धन्य ते परात्पर गुरु डॉ. आठवले आणि धन्य ते त्यांचे ‘साधकरूपी धन’ !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुप्राप्तीनंतर गुरुचरणी तन, मन आणि धन, म्हणजे सर्वस्वच समर्पित केले. त्यांच्याकडे शिल्लक राहिले ते केवळ ‘साधकरूपी धन’ ! ईश्वरप्राप्तीचा एकमेव ध्यास ठेवून अविरत साधना करणारे, तसेच धर्मसंस्थापना आणि हिंदु राष्ट्राची (रामराज्याची) स्थापना यांसाठी निःस्वार्थीपणे अविश्रांत कार्य करणारे सहस्रो साधक घडवणे, ही लीला केवळ परात्पर गुरु डॉक्टरच करू शकतात ! १५ जुलै २०२१ पर्यंत या साधकांपैकी १११ हून अधिक साधक संत बनले असून १३८१ हून अधिक साधक आणि बालसाधक लवकरच संत बनण्याच्या मार्गावर आहेत. आज जगातील असा कोणता संप्रदाय किंवा आध्यात्मिक संस्था आहे की, जिचे प्रमुख किंवा जिचे साधक यांच्या संदर्भात असे घडत आहे ? अशी किमया घडवणारे परात्पर गुरु डॉक्टर हे भूतलावरील एकमेवच आहेत !
विविध गुण, कौशल्ये, भाव रूपी नाना रंगांच्या छटा असलेल्या या साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रीतीने असे जोडून ठेवले आहे की, जणू आकाशातील सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्यच ! कुणीही अमाप संपत्ती देऊ केली, तरी त्या बदल्यात त्याला हे ‘साधकरूपी धन’ प्राप्त होऊ शकणार नाही, इतके ते अनमोल आहे.
पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे असलेल्या ‘मावळेरूपी धना’च्या बळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आता परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्याकडे असलेल्या ‘साधकरूपी धना’च्या बळावर हिंदु राष्ट्राची स्थापना करतील ! याचसह परात्पर गुरु डॉक्टर करत असलेल्या धर्मसंस्थापनेच्या कार्यामुळे, तसेच ते घडवत असलेल्या संतांच्या मांदियाळीमुळे भारत लवकरच पुन्हा एकदा ‘जगाचा आध्यात्मिक गुरु’ बनेल !’
– (पू.) संदीप आळशी (१६.७.२०२१)