिकाम्या जागेत २०० ते २२० औदुंबराची लहान-मोठी रोपटी उगवली. ही घटना मंत्राचे सामर्थ्य लक्षात आणून देणारी दैवी घटना आहे. तसेच या स्थानाची सात्त्विकता दर्शवणारी आहे. येथे ध्वनीक्षेपकावर मंत्रजप, शिवकवच, चंडीकवच, अशी काही स्तोत्रे, तसेच प्रत्येक १५ मिनिटांनी भगवान श्रीकृष्णाप्रती प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यामुळे वातावरणातील पवित्र्य टिकून रहाते.

– सौ. शालिनी मराठे


सनातनच्या रामनाथी आश्रमात धर्मजागृती आणि धर्मसंस्थापना हे कार्य अविरतपणे चालू असणे

अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात मार्गदर्शन करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि उपस्थित हिंदुत्वनिष्ठ
  • या क्षेत्रात आजवर ९ ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र’ अधिवेशने झाली. दळणवळण बंदीच्या काळातही नववे अधिवेशन ‘ऑनलाईन’ झाले. त्यालाही भरघोस प्रतिसाद मिळाला. हे पहाता ही दैवी लीला लक्षात येते.
  • धर्मग्लानीच्या या काळात धर्मशिक्षण, धर्माचरण, धर्मसंघटन, धर्मजागृती आणि धर्मसंस्थापना करणारा हा विश्वदीप या क्षेत्रात प्रत्यक्ष भगवंतानेच (परात्पर गुरु डॉक्टरांनीच) लावला आहे.

– सौ. शालिनी मराठे

धर्म-अधर्माचा लढा

१. द्वापरयुगात ‘धर्मक्षेत्र आणि युद्धभूमी म्हणून ‘कुरुक्षेत्राला’ जे अद्वितीय स्थान प्राप्त झाले होते, तशा प्रकारे कलियुगात रामनाथी आश्रमाला महत्त्व आहे.

२. भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, तर पाचवा वेद ठरलेले सनातनचे सहस्रो ग्रंथ रामनाथी आश्रमातच निर्माण झाले. परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतःच्या उदाहरणातून साधकांना ‘भगवद्गीता’ जगायला शिकवली.

३. रामनाथी आश्रम हे ब्राह्मतेजाचे निर्मिती स्थान आहे. कलियुगातील सत्ययुग यावे; म्हणून कालचक्राला गती देणारे श्रीमन्नारायण परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपात येथेच विद्यमान आहेत.

४. साधक, संत, सदगुरु आणि परात्पर गुरु अन् त्यांचे निवासस्थान यांवर अधर्माच्या बाजूने लढणार्‍या वाईट शक्ती सततच सूक्ष्मातून आक्रमणे करत असतात. वाईट शक्ती साधकांच्या मनात अयोग्य विचार घालून त्यांचा आनंद नष्ट करत आहेत.

५. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना पंचतत्त्वांचे (अत्तर, कापूर, तीर्थ, विभूती, उदबत्ती, खोके इत्यादी) आणि नामजपाचे उपाय सांगितले आहेत. त्या माध्यमांतून त्यांनीच साधकांना अनिष्ट शक्तींशी लढायला शिकवले. ‘शेवटी जेथे धर्म आहे, तेथेच जय आहे’, हाच कुरुक्षेत्राचा संदेश आहे आणि तो निर्णायक काळ समीप येऊन ठेपला आहे.

– सौ. शालिनी मराठे


सर्व तीर्थे सद्गुरु चरणांशी असणे

श्रीगुरुचरणी सर्व तीर्थे एकवटलेली असतात. या न्यायाने रामनाथीला सप्ततीर्थे एकवटली आहेत.

१. पितृ तीर्थ : साधकांच्या अतृप्त पूर्वजांना गती मिळावी आणि साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत, यासाठी या ठिकाणी प्रत्येक वर्षी पितृपक्षात पितरांना गती देण्याच्या उद्देशाने महालय श्राद्ध केले जाते.

२. गुरु तीर्थ : या ठिकाणी परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकृपायोगानुसार साधना करून ११३ संत, सद्गुरु, परात्पर गुरु होऊन सहस्रो साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत. ईश्वरी कार्यासाठी आध्यात्मिक शक्ती प्राप्त करून देणार्‍या श्री गुरूंच्या निर्गुण पादुका येथे स्थापन करण्यात आल्या, ही गुरुकृपाच आहे.

३. शिव तीर्थ : या ठिकाणी अध्यात्मविषयक आणि त्या अनुषंगाने विविध विषयांवरील ज्ञानग्रंथांची निर्मिती अखंड चालू आहे. विश्वकल्याणासाठी आपत्काळातील संजीवनी ठरलेले अमूल्य आणि दुर्मिळ असे ग्रंथही उपलब्ध केले आहेत.

४. देव तीर्थ : येथे वेगवेगळ्या देवतांचे नामजप आणि ध्यान केले जाते. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी कठोर प्रयत्न करून साधकांमध्ये देवत्व येण्यासाठी गुणसंवर्धन प्रक्रिया राबवली जाते.

५. विष्णु तीर्थ : ही मोक्षनगरी असून प्रत्यक्ष विष्णूचा निवास असलेले वैकुंठधाम आहे. येथे कामनापूर्तीचा हेतू न ठेवता निष्काम साधना, म्हणजे ईश्वरप्राप्तीच्या हेतूने साधना केली जाते.

६. ब्रह्म तीर्थ : सर्व कलांचा हेतू ईश्वरप्राप्ती हा असून ‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हे येथे शिकायला मिळते. गायन, वादन, नृत्य, चित्रकला, मूर्तीकला या माध्यमांतून साधकांची साधना चालू आहे.

७. शक्ती तीर्थ : येथे श्रीयंत्र स्थापन केलेले आहे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे हे कार्यक्षेत्र आहे, तर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे प्रेरणा स्थान आहे. या दोन्ही महालक्ष्मीमातांचा इथे नित्य वास आहे.

– सौ. शालिनी मराठे


रामनाथी आश्रमावर निरर्थक टीका करणारे बुद्धीवादी !

रामनाथी आश्रम सर्व सुखसोयींनीयुक्त आहे. येथे स्नानासाठी गरम पाणी मिळावे; म्हणून ‘गीझर’ आणि ‘सोलर’ यंत्रणा आहे. पावसात पाय घसरून पडू नये; म्हणून कपडे वाळत घालायच्या आगाशीत पायांखाली ‘मॅटिंग’, जिन्यांना लाकडी कठडे, उद्वाहन यंत्र (लिफ्ट), उन्हात पायांना चटके बसू नयेत; म्हणून अधिक वापर असलेल्या गच्चीतील लादीवर उष्णताप्रतिबंधक पांढरा थर, पंखे, वातानुकूलित यंत्र (कूलर), शीतकपाटे, धुलाई यंत्रे, पोळ्यांचे यंत्र, भाजी चिरणे, खोबरे किसणे यांसाठी यंत्रे, ‘बेकरी’, अन्न शिजवण्यासाठी मोठे ‘बॉयलर’ अशा सर्व सुविधा वापरण्यात येतात.

हे सर्व पाहून काही जन्महिंदू आणि बुद्धीवादी यांनी ‘एका आध्यात्मिक संस्थेत इतक्या सुविधा कशाला हव्यात. मग साधक आळशी होणार, तपस्या करायची, तर कष्ट घ्यायलाच हवेत. हे कसले सनातनी !’ असे म्हणतांना मी ऐकले आहे. त्यांना सांगावेसे वाटते, ‘हिंदु धर्म विज्ञानाधिष्ठित असल्यामुळे हिंदु धर्माला विज्ञानाचे वावडे नाही. विज्ञानाचा योग्य वापर करणे अध्यात्माला अभिप्रेत आहेच. विज्ञान ईश्वराचे स्थान पटकावून ब्रह्मांडाचा स्वामी होऊ शकत नाही; मात्र ते चांगला सेवक होऊ शकते. ‘शक्ती अनाठायी व्यय न होता योग्य ठिकाणी ती वापरावी, यासाठी आम्हाला गुरुकृपेनेच सर्वकाही प्राप्त होत आहे’, असा आमचा भाव आहे.

– सौ. शालिनी मराठे


अन्य तीर्थक्षेत्रे आणि रामनाथी आश्रम

१. प्रशासनाचा हस्तक्षेप : धर्मनिष्ठेची जागा अर्थनिष्ठेने घेतल्यामुळे धर्माला ग्लानी आली आहे. सर्वधर्मसमभाव असलेले प्रशासन मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या अर्पणपेटीतील धन, देवाचे दागिने, तसेच भूमी या गोष्टींकडे लक्ष ठेवून धार्मिक स्थळे (तीही केवळ हिंदूंचीच) कह्यात घेत आहे आणि धार्मिक स्थळांचे धन राजकारणासाठी वापरत आहेत. धनावर दृष्टी ठेवून पर्यटनाच्या दृष्टीकोनातून सौंदर्य वाढवण्यावर भर दिला जाऊन परिसरातील छोटी-छोटी धर्मस्थळे (आदीस्थाने) पाडून सात्त्विकतेची हानी करत आहेत. सर्वधर्मसमभाव म्हणजे ‘हिंदू अन् हिंदूंचे देव-धर्म, परंपरा नकोत; पण देवाचे धन मात्र हवे’, अशी अहंभावी स्वार्थी वृत्ती आहे. निधर्मी प्रशासनामुळे देवत्वाचे (सात्त्विकता, चैतन्य अन् आनंद यांचे) रक्षण न होता तीर्थस्थळांना अवकळा आली आहे.

२. तीर्थस्थळांचा वापर पर्यटनस्थळे म्हणून करणे : तीर्थस्थळे ही साधना किंवा तपस्येची स्थळे न रहाता पर्यटनस्थळे बनल्यामुळे सात्त्विकता नष्ट होऊ लागली आहे. ९० प्रतिशत हिंदू जन्महिंदू असल्यामुळे आणि स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंना धर्मशिक्षण न मिळाल्याने त्यांना देव आणि धर्म यांची किंमत राहिली नाही. कर्महिंदूंचे संघटन आत्मबळ नसल्यामुळे अल्प पडत आहे. एकूणच हिंदू अतिसहिष्णू असल्यामुळे आणि त्यांनी धार्मिक स्थळांकडे पहाण्याचा अयोग्य दृष्टीकोन ठेवल्यामुळे सहस्रो हिंदू मौज-मजा करण्यासाठी खाण्या-पिण्याचे, अनिर्बंध वागण्याचे ठिकाण, म्हणजे पर्यटनस्थळ म्हणून धार्मिक स्थळी जातात. त्यामुळे तेथील रज-तम वाढते, सत्त्वगुण नष्ट होतो आणि देवत्व संपुष्टात येते.

३. अस्वच्छता : तीर्थक्षेत्री जाणारे प्रवासी तेथे फारच घाण करतात. कागद, प्लॉस्टिक कचरा, खराब खाद्यपदार्थ आणि अन्य कचरा टाकतात. त्यामुळे तेथे माशा घोंगावतात. स्वच्छतागृहे अल्प असतात, तेथे दुर्गंधी आणि पाण्याचा तुटवडा अशा गोष्टींमुळे तेथील देवत्व नष्ट झाले आहे.

४. सकाम भक्ती : अनेक भक्त हे सकाम भक्ती करणारे असतात. त्यांचे आपल्या कामनांकडेच अधिक लक्ष असते. त्यामुळे ‘तेथील देवत्व वाढण्यासाठी काय करायला हवे ?’, याचे चिंतन आणि प्रयत्न करण्यात भक्तही अल्प पडतात.

५. वित्तेषणा : काही ठिकाणी पैसे मागणे, हातातील पाकीट ओढणे, कपडे धरून ओढणे आणि न दिल्यास अभद्र बोलणे, असेही दृष्य दिसते. ‘पूर्वजांच्या नावाने लादी बसवा, अन्नदान करा’, असेही सांगितले जाते. त्यामुळे खर्‍या भाविकाला ‘येथे कशाला आलो ?’, असे वाटते. असा अनुभव श्रीकृष्णाच्या गोकुळातही काही भाविकांनी घेतला आहे.

६. रामनाथी आश्रमाचे वैशिष्ट्य : अशा प्रकारे अधिकांश तीर्थक्षेत्रांची सात्त्विकता घटत जाऊन त्यांना अवकळा येत आहे. त्याच वेळी रामनाथी आश्रमाची सात्त्विकता पौैर्णिमेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढत आहे, ही त्या श्रीमत् नारायणाची कृपाच आहे. वरील सर्व अपप्रवृत्तींपासून श्री गुरुच या स्थानाचे रक्षण करत आहेत !

– सौ. शालिनी मराठे


अनुभूती

‘वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेनंतर ‘रामनाथी आश्रम हे पवित्र तीर्थक्षेत्र बनले असून या क्षेत्रात जगभरातून यात्रेकरूंचे लोंढे येत आहेत’, असे मला २ – ३ वेळा सूक्ष्मातून दृश्य दिसले आणि माझा भाव जागृत झाला. त्यानंतर श्रीमन्नारायणा, तूच हा लेख लिहून घेतलास.

‘गुरुदेव, जेवढे दिसले तेवढे लिहिता आले नाही, अंशतः लिहिले. लिखाणातील अपूर्णतेसाठी क्षमा कराल ना ? परात्पर गुरु डॉक्टर, तुमच्या कृपेमुळेच या दिव्य तीर्थक्षेत्रात रहाण्याचे भाग्य आम्हा साधकांना मिळाले आहे, त्यासाठी आम्ही कृतज्ञ आहेत.’

– गुरुचरणी शरणागत,
सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, गोवा. (६.९.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक