लक्षद्वीप : भारतासाठी संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा द्वीपसमूह !

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

१. लक्षद्वीप येथे गेल्या ६ मासांमध्ये ५ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडले जाणे

‘भारताच्या समुद्रामध्ये लक्षद्वीप बेटे आहेत. भारताच्या पश्चिम किनारपट्टीपासून २०० ते ४४० किलोमीटर लांब असलेला बेटांचा एक समूह आहे. त्यात ३५ बेटे असून केवळ ८ बेटांवर नागरिकांचे वास्तव्य आहे. हा केंद्रशासित प्रदेश असून त्याचे क्षेत्रफळ ३२ किलोमीटर आहे. त्याचे आकारमान जरी लहान असले, तरी संरक्षणाच्या दृष्टीने त्याचे अतिशय महत्त्व आहे. लक्षद्वीपामुळे भारताला सहस्रो किलोमीटरचा समुद्र वापरता येतो. त्यात मासेमारीसह अनेक गोष्टीही करता येतात.

लक्षद्वीपची लोकसंख्या अनुमाने ६५ सहस्र आहे. त्यातील ९० टक्के लोकसंख्या ही मुसलमान असून १० टक्के अन्य धर्मीय आहेत. या बेटावर अमली पदार्थाच्या वापराचे प्रमाण वाढत आहे. तेथील काही युवक आतंकवादाकडे वळलेले आहेत. ही बेटे मालदीव बेटांपासून केवळ ७० ते ८० किलोमीटर एवढी लांब आहेत. लक्षद्वीप, मिनीकॉय आणि मालदीव या बेटांवरील लोकांचा आपसात सामाजिक संबंध आहे.

लक्षद्वीप बेटांना निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देतात. या बेटांवर काही ठिकाणी गुंडगिरी आणि अमली पदार्थाचा व्यापारही चालतो. काही जण वाईट कामांमध्ये गुंतलेले असतात. मालदीव जर जगातील एक चांगले पर्यटनस्थळ होऊ शकते, तर लक्षद्वीप का होऊ शकत नाही ?

लक्षद्वीप येथे गेल्या ६ मासांत अनुमाने ५ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडले आहेत. ७ मे २०२१ या दिवशी भारतीय तटरक्षक दलाने ६ मासेमारांसह श्रीलंकेची मासेमारांची बोट पकडली. त्यात २०० किलो हेरॉईन आणि ६० किलो हशिश होते. १८ मार्च या दिवशी तटरक्षक दलाने १९ नाविकांसह एक बोट पकडली होती. त्यातून ३ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत केले होते. त्यात ५ एके-४७ रायफलीही होत्या. त्यापूर्वीही तेथे १ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडण्यात आले होते. जेवढे अमली पदार्थ पकडले जातात, त्याहून कितीतरी अधिक अमली पदार्थ संबंधित ठिकाणी तस्करांनी पोचवलेले असतात.

२. लक्षद्वीप बेटांवरून विविध अपव्यवहार होत असल्याने त्यांकडे लक्ष देणे आवश्यक !

लक्षद्वीप बेटाचे वार्षिक अंदाजपत्रक १ सहस्र ३०० ते १ सहस्र ४०० कोटी रुपये आहे. यावरून अमली पदार्थांचे मूल्य किती अधिक आहे, हे कळते. तेथे ‘मनीलॉड्रिंग’ आणि ‘हवाला’ यांसारखे अपव्यवहारही चालतात. तेथून अनेक आंतरराष्ट्रीय तस्कर अमली पदार्थांचे वितरण करत असतात. अमली पदार्थ हे दक्षिण-पूर्व देशांमध्ये निर्माण होतात. तेथून हे पदार्थ मध्य-पूर्व किंवा युरोपमध्ये पाठवले जातात. त्यांचा मार्ग हा लक्षद्वीप समूहाजवळून जातो. मध्य पूर्वेतील देश किंवा आखातातील देश येथील लोकांकडे अमाप पैसा आहे. अमली पदार्थांच्या ‘गोल्डन ट्रँगल’मधून हे पदार्थ आणले जातात. लक्षद्वीप बेटांतून मध्य-पूर्व आणि युरोप या भागांकडे मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो. या बेटावरील काही नागरिक आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीच्या क्षेत्रात काम करतात. त्यामुळे त्यांचाही काही वाईट प्रकारच्या लोकांशी संपर्क येऊ शकतो. पूर्वी या भागात समुद्री चाचे किंवा डाकू मोठ्या प्रमाणात असायचे. जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी वाढत आहे. त्यामुळे पुढील १०० वर्षांमध्ये कदाचित् ही बेटे पाण्याखाली जातील, असे म्हटले जाते. असे असले, तरी जोपर्यंत ही बेटे भारताकडे आहेत, तोपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

३. चीन भारतापासून केवळ ३०० किलोमीटर लांब आहे, हे वास्तव जाणा !

७ मे या दिवशी मालदीवमध्ये मोठा स्फोट झाला. त्यात तेथील माजी राष्ट्रपती गंभीर घायाळ झाले. ‘हा स्फोट ‘इसिस’ने केला असावा’, असे समजले जाते. मालदीव ही केवळ २ ते ३ लाख लोकसंख्या असलेली बेटे आहेत. यातील अनेक युवक आतंकवादी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे तेथील आतंकवाद आपल्याकडे येऊ न देणे आवश्यक आहे. अलीकडे श्रीलंकेतील हंबनतोता आणि अन्य एक बंदर ९९ वर्षांसाठी चीनच्या नियंत्रणात गेले आहेत. हा चीनचा महत्त्वाचा भाग झाल्यामुळे तेथे श्रीलंकेचे लोकही जाऊ शकत नाहीत. त्यामुळे चीन आपल्यापासून केवळ ३०० किलोमीटर एवढाच लांब राहिला आहे.

४. लक्षद्वीप बेटांच्या संरक्षणासाठी विविध उपाय योजल्यासच देशाची सुरक्षा अधिक मजबूत होईल !

या बेटांवर काही प्रमाणात तटरक्षक दल आणि भारतीय नौदल आहे, तसेच भारतीय राखीव दलाचे काही सैनिकही आहेत. तेथे भारतीय सैन्याची एक तुकडी, तसेच ‘टेरिटोरिअल आर्मी’ (नोकरी-व्यवसाय सांभाळून सैनिक सेवा करणारे) यांची नियुक्ती केली पाहिजे. त्यामुळे स्थानिक लोकांना भारतीय सैन्यात काम करण्याची संधी मिळेल. लक्षद्वीपच्या ८ बेटांवर लोक रहातात. त्यामुळे अन्य बेटांवर आतंकवादी, तस्कर किंवा गुन्हेगारी लोक आले, तर त्या बेटांचे रक्षण कसे करायचे ? हे लक्षात घेऊन तेथे भारताच्या माजी सैनिकांना वसवले पाहिजे. त्यामुळे तेथील चुकीच्या गोष्टींवर कडक पहारा ठेवता येईल. तेथे टेहळणी मनोरेही उभारू शकतो. तेथे सैन्याचे विमानतळ निर्माण करायला पाहिजे. त्यामुळे भारताच्या मुख्य भूमीपासून ३०० किलोमीटर अंतरावर समुद्री तळ निर्माण होईल. त्याद्वारे भारतीय पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करता येईल. तेथील भारतीय सुरक्षा दलांमध्ये समन्वय हवा. त्यामुळे ते अधिक चांगल्या प्रकारे काम करतील आणि या बेटांना सुरक्षित ठेवून भारताची सुरक्षा अधिक मजबूत करतील.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे