समाजाचे खरे गुन्हेगार !
पॉर्न (अश्लील) चित्रपट बनवण्याच्या प्रकरणात राज कुंद्रा यांचे नाव समोर आल्याने चित्रपटसृष्टीत वावरणार्या श्रीमंत उद्योजकांची काळी बाजू पुन्हा एकदा समोर आली आहे. कुंद्रा यांची मानहानी झाली आहेच, समवेत अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई अनेक अर्थाने स्वागतार्ह आहे. या अटकेमुळे अनेक गोष्टींवर निदान थोडा वचक बसण्यास साहाय्य होऊ शकते. पॉर्न चित्रपटांच्या निर्मात्यांनाच कडक शासन झाले, तर मुळावर घाव घातला जाणार आहे. यातून ‘पोलीस या प्रकरणांवर अशी धडक कारवाई करू शकतात’, हा चांगला संदेश समाजात गेला आहे.
राज कुंद्रा यांच्या अटकेच्या प्रकरणात २ सूत्रे लक्षात घेतली पाहिजेत. एक म्हणजे कुंद्रा यांचे राजकारण्यांशी संबंध असल्याचे पुढे येत आहे. दुसरे म्हणजे त्यांची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचा या प्रकरणाशी असलेला संबंध. त्या अश्लील चित्रपट बनवणार्या आस्थापनाच्या व्यवस्थापक पदावर कार्यरत होत्या, असे पुढे आले आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टी नवर्याच्या या धंद्याविषयी अनिभिज्ञ होत्या, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टी यांना कितीही निर्दाेष ठरवण्याचा प्रयत्न केला, तरी अनेक वर्षे चाललेल्या या व्यवसायात त्यांचा हात नाही, यावर कसा विश्वास ठेवायचा ? यावरून ‘अशा कलाकारांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असतात’, हेही लक्षात येते. पॉर्न चित्रपट बनवण्याच्या धंद्यात युवतींना फसवून आणले जात होते. शिल्पा शेट्टी यांना हे ठाऊक नव्हते कि त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले ? स्त्रियांची फसवणूक होत असतांना स्त्रीच गप्प रहाते, हे संतापजनक होय. महत्त्वाचे म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्त्रीमुक्तीवाल्यांची कमतरता नाही. तरी याविषयी कुणीही ‘ब्र’ काढत नाही, हेही येथे लक्षात घ्यायला हवे.
अश्लील चित्रपटावरील पूर्ण बंदीचे अपयश
अश्लील चित्रपट पाहून लैंगिक गुन्हेगार निर्माण होतात, तसेच देशाच्या भावी पिढीची अतोनात हानी होते आणि समाजाचे स्वास्थ्यही बिघडते. अश्लील चित्रपटांची निर्मिती करणारे समाजाचे किती मोठ्या प्रमाणात अपराधी आहेत, याची कल्पना आपण करू शकतो. ‘अश्लील चित्रपटांमुळे लैंगिक गुन्हे वाढतात’ अशी एका अधिवक्त्याने न्यायालयात याचिका प्रविष्ट केल्यानंतर अशांवर बंदी घालण्यासाठी ८२७ इंटरनेट आस्थापनांची सूची बनवण्यात आली होती. तेवढाच जोर लावून असे चित्रपट बनवणार्यांना अटक करून कठोर शिक्षा झाली असती, तर हे गुन्हे थांबायला अधिक वेगाने साहाय्य झाले असते. वर्ष २०१५ मध्ये मोदी सरकारने ‘पॉर्न फिल्म्स’वर बंदी घातल्यावर आंबटशौकीन, तसेच बिघडलेल्या तरुण पिढीकडून एका आठवड्यात सरकारवर इतकी टीका केली गेली की, त्या विरोधानंतर संपूर्ण पॉर्न चित्रपटांवरची बंदी उठवून सरकारने केवळ मुलांच्या संदर्भातील ‘पॉर्न’ चित्रपटांवर बंदी घातली. ज्या थोड्या जनतेला अश्लील चित्रपट पहाण्याचे स्वातंत्र्य हवे आहे, त्यांच्यासमोर त्याला विरोध करणार्यांचा काही जोर चालला नाही.
कुंद्रा यांची कुकृत्ये !
गहना वसिष्ठ या अश्लील चित्रपट निर्मितीत सहभागी असणार्या अभिनेत्रीला अटक झाल्यावर कुंद्रा यांचे नाव यावर्षीच्या फेब्रुवारी मध्ये पुढे आले. तेव्हापासून पोलिसांनी या प्रकरणातील त्यांच्या सहभागाचे सर्व तांत्रिक पुरावे नेटाने गोळा करूनच अटकेची कारवाई केली. मागील वर्षीही याच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात ते जामिनावर सुटले. सध्या भारतात अश्लील चित्रपट बनवणे हा गुन्हा असला, तरी बनवणार्यांनी अनेक पळवाटा शोधल्या आहेत. कायद्याने त्या तशा ठेवल्या आहेत, असेही म्हणू शकतो. कुंद्रा यांच्या आस्थापनाने बनवलेले साहित्य हे इंग्लंडमधील विदेशी आस्थापन ‘केनरीन’ आणि तेथीलच ‘हॉट शॉट्स’ यांना हे ‘ॲप’ विकले जात होते. संबंधित ‘ॲप’ पोलीस बंद करणार हे त्यांना ठाऊक असल्याने त्यांनी दुसरे ॲपही चालू करून पर्यायी व्यवस्थाही निर्माण केली होती.
राज कुंद्रा यांच्या गुन्हेगारीचा इतिहास या प्रकरणानंतर प्रकर्षाने पुढे आला. काही कलाकार त्यांची काळी कृत्ये सांगण्यास पुढे सरसावले. कलाकारांसमवेत ते अशा प्रकारे करारपत्र करायचे की, त्यांना आर्थिक, नैतिक आणि मानसिक दृृष्ट्या त्रास देऊन त्यांना अश्लील चित्रपटात काम करायला भाग पाडले जायचे. ‘हिट अँड रन’सारख्या प्रकरणांमध्ये पूर्वी कुंद्रा यांचे नाव पुढे आले होते. वर्ष २००९ मध्ये ‘आय.पी.एल्.’ क्रिकेट सामन्यांच्या वेळी सट्टेबाजीत त्यांचे नाव पुढे आल्यावर त्यांनी गुन्हा मान्यही केला होता; परंतु त्यांना अटक होऊ शकली नाही. २ सहस्र कोटींच्या ‘बीटकॉन’ घोटाळ्यात कुंद्रा यांचे नाव आले होते. यांसारखे अन्यही गुन्हे त्यांच्यावर असूनही आतापर्यंत त्यांना अटक होऊ शकली नव्हती. यामागची कारणे शोधून त्याच्याही मुळाशी जायला हवे.
पूर्वी अनेक घोटाळे आणि गुन्हे करून पैसे आणि ‘पॉवर’ यांच्या जोरावर कुंद्रा यांनी सारी प्रकरणे दाबली; परंतु म्हणतात ना जसे ‘१०० अपराध भरल्यावरच देव शिक्षा करतो’, त्याप्रमाणे शेवटी आता प्रकरण अटकेपर्यंत गेले. अटक केल्यावरही कुंद्रा हे ‘काही झालेच नाही’ अशा प्रकारे माध्यमांपुढे नमस्कार आणि काहीबाही मुद्रा करत होते. आताही त्यांची पत्नी मोठे अधिवक्ते आणि राजकारणी यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.
पूर्वी कुंद्रा यांचे नाव श्रीमंत व्यक्तींच्या एका सूचीत आले होते; परंतु अधिकाधिक श्रीमंत होण्याची हाव कुंद्रा यांना समाजविघातक कृत्यांकडे घेऊन गेली. एका दिवशी १० लाख रुपये पर्यंत कमावणारे कुंद्रा हा अनैतिक आणि अश्लील धंदा अधिकाधिक वाढवून शेवटी ‘ऑनलाईन’ पॉर्न चित्रपटांचे जाळे पसरवण्याचा त्यांचा मानस होता. समाजाची हानी करून श्रीमंत होऊ पहाणार्या अशा समाजविघातक गुन्हेगारांना हिंदु राष्ट्रात यत्किंचितही स्थान नसेल !