रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मंगलहस्ते गुरुपूजन !
‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ होण्यासाठी गुरुचरणी भावपूर्ण आवाहन
रामनाथी (गोवा) – सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मंगलहस्ते गुरुपूजन करण्यात आले. या वेळी चेन्नई, तमिळनाडू येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार ‘भगवान श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांना नमस्कार करतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’, अशा एकत्रित वैशिष्ट्यपूर्ण चित्राचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी षोडशोपचारे पूजन केले. या वेळी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रातीशीघ्र व्हावी’, ‘सर्व साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, तसेच ‘सर्व संकंटांचे निवारण व्हावे’, यासाठी आवाहन करण्यात आले. सनातन पुरोहित पाठशाळेचे श्री. मंदार मणेरीकर यांनी गुरुपूजन सांगण्याची सेवा केली, तर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या समन्वयक कु. तेजल पात्रीकर यांनी सूत्रसंचालन केले. सनातनच्या सर्वत्रच्या साधकांनी संगणकीय प्रणालीद्वारे गुरुपूजनाचा लाभ घेतला. साधकांनी या पूजनाच्या माध्यमातून गुरुदेव परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रत्यक्ष पूजन करत असल्याची चैतन्यदायी अनुभूती घेतली. आपत्काळात पूर्वीप्रमाणे सामूहिक गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करता आला नसला, तरी श्रीगुरु करत असलेल्या अनन्य कृपेविषयी साधकांनी या मंगलप्रसंगी मनोमन भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली.
यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मंगलहस्ते ‘धर्मकार्य हेतु विज्ञापन आदि अर्पण प्राप्त करना समष्टि साधना है !’ या सनातनच्या हिंदी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर धर्मप्रचारकांनी ऑनलाईन माध्यमातून साधनेविषयी मार्गदर्शन केले.
(या संदर्भातील अन्य वैशिष्ट्यपूर्ण माहिती लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)