सातारा रस्ता (जिल्हा पुणे) येथील साधकांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी आलेल्या अनुभूती !
कोरोनामुळे दळणवळण बंदी असतांना वर्ष २०२० ची ही गुरुपौर्णिमा ‘ऑनलाईन’ पार पडली. साक्षात् श्रीविष्णुरूपी कृपाळू गुरुमाऊलीने केवळ आणि केवळ साधकांवर असलेल्या अपार प्रीतीमुळे प्रत्येक साधकाला घरामध्ये अन् स्वतःच्या हृदयामध्ये या वर्षीची गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा अनुभव घेत सोहळ्याचा आनंद अनुभवता आला. गुरुपौर्णिमेच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ सेवांमध्ये, तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी साधकांनी अनुभवलेला गुरुकृपेचा वर्षाव अनुभूतींच्या रूपात येथे देत आहोत.
सौ. संगीता घोळे
१. अनेक कठीण कौटुंबिक प्रसंगांतही केवळ गुरूंच्या कृपेने साधनेत टिकून रहाणे
‘या वर्षीची गुरुपौर्णिमा माझ्या जीवनातील अनमोल कृतज्ञतेने भरलेली होती. वर्ष २०१६ पासून प्रत्येक दिवशी मला गुरुदेवांची आठवण येत होती. या काळात अनेक कठीण कौटुंबिक प्रसंग आले. केवळ गुरूंच्या कृपेने मी साधनेत टिकून राहिले आणि गुरुकृपेने ‘आता गुरुचरणांविना काही नको’, हा बुद्धीचा निश्चय झाला.
२. गुरूंनी साधकांच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीतही साधना करण्यास शिकवणे
या कालावधीत माझी शारीरिक आणि मानसिक स्थिती ढासळली होती. प.पू. गुरुदेवांच्या साधकरूपी समष्टी रूपाने मला त्या स्थितीतून बाहेर काढले. ‘प्रतिकूल परिस्थितीतही कशी साधना करायची ?’, हे त्यांनी शिकवले आणि त्यातून गुरुदेवांची प्रीती वेळोवेळी अनुभवता आली.
३. ‘आपली प्रार्थना देवापर्यंत पोचत आहे का ?’, असे वाटणे आणि गुरुपौर्णिमेच्या आधीच प्रगतीची घोषणा होणे
मागील ६ मासांत सौ. मनीषा पाठक घेत असलेल्या ‘गुरुलीला’ या सत्संगातून गुरुमाऊली प्रतिदिन मला बोटाला धरून साधनेत पुढे नेत आहे, साधकांच्या प्रयत्नांतून शिकवत आहे, माझ्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न करवून घेत आहे’, हे जाणवत होते. तरीसुद्धा ‘माझी प्रार्थना आणि कृतज्ञता गुरुमाऊलीच्या चरणी पोचते का ? गुरुमाऊली मला कधी जवळ घेईल ?’, असे विचार माझ्या मनात यायचे. गुरुपौर्णिमेच्या आधीच त्यांनी माझ्यावर त्यांच्या कृपेचा वर्षाव केला. (साधिकेची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करण्यात आली. – संकलक) याप्रती किती कृतज्ञता व्यक्त करू ? काहीच कळत नाही माऊली ! माझी ती पात्रताच नाही.
‘गुरुदेव, आता मला साधनेत पुढे पुढे जायचे आहे. आपल्या चरणांची धूळ होऊन रहायचे आहे. आता कुठे साधनेला आरंभ झाला आहे. आपणच या जिवाकडून तुम्हाला अपेक्षित असे प्रयत्न करवून घ्यावेत, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
सौ. दीपाली तळेकर
१. सकाळी उठल्यापासूनच ‘गुरुदेव आपल्या समवेत आहेत. प्रत्येक कृती तेच करून घेत आहेत’, असे जाणवणे
‘या वर्षीची गुरुपौर्णिमा पुष्कळ वेगळी आणि चैतन्यदायी वाटली. सकाळी उठल्यापासूनच ‘गुरुदेव आपल्या समवेत आहेत. प्रत्येक कृती तेच करवून घेत आहेत’, असे मला जाणवले. सौ. मनीषा पाठक यांनी ‘गुरुलीला’ सत्संगामध्ये सेवेची व्याप्ती छान सांगितली. त्यानुसार देवाने नियोजन करून घेतले. पूजेसाठी लागणारी फुले, तोरण करण्यासाठी आंब्याची पाने जवळच बागेत मिळाली. तुळस आणि चाफा यांचा हार बनवून पूजेमध्ये प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र असलेल्या छायाचित्रमय ग्रंथाला घातला. काही वेळाने तो हार एका बाजूने खाली घसरला. मी तो परत लावला, तर अजून काही वेळाने तो खाली आला. तेव्हा ‘प.पू. गुरुदेव माझ्याशी काहीतरी बोलत आहेत’, असे मला वाटले.
२. तळमळीने प्रार्थना केल्याने मनातील विचारांचा गोंधळ थांबणे
त्या दिवशी यजमानांनी आमच्या आस्थापनाची ‘ऑनलाईन कमिटी मीटिंग’ आयोजित केली होती. त्या वेळी मनामध्ये विचारांचा गोंधळ चालू झाला; परंतु देवाने मला स्थिर ठेवून कार्यक्रम पहाण्यामध्ये कोणतेही अडथळे येऊ नये, यासाठी माझ्याकडून तळमळीने प्रार्थना करवून घेतली. यजमानांना विरोध न केल्याने तेही दुखावले गेले नाहीत आणि मलाही दोन्ही गोष्टींमध्ये अडथळे न येता यजमानांच्या इच्छेनुसार वागता आले. हे केवळ गुरूंच्या कृपेमुळेच शक्य झाले. घरातही पुष्कळ आनंद जाणवत होता. सकाळचा सोहळा संपन्न झाल्यानंतर लगेचच ५ मिनिटे पुष्कळ जोराने पावसाची सर आली. त्या वेळी ‘प.पू. गुरुदेवांनी त्या माध्यमातून आशीर्वाद दिला’, असे वाटले.
३. ‘गुरुदेव आपल्यासाठी अखंड किती करत आहेत’, हे लक्षात येऊन कृतज्ञता वाटणे
संध्याकाळचा सोहळाही पूर्ण ऐकता आला. ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया मनापासून केली, तरच गुरुकृपा होणार आहे’, याची जाणीव झाली. त्यामध्ये मी अत्यल्प पडते, असे वाटून खंत वाटली, तरी ‘गुरुदेव अखंड आपल्यासाठी किती करत आहेत’, हे लक्षात येऊन कृतज्ञता वाटली. गुरुमाऊलीने दिलेल्या या आनंदाप्रती त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |