सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती : २९० कुटुंबांचे स्थलांतर
|
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ दिवस अतिवृष्टीमुळे हाहा:कार माजला आहे. सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी डोंगर खचले, तर काही ठिकाणी छोटे पूल वाहून गेले. घरे आणि गोठे यांची हानी झाली आहे. पूरस्थितीने अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला आहे, तर भातशेती पाण्याखाली गेली आहे. कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे, तर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक पूर्णत: कोलमडली आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या तिलारी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना पुढील ५ दिवस सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी कणकवली, वैभववाडी आदी पूरग्रस्त भागांना भेट देऊन पहाणी केली.
वागदे येथे पुलावर गडनदीचे पाणी आल्याने मुंबई-गोवा महामार्ग बंद
कणकवली – कणकवली तालुक्यात नाटळ, जाधववाडी येथे ५ घरांना पुराचा वेढा पडला आहे. निम्मेवाडी, गवळदेव येथे रहात असलेल्या कातकरी कुटुंबियांच्या झोपड्यांमध्ये जानवली नदीच्या पुराचे पाणी घुसले. अचानक पाणी आल्याने घरातील व्यक्तींनी स्वतःचा जीव वाचवला; मात्र घरातील साहित्य वाहून गेले. कणकवली-कनेडी-नरडवे मार्गावरील नाटळ येथील मल्हार नदीवरील पूल २२ जुलैला रात्री अतीवृष्टीमुळे कोसळला. मुंबई-गोवा महामार्गावर वागदे येथे पुलावर गडनदीचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. गडनदीचा उगम असलेल्या दिगवळे गावातील रांजणवाडीत मातीच्या घरावर दरड कोसळून १ महिला ठार झाली, तर घरातील अन्य घायाळ झाले आहेत.
जैनवाडी, खारेपाटण येथील सुमारे १५ घरांत पुराचे पाणी
खारेपाटण गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून खारेपाटण जैनवाडी येथील सुमारे १५ घरे पुराच्या पाण्यात आहेत. प्रशासनाने या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.
बांदा, माडखोल, धवडकी, ओटवण आणि इन्सुली या गावांत हानी
सावंतवाडी – तालुक्यात बांदा, माडखोल, धवडकी, ओटवण आणि इन्सुली या गावांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला. अनेकांची घरे आणि दुकाने यांमध्ये पाणी शिरले. झाराप-पत्रादेवी मार्गावर इन्सुली, खामदेव येथे घरे पाण्याखाली गेली आहेत. इन्सुली, बिलेवाडी येथे ग्रामस्थ घरात अडकले आहेत. शिरशिंगे-गोठवेवाडी येथील डोंगराचा काही भाग खचला आहे. काही ठिकाणी घरांच्या भिंतींची पडझड झाली, तर पोल्ट्री व्यावसायिकांच्या कोंबड्या वाहून गेल्याने हानी झाली आहे.
सांगेली परिसरात नदीच्या पुराचे पाणी धवडकी बाजारपेठेतील दुकाने आणि घरे यांमध्ये घुसले. आंबोली घाटात ढगफुटी झाल्यामुळे गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच एवढा मोठा पूर आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये गुडघाभर पाणी घुसल्याने संपूर्ण संगणकप्रणाली बंद पडली असून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे, तसेच काही रिक्शा वाहून गेल्या आहेत.
आंबोली घाटात २२ जुलैला दरड कोसळली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. २३ जुलैला प्रशासनाने दरड हटवून वाहतूक पूर्ववत् केली आहे.
वैभववाडी – भुईबावडा घाटातील धोका अधिकच वाढला आहे. घाटमार्गात तब्बल १०० मीटर अंतरात असलेली भेग अतीवृष्टीमुळे पुष्कळ रुंद झाली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी हा घाट खचण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
कुडाळ – तालुक्यातील पणदूर गावाला लागून असलेल्या हातेरी नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नदीकिनारी असलेल्या सिद्धार्थनगर, साईलवाडी, सावंतवाडा आदी वाड्यांना पुराच्या पाण्यापासून धोका निर्माण झाल्याने सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. साईलवाडी येथील ग्रामदेवता श्री सातेरीदेवीच्या मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. पाण्याची पातळी न्यून न झाल्यास ३० ते ३५ कुटुंबांना स्थलांतर करण्याची सिद्धता ग्रामपंचायत प्रशासनाने केली आहे.
२९० कुटुंबांचे स्थलांतर
जिल्ह्यातील एकूण २९० कुटुंबांतील १ सहस्र २७१ व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या चेतावणीनुसार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे. जिल्ह्यामध्ये सावंतवाडी आणि दोडामार्ग या २ ठिकाणी ‘एन्.डी.आर्.एफ्.’चे (राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे) पथक साधनसामग्रीसह येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
कोकणात कायमस्वरूपी आपत्कालीन यंत्रणार उभारणार ! – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन विकासमंत्री, महाराष्ट्र
मुंबई – अतीवृष्टीच्या प्रसंगात कोकणात वारंवार येणारी पूरपरिस्थिती लक्षात घेता कायमस्वरूपी आपत्कालीन यंत्रणा उभारण्यासह संपूर्ण कोकणातील वीजवाहिन्या भूमीगत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ३ सहस्र ७०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, असे महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.