मुलीच्या मैत्रिणींवरही मुलीप्रमाणेच निरपेक्ष प्रेम करणार्या सौ. सुधा जोशी !
कु. पूनम साळुंखे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि कु. सोनल जोशी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) या दोघी रामनाथी आश्रमात एकाच खोलीत रहातात. त्या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. कु. पूनम यांना कु. सोनल यांची आई सौ. सुधा जोशी यांच्याविषयी जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.
१. मुलीसह तिच्या मैत्रिणींसाठीही वस्तू खरेदी करणे
‘सोनलताई तिच्या आईला ‘मां’ म्हणते. आमची त्यांच्याशी ‘सोनलताईची आई’ म्हणून ओळख झाली असली, तरी त्या आता माझ्या आणि आमच्या खोलीतील साधिकांच्या ‘मां’ झाल्या आहेत. एखादी वस्तू घेतांना आईला मुलीची आठवण होणे स्वाभाविकच आहे; पण ‘मुलीच्या समवेत मुलीच्या मैत्रिणींचीही आठवण होणे’, हे विशेष असून ‘मां’चे हे वैशिष्ट्य आहे. त्या सोनलताईसाठी काही वस्तू घेतांना केवळ माझ्यासाठीच वस्तू घेत नाहीत, तर तिच्या खोलीत रहाणार्या आम्हा सर्वांसाठी कपडे, बांगड्या किंवा चप्पल अशा काही ना काही वस्तू विकत घेतात. त्यांचे आमच्यावर निरपेक्ष प्रेम आहे; कारण कधी कुणी साधिका त्यांच्याशी बोलली किंवा बोलली नाही, तरी त्यांचे आमच्यावरील प्रेम न्यून होत नाही.
२. ‘सोनलच्या आई सोनलच्या मैत्रिणीसह इतरांनाही वस्तू देतात’, हे कळल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांचे कौतुक करणे
एकदा माझ्या हातातील बांगड्यांविषयी मला विचारल्यावर ‘या बांगड्या सोनलताईच्या आईने मला दिल्या आहेत’, असे सांगितल्यावर त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी मला विचारले, ‘‘तू सोनलची मैत्रीण म्हणून त्यांनी केवळ तुला बांगड्या दिल्या कि त्या इतरांनाही देतात ?’’ तेव्हा ‘त्या इतरांनाही देतात’, असे सांगितल्यावर त्यांनी त्यांचे पुष्कळ कौतुक केले.
३. काटकसरी
त्या घरातील प्रत्येक वस्तू योग्य पद्धतीने आणि काटकसरीने वापरतात. त्या इतरांनाही वस्तू तशा प्रकारे वापरायला प्रेमाने शिकवतात. त्या कुठल्याही पदार्थाचा एक कणही वाया जाऊ देत नाहीत; कारण परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अन्न वाया घालवलेले आवडत नाही. लिंबू पिळून झाल्यावर त्या त्याच्या सालींचेही लोणचे बनवतात.
४. श्रद्धा
घरी पुष्कळ अडचणी असूनही परम पूज्यांच्या प्रती असलेल्या श्रद्धेमुळे त्यांनी सोनलताईला पूर्णवेळ साधना करण्याची अनुमती दिली. सोनलताईला लग्नासारख्या मायेच्या बंधनात अडकायचे नव्हते. त्या निर्णयासाठीही त्यांनी तिला खंबीरपणे पाठिंबा दिला.
५. देवता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणे
त्यांचा देवता आणि परम पूज्य यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. त्यांच्यातील भावामुळे त्यांना आजपर्यंत ‘देवाने त्यांच्या अडचणी सोडवणे, त्यांची प्रार्थना देवापर्यंत पोचल्याची प्रचीती मिळणे, त्यांचे आणि कुटुंबियांचे रक्षण होणे, देवता किंवा परात्पर गुरु डॉक्टर यांचे दर्शन होणे’, अशा प्रकारच्या अनेक अनुभूती आल्या आहेत.
‘परात्पर गुरु डॉक्टर, आम्हाला आईप्रमाणे प्रेमळ काकू दिल्याविषयी आम्ही आपल्या चरणी कृतज्ञ आहोत. ‘त्यांचे गुण आमच्यात आणण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न करवून घ्यावेत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– कु. पूनम साळुंखे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.६.२०२१)