गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित राहिल्यावर साधिकेला भाव जागृत झाल्याची अनुभूती येणे
१. गुरुपौर्णिमा महोत्सवात पूजन चालू असतांना आध्यात्मिक लाभ होणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला पुणे येथे वर्ष २०१९ मध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित राहून सेवा करण्याची संधी मिळाली. गुरुपूजनाच्या वेळी मला सतत जांभया येत होत्या. ‘पूजा होत असतांना मला आध्यात्मिक लाभ होत आहेत’, असे मला वाटले. गुरुपूजनानंतर श्री गुरूंची आरती करण्यासाठी उपस्थितांना उभे रहायला सांगण्यात आले. त्या वेळी मला अनाहतचक्राच्या स्थानी संवेदना जाणवत होत्या.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव दाटून येणे
आरती झाल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये सांगण्यात आली आणि त्यानंतर एक भजन लावण्यात आले. भजन ऐकतांना मला माझ्या अनाहतचक्राच्या स्थानी विशिष्ट संवेदना जाणवू लागल्या आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. माझ्या मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती पुष्कळ भाव दाटून येत होता. मी ज्या वेळी डोळे मिटत होते, त्या वेळी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने आयोजित केलेल्या कार्यशाळेत मी उपस्थित असतांना एका संतांशी झालेल्या भेटीतील प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर येत होते. त्यामुळे मी डोळे मिटून घेतले होते. माझ्या डोळ्यांतून सतत अश्रू वहात होते.
३. ‘या वेळी गुरुपरंपरेचे पूजन केल्याने कार्यक्रमात अधिक चैतन्य असल्याने अनेक गत जन्मांची चित्तशुद्धी झाली,’ असे एका साधिकेने सांगणे
सायंकाळी कार्यक्रमाची सांगता होत असतांना एका ६० टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या काकूंना मी दिवसभरात मला आलेले अनुभव सांगितले. त्या वेळी त्यांनी ‘या वेळी गुरुपरंपरेचे पूजन केल्याने कार्यक्रमात अधिक चैतन्य होते. त्यामुळे अनेक गत जन्मांची चित्तशुद्धी झाली,’ असे सांगितले. हे ऐकल्यानंतर मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. मला गुरुपौर्णिमा कार्यक्रमाची सेवा करायची संधी मिळाली. संपूर्ण दिवस मला आनंद होत होता आणि माझ्या मनातील विचारांचे प्रमाण अत्यल्प होते. या अनुभूतीविषयी मी श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्रीमती अमृता निवर्गी, भारत (२४.७.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |