आषाढ मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व
‘११.७.२०२१ या दिवसापासून आषाढ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, ग्रीष्मऋतू, आषाढ मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. अशून्यशयन व्रत : आषाढ कृष्ण पक्ष (वद्य) द्वितीया या दिवशी ‘अशून्यशयनव्रत’ केले जाते. या वर्षी ही तिथी २५.७.२०२१ या दिवशी आहे. या दिवशी शेषशय्येवर विराजमान झालेल्या श्रीवत्स चिन्हांकित चार भुजांनी युक्त आणि लक्ष्मीसहित विराजमान झालेल्या श्री नारायणाची पूजा करतात. या दिवशी दिवसभर मौन पाळावे. दिवसभर अखंड श्री नारायणाच्या अनुसंधानात रहावे. चंद्रोदयानंतर अर्घ्य देऊन भोजन करावे. ‘या व्रताने घरावरील संकट टळते आणि अखंड सौभाग्यसुख मिळते’, असे भविष्यपुराणात सांगितले आहे. हे व्रत आषाढ मासापासून मार्गशीर्ष मासापर्यंत प्रत्येक मासातील वद्य द्वितीयेस करावे.
२ आ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळाला ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांना विलंब होण्याचा संभव असतो. २६.७.२०२१ या दिवशी दुपारी ३.२५ पासून उत्तररात्री २.५५ पर्यंत आणि २९.७.२०२१ या दिवशी उत्तररात्री ३.५५ पासून ३०.७.२०२१ या दिवशी सायंकाळी ४.४४ पर्यंत विष्टी करण आहे.
२ इ. अंगारक संकष्ट चतुर्थी : प्रत्येक मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ‘संकष्ट चतुर्थी’ असे म्हणतात. मंगळवारी येणार्या चतुर्थीला ‘अंगारक योग’ म्हणतात. ज्या दिवशी चंद्रोदयसमयी चतुर्थी तिथी असते, त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा उपवास करतात; कारण श्री गणपतीच्या या व्रतामध्ये चंद्रदर्शन होणे विशेष महत्त्वाचे आहे. मंगळवार, २७.७.२०२१ या दिवशी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री ९.५९ ही आहे. या दिवशी श्री गणेश मंत्राचा जप करावा. या दिवशी अथर्वशीर्ष, श्री गणेशस्तोत्र, श्री गणेश अष्टोत्तरशत नामस्तोत्र वाचतात. या उपासनेने सर्व कार्ये सिद्ध होतात.
२ ई. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. २७.७.२०२१ या दिवशी सकाळी १०.१४ पासून उत्तररात्री २.२९ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ उ. दग्ध योग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्ध योग होतो. दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. २७.७.२०२१ या दिवशी मंगळवार असून उत्तररात्री २.२९ पासून पंचमी तिथी असल्याने सूर्याेदयापर्यंत ‘दग्ध योग’ आहे. २९.७.२०२१ या दिवशी गुरुवार असून सूर्याेदयापासून उत्तररात्री ३.५५ पर्यंत षष्ठी तिथी असल्याने ‘दग्ध योग’ आहे. ३०.७.२०२१ या दिवशी शुक्रवार असून उत्तररात्री ५.४१ पासून अष्टमी तिथी असल्याने दुसर्या दिवशी सूर्याेदयापर्यंत ‘दग्ध योग’ आहे.
२ ऊ. अमृत योग : नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने ‘अमृत योग’ होतो. अमृत योगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते. ३०.७.२०२१ या दिवशी सूर्याेदयापासून दुपारी २.०२ पर्यंत अमृत योग आहे.
२ ए. कालाष्टमी : प्रत्येक मासातील प्रदोषकाळी असलेल्या कृष्ण अष्टमीला ‘कालाष्टमी’ म्हणतात. कालाष्टमीच्या दिवशी शिवोपासना करतात. या दिवशी शिवाच्या भैरव स्वरूपाची उपासना करतात. ३१.७.२०२१ या दिवशी अहोरात्र (संपूर्ण दिवस आणि रात्र) अष्टमी तिथी आहे.
टीप १ – भद्रा (विष्टी करण), संकष्ट चतुर्थी, घबाड मुहूर्त, दग्ध योग, अमृत योग आणि कालाष्टमी यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.
टीप २ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत. १. हरिचिया दासा हरि दाही दिशा । अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो. |
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१६.७.२०२१)