सर्वाेत्तम शिक्षण कोणते ?
पू. डॉ. शिवकुमार ओझा (वय ८७ वर्षे) ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यातील ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. ११ जुलै २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘भारतीय संस्कृती’ हा सर्वोत्तम शिक्षणाचा भक्कम आधार असणे, मानवी जीवनाच्या बंधनांपासून मुक्ती मिळवण्यासाठीचे शिक्षण हवे आणि आधुनिक मान्यता आणि दोष यांविषयीची माहिती वाचली. आज त्यापुढील लेख पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/493877.html |
(भाग ५)
२. आधुनिक समाज, सभ्यतेच्या संकल्पना आणि दोष
२ इ. वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
२ इ १. या ग्रंथात प्रस्तुत केलेले विविध धारणांच्या संदर्भातील दोष हे वर्तमानातील वास्तव असणे : ‘सूत्र २ आ.’मध्ये विविध धारणांच्या संदर्भातील ज्या विभिन्न दोषांवर विचार करण्यात आला आहे, ते काल्पनिक नाहीत, तर ते वर्तमानातील वास्तव आहे, जे सर्व प्रचलित प्रसारमाध्यमांद्वारे उघडपणे घडत असल्याचे दाखवण्यात येते किंवा सांगितले जाते. पुष्कळशा लोकांनी ते स्वतः प्रत्यक्ष अनुभवले आहे आणि त्याच्या सत्यतेची निश्चिती केली आहे. काही आधुनिक घटना एवढ्या अनैतिक आणि निकृष्ट होत चालल्या आहेत की, त्यांची कल्पना करणेसुद्धा कठीण होत आहे.
२ इ २. भौतिक साधनसुविधा अखंड सुख न देता क्षणभंगुर सुख देत असणे आणि आपली स्वाभाविक इच्छा ‘अखंड सुख (आनंद) मिळावे’, ही असल्याने भारतीय संस्कृतीच्या दृष्टीकोनातून वारंवार येणारे सुखसुद्धा शेवटी दुःखरूपच असणे : ‘सूत्र २ आ.’च्या शीर्षकामध्ये आम्ही ‘दोष’ या शब्दाचा उपयोग केला आहे. ‘गुण-दोष’ या शब्दाचा उपयोग केलेला नाही. त्यामुळे आधुनिक व्यक्तीच्या मनात असाही विचार येऊ शकतो की, भोगवादी धारणांमुळे प्रेरित झालेल्या आधुनिक जीवनपद्धतीमध्ये काही गुणही असतील, उदा. भौतिक उपकरणांचा शोध आणि त्यांच्याद्वारे दैनंदिन जीवन सुलभ अन् सुखी बनवणे अन् भौतिक समृद्धी प्रदान करणे. या गोष्टी भौतिक दृष्टीकोनातून किंवा स्थूल रूपाने सत्य आहेत; परंतु आम्ही या ग्रंथात अगदी विचारांनाही भारतीय संस्कृतीचा दृष्टीकोन ठेवून सादर केले आहे. हा दृष्टीकोन विशाल असूनही सूक्ष्म आणि गूढ आहे. भौतिक साधनसुविधा (संसाधन) क्षणभंगुर सुख देतात, तसेच वारंवार येणारी-जाणारी सुख-दुःखे देत रहातात. त्यांपासून सातत्याने अखंड सुख कधीच मिळत नाही. भौतिक साधनसुविधा आपल्याला मोहित करून आपली आसक्ती वाढवतात. आपली आसक्ती एवढी वाढते की, तिच्यातून बाहेर पडणे अशक्यप्राय होते आणि याच सुख-दुःखांना आपण मानवी जीवनाचे अभिन्न अंग समजू लागतो. विचार करून पाहिले, तर असे दिसून येते की, आपली स्वाभाविक इच्छा ‘अखंड सुख (आनंद) मिळावे’, ही असते; म्हणून भारतीय संस्कृतीच्या दृष्टीकोनातून हे वारंवार येणारे सुखसुद्धा शेवटी दुःखरूपच आहे. यामध्ये तमोगुण असतो. त्यामुळे आम्ही ‘सूत्र २ आ.’च्या शीर्षकामध्ये ‘गुण-दोष’ हा शब्द न वापरता केवळ ‘दोष’ या शब्दाचाच वापर केला आहे.
२ इ ३. भौतिक शिक्षणामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असणे : आधुनिक काळात भौतिक गोष्टींचा उपभोग घेण्यामागील मनुष्याची आसक्ती एवढी वाढली आहे की, आधुनिक विद्वानांची विचारसरणीही यातून बाहेर निघू शकत नाही. हे भयंकर स्थिती उत्पन्न करत आहे. आपण सर्व स्पष्टपणे पहात आहोत की, मानवी जीवन दुराचाराच्या दिशेने चालले आहे. ही भयावह परिस्थिती आहे; परंतु ‘हे होण्यापासून रोखण्यासाठी आजच्या भौतिक शिक्षणामध्ये कोणत्या सुधारणा करायला पाहिजेत ?’, याचा खर्या (योग्य) अर्थाने विचारही कुणी करू शकत नाही. आधुनिक भौतिक शिक्षणाचे कर्णधार आणि आधुनिक विद्वान किंवा शास्त्रज्ञही यापुढे असमर्थ ठरले आहेत. जेव्हा आपण भारतीय संस्कृतीद्वारे प्रतिपादित केलेल्या विचारसरणींवर श्रद्धा ठेवू आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करून त्यांना कार्यान्वित करू, तेव्हाच आपल्याला या परिस्थितीतून बाहेर पडता येईल.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– (पू.) डॉ. शिवकुमार ओझा, ज्येष्ठ संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक
(साभार : ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/503123.html