मुंबई-गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करा ! – अनंत पिळणकर, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
अशी मागणी प्रशासनाकडे का करावी लागते ? निकृष्ट कामामुळे घडलेल्या घटनांची प्रशासन स्वतःहून त्वरित नोंद का घेत नाही ?
सिंधुदुर्ग – मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याविषयी प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याची नोंद घेतली जात नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी ‘काँक्रिट’ला भेगा पडल्या आहेत. सेवा मार्ग, बाजूपट्टी (साईडपट्टी) खचलेली आहे. भराव वाहून गेला आहे. कणकवली शहरात एस्.एम्. हायस्कूल येथे बांधलेल्या पुलाचा भाग २ वेळा कोसळला. या सगळ्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो, तसेच चुकीच्या दिशादर्शक फलकांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रशासन आणि ठेकेदार यांचे साटेलोटे असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. तरी या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करावी.