सनातन संस्थेच्या साधक विद्यार्थ्यांचे १० वीच्या परीक्षेत सुयश !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्या पालकांना ते त्यांच्या पाल्यांकडे दुर्लक्ष करतात, असे म्हणणार्यांना चपराक !
पुणे – यंदाच्या १० वीच्या परीक्षेत सनातन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून सुयश संपादन केले. या यशाचे श्रेय त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांना दिले आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाला आरंभ करण्यापूर्वी प्रार्थना-कृतज्ञता व्यक्त करणे, नामजपादी उपाय असे आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्नही केले. या सुयशाचा वृत्तांत आणि साधकांचे मनोगत येथे देत आहोत.
१. कु. आर्य प्रवीण नाईक, कोथरूड (९७.८० टक्के)
गणित आणि विज्ञान या विषयांत १०० पैकी ९९ गुण मिळवून कु. आर्य शाळेत तिसरा आला आहे. या यशाविषयी तो म्हणाला, मी नियमित नामजप करून मंत्रउपाय आणि स्तोत्र ऐकले, तसेच अभ्यासाला बसण्यापूर्वी अन् बसल्यानंतर प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त केली. संपूर्ण वर्षामध्ये अथर्वशीर्षही नियमित म्हटले. आत्मविश्वास अल्प असल्याने वर्गात उत्तर देत नव्हतो; पण त्यावर स्वयंसूचना घेऊन प्रयत्न केले. अभ्यास साधना म्हणून केल्याने मन शांत होते. २७ एप्रिलच्या परीक्षेच्या वेळी आम्ही घरातील सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह होतो; मात्र कोरोना संसर्गाची स्थिती न पालटल्याने परीक्षा रहित झाली. तेव्हा गुरुदेवांनी या कठीण काळात काळजी घेतल्याविषयी कृतज्ञता वाटली. कु. आर्य व्यष्टी साधनेसह सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे, तसेच धर्मसभेच्या सेवा यांतही सहभागी होता.
२. कु. संजना संकेत कुलकर्णी, कोथरुड (९५.८० टक्के)
कु. संजनाची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के आहे. ती नियमित नामजप, प्रार्थना-कृतज्ञता करत असे. यांसह कापूर-अत्तराचे उपाय करणे, स्वत:वरील त्रासदायक आवरण काढणे हे उपायही करत असे. व्यष्टी साधना करण्यासह कु. संजना समष्टी साधना म्हणजेच सेवाही करते. (होस्टींग आणि स्क्रीन शेअरिंग ही सेवा तिच्याकडे आहे.)
३. कु. प्रतीक विष्णू जाधव, पिंपरी (९४.४० टक्के)
कु. प्रतीक प्रार्थना-कृतज्ञता यांसह नियमित नामजप करत असे. तसेच प्रासंगिक सेवांतही तो सहभागी होत असे. वर्ष २०१५ मध्ये त्याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असल्याचे घोषित करण्यात आले होते.
४. कु. मोक्षदा राजेश नाफडे, तळेगाव (९०.४० टक्के)
कु. मोक्षदा कुलदेवीचा नियमित नामजप करण्यासह अभ्यासाला बसण्याआधी प्रार्थना आणि अभ्यास संपल्यावर कृतज्ञता व्यक्त करत असे. ती नामजप सत्संगात नामजप म्हणवून घेणे आणि फलकप्रसिद्धीशी संबंधित सेवाही करते.
५. कु. सहर्षा सचिन मदकुडे, सिंहगड रस्ता (८८.४ टक्के)
कोरोनाच्या काळात साधनेचे प्रयत्न वाढवून अभ्यास केला. परीक्षेपूर्वी गणपति आणि सरस्वतीदेवी यांना प्रार्थना करणे, तसेच कठीण प्रश्नांची उत्तरे देवाचे साहाय्य घेऊन लक्षात ठेवणे, असे प्रयत्न केले. अभ्यास साधना म्हणून होण्यासाठी देवाला सतत प्रार्थना होत असे. तोंडी परीक्षेपूर्वी श्रीकृष्णाला प्रार्थना केल्याने आत्मविश्वासाने उत्तरे देता आली. प्रतिदिन वेगवेगळे भावप्रयोग करून अभ्यास केल्याने गुरुमाऊलींच्या कृपेने हे यश मिळाले, असे मनोगत कु. सहर्षा मदकुडे हिने व्यक्त केले.
६. ऋषिकेश सुधीर तावरे, कोथरूड (८६.८० टक्के)
ऋषिकेश सुधीर तावरे अभिनव विद्यालय हायस्कूलमध्ये शिकत होता. कु. ऋषिकेश याने सांगितले की, काही वेळा पुष्कळ अभ्यास असल्यास मला ताण येऊन नकारात्मक विचार यायचे, तसेच डोके जड व्हायचे. त्या वेळी ही अडचण माझे आजोबा पू. रमेश गडकरी (सनातनचे संत) यांना सांगायचो. ते मला विशिष्ट नामजप, विशिष्ट न्यास करण्यास सांगायचे. नामजप केल्यानंतर माझा सर्व ताण आणि नकारात्मक विचार नष्ट होऊन मला उत्साह जाणवत असे. श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यामुळे मला अभ्यासातील अवघड सूत्राचेही सहजतेने आकलन व्हायचे. त्या वेळी श्रीकृष्णानेच अवघड विषय सोपा केला, असे मला वाटते.