गुरुपौर्णिमा आणि हिंदु राष्ट्र !
मनुष्यजन्म प्राप्त होणे आणि त्यातही त्या जिवात ईश्वरप्राप्ती करण्याची तीव्र तळमळ असणे आणि गुरूंची कृपा होणे या ३ गोष्टी एकत्र येणे, ही दुर्मिळातील दुर्मिळ गोष्ट आहे’, असे आद्य शंकराचार्यांनी म्हटले आहे. यांतील मनुष्यजन्माचा विचार करता अत्यल्प लोकांनाच मनुष्यदेह मिळाल्याविषयी कृतज्ञता वाटते. मानवी देहाचे वास्तविक ध्येय विसरल्यामुळेच मनुष्य विषयांत अडकतो. आपले खरे हित त्याला उमगत नाही. अत्यल्प जिवांना स्वत:ची खरी ओळख व्हावी, याची तळमळ असते. ‘आपली ज्या भगवंतापासून उत्पत्ती झाली, त्याच्यापर्यंत पोचण्याची तीव्र तळमळ अर्थात् मुमुक्षुत्व असणे म्हणजे आपले अर्धे कार्य झाले’, असे समजावे. असे असले, तरी ईश्वराशी एकरूप होण्यासाठी म्हणजेच आत्मानुभूतीसाठी गुरूंचे मार्गदर्शन, त्यांनी सांगितलेली साधना आयुष्यभर करत रहाणे अन् त्या माध्यमातून गुरूंची आपल्यावर कृपा होणे आवश्यक असते. थोडक्यात, गुरुकृपेशिवाय आपण आपल्या मनुष्यजन्माचा मूळ उद्देश प्राप्त करणे अशक्य आहे. यातच गुरूंचे महत्त्व सामावलेले आहे. गुरूंशिवाय तरणोपाय नाही, हेच आद्य शंकराचार्यांना सांगायचे आहे. त्यामुळेच ‘अज्ञानरूपी अंध:कारातून जो प्रकाशाकडे नेतो, ते म्हणजे गुरु’, असे म्हणतात. जीवनातील सर्व समस्यांवर गुरूंनी सांगितलेली साधना, हाच एकमेव उपाय आहे. ‘खरे समाधान हे केवळ गुरुचरणांतच आहे’, याची अनुभूती आजपर्यंत लक्षावधी शिष्य, भक्त आणि साधक यांनी घेतली आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘एखादा सुखवस्तू गृहस्थ ‘मी स्वस्थ आहे’, असे म्हणतो; पण ते काही खरे नाही. मन जोवर गिरक्या मारते, तोपर्यंत तो स्वस्थ आहे, असे म्हणता येणार नाही.’ मनाच्या स्थिरतेसाठी गुरुकृपा आवश्यक असते. ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’ असे संस्कृत वचन आहे. त्याचा अर्थ हाच की, गुरुकृपाच शिष्याचे परम कल्याण करते.
शिष्याला सर्व काही प्रदान करणार्या गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच असते. तरी शिष्य गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पूजा करून ती व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुतत्त्व १ सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते. ‘माझ्या हृदयातील कृतज्ञता मी माझ्या विपुल प्रयत्नांनीही व्यक्त करू शकत नाही. हे गुरुदेव, मला अनुग्रह द्या आणि आपल्या परम प्रेमरूपी कृपेसाठी मला पात्र बनवा’, एवढीच प्रार्थना शिष्य आपल्या गुरूंना करत असतो. शिष्याची आपल्या गुरूंवरील ही श्रेष्ठतम भक्ती त्याला अध्यात्मात उन्नतावस्था प्राप्त करून देत असते.
समष्टी साधना !
गुरूंनी सांगितलेल्या साधनेचा प्रचार करणे, धर्मरक्षणासाठी प्रयत्न करणे, ही पुढील टप्प्याची कृतज्ञता होय, हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. असे केल्यानेच शिष्याचा प्रवास पूर्ण होत असतो आणि तो भगवंताच्या चरणी स्थिर होतो. येथे समष्टी साधनेचे महत्त्व अधोरेखित होते. जगाला भारताने म्हणजेच हिंदु धर्माने दिलेली सर्वांत अद्वितीय देणगी म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’ ! गुरूंनी जे काही शिकवले, ते पुढील पिढ्यांपर्यंत कृतज्ञतापूर्वक पोचवण्याचे अलौकिक कार्य अव्याहतपणे गेली सहस्रो वर्षे होत राहिले आहे. यातून शिष्यांचा आपल्या गुरूंप्रती असलेला भाव लक्षात येतो. वेद-उपनिषदे, श्रुति-स्मृति, पुराणे आदींच्या माध्यमांतून मिळालेले ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोचवण्यातून हिंदु धर्मज्ञानाचे संवर्धन होत राहिले आहे. आज मात्र कलियुग असल्याने या ज्ञानाचे संरक्षण करणे, हे अधिकचे दायित्व आपल्या सर्वांवर आहे. यासाठी हिंदूसंघटन होणे, ही काळाची आवश्यकता आहे. आपल्यात ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज या दोन्हीची निर्मिती होणे हेसुद्धा तितकेच आवश्यक आहे. यासाठी आपल्या सर्वांसमोर आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदुस्थानवर ५ मुसलमानी पातशाह्या राज्य करत असतांना ‘हिंदुस्थान एक प्रचंड मोठे अखंड राष्ट्र आहे’, याची जाणीव समर्थ रामदासस्वामींना होती. त्या अनुषंगानेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मसंस्थापनेचा आणि अखंड राष्ट्राच्या पुनर्निमितीचा उपदेश केला अन् आध्यात्मिक पाठबळ दिले. समर्थांच्या या पाठबळामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांना हाताशी धरून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा इतिहास घडवला.
‘धर्मरक्षण’ ही साधनाच !
आजचा काळही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापूर्वी जसा होता, तसा काळाकुट्ट आहे. ७४ वर्षांपूर्वी भारताला स्वातंत्र्य तर मिळाले, स्वराज्य आले, परंतु सुराज्याचे काय ? गेल्या ७४ वर्षांत शासनकर्ते आपल्याला सुराज्य प्रदान करण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहेत. समाजात अन्याय-अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. ‘लव्ह जिहाद’ म्हणजेच हिंदु धर्माच्या मुळाशी उठलेल्या षड्यंत्राच्या सहस्रो घटना घडूनही आज त्यावर आळा घालण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील कायदा येऊ शकलेला नाही. ३३ कोटी देवता असलेल्या गायींची दिवसाढवळ्या हत्या होते. त्यावर राजकारण तर होते; परंतु गोमातेच्या करुणामय हाकेला उत्तर मात्र कुणीच देत नाही. स्वत:च्या देशात आज लक्षावधी हिंदूंना निर्वासितांचे जीवन जगण्यास बाध्य केले गेले आहे. शेजारी देश पाकिस्तान आणि बांगलादेश येथे तर हिंदू अन् हिंदु धर्म शेवटचा श्वास कंठत आहेत. तेथून पलायन करून आलेल्या हिंदूंच्या हितासाठी बनवण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला जातो. भारतविरोधी ‘नरेटिव्ह’ (वातावरण) बनवून भारतीय हिंदूंना ‘बलात्कारी’, ‘असहिष्णु’, ‘सैतान’ म्हणून हिणवले जाते. हिंदु धर्मावर आलेली ही काळी छाया नष्ट करून जाज्वल्य धर्मतेज प्रसृत होण्यासाठी कंबर कसण्याची आवश्यकता आहे. समर्थ रामदासस्वामी यांनी म्हटले आहे, ‘सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयांचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।’ यानुसार साधना केल्यासच धर्माचे गुरु म्हणजे जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण यांची आपल्यावर कृपा होऊन धर्माची संस्थापना होणार आहे. आज असलेल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण यासाठी कटीबद्ध होऊया. गुरुचरणी त्यासाठी बळ मागूया आणि ‘कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।’ म्हणत धर्मरक्षणार्थ सिद्ध होऊया. याने लोककल्याणकारी हिंदु राष्ट्राची स्थापना निश्चित होईल, हे लक्षात घेऊया.