गुरुकार्य वाढवण्याची तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले कै. रामचंद्र खुस्पे (वय ६५ वर्षे) !
गुरुकार्य वाढवण्याची तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झालेले निढळ (तालुका खटाव, जिल्हा सातारा) येथील कै. रामचंद्र खुस्पे (वय ६५ वर्षे) !
निढळ (तालुका खटाव, जिल्हा सातारा) येथील साधक रामचंद्र खुस्पे (खुस्पेकाका) गेल्या २३ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होते. २४.५.२०२१ या दिवशी त्यांचे निढळ या गावी निधन झाले. २२.७.२०२१ या दिवशी त्यांचे द्वितीय मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील साधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. नम्रता
‘काका सर्वांशी नेहमीच नम्रतेने बोलत. त्यांना कधीही राग येत नसे. ते स्वभावाने शांत होते.’ – सौ. ज्योती कुंभार आणि श्री. विनायक ठिगळे, वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा.
२. प्रेमभाव
अ. ‘काका नेहमी सर्वांशी मनमोकळेपणाने बोलायचे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना त्यांनी प्रेमाने आपलेसे केले होते. ते कुठल्याही प्रश्नाचे उत्तर सहजतेने देत असत. इतरांना काकांच्या बोलण्यातून साधनेसाठी प्रोत्साहन मिळत असे.’ – सौ. मेघा कट्टे, गोंदवले, तालुका माण, जिल्हा सातारा.
आ. कोरोना महामारीच्या काळात काही मास दळणवळण बंदीमुळे काकांची साधकांशी भेट होत नव्हती. तेव्हा काका भ्रमणभाषद्वारे साधकांना संपर्क करून सर्वच साधकांची आपुलकीने विचारपूस करत.’ – सौ. ज्योती कुंभार
इ. ‘काका अनेकदा त्यांच्या बागेतील सीताफळे साधकांना प्रेमाने घरी नेऊन देत असत.’ – श्री. विनायक ठिगळे
३. परिस्थिती स्वीकारणे
अ. ‘काही वर्षांर्वी कळंबोली (नवीन पनवेल) येथे काका वाहनदुरुस्तीचा व्यवसाय करत असत. तेव्हा त्यांनी काही मास देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमामध्ये वाहनांची दुरुस्ती आणि अन्य सेवा केल्या. नंतर शारीरिक त्रासांमुळे व्यवसाय बंद करून ते त्यांच्या गावी निढळ येथे रहाण्यास आले.’ – एक साधक, सातारा
आ. ‘आर्थिक चणचण असतांनाही काका समाधानी असायचे. ते शारीरिक त्रासांमुळे अनेकदा झोपू शकत नसत, तरीही त्यांचे त्याविषयी गार्हाणे नसायचे.’ – श्री. विनायक ठिगळे
४. गुरुकार्य वाढवण्याची तळमळ असणे
अ. ‘काका निढळ येथे रहायला आल्यावर त्यांनी काही लोकांना एकत्र करून सत्संग चालू केला.’ – एक साधक, सातारा
आ. ‘काका धर्म कार्यासाठी अर्पण गोळा करणे, अध्यात्मप्रसारासाठी ग्रंथांचे वितरण करणे’ इत्यादी सेवा तळमळीने करत असत.’ – सौ. ज्योती कुंभार
इ. ‘काकांनी समाजातील अनेकांना भ्रमणभाषद्वारे संपर्क करून सनातन संस्थेशी जोडले. ते जिज्ञासूंना साधनेचे महत्त्व सांगून त्यांना ‘ऑनलाईन’ सत्संगांचा लाभ घेण्यास सांगत असत.’ – सौ. मेघा कट्टे
ई. ‘काका वयोवृद्ध असूनही साधकांच्या समवेत सर्व प्रकारच्या सेवा करत असत. काकांना ‘संभाव्य तिसर्या महायुद्धाच्या आपत्काळात उपयुक्त म्हणून प्रत्येकाने औषधी वनस्पतींची लागवड करावी’, याविषयी समजल्यावर त्यांनी लगेच ‘सेवा’ म्हणून स्वतःच्या शेतात औषधी वनस्पतींची लागवड केली. – एक साधक सातारा
५. त्यागी वृत्ती
‘काका त्यांच्या शेतात पिकवलेले गहू, ज्वारी इत्यादींपैकी शक्य तेवढे धान्य सनातनच्या आश्रमात नियमित ‘अर्पण’ म्हणून देत असत.’ – एक साधक, सातारा
६. व्यष्टी साधनेचे गांभीर्य असणे
अ. ‘काकांना शारीरिक त्रास होत असूनही ते प्रतिदिन पहाटे ४ ते ६ या वेळेत नामजप करत, तसेच ते व्यष्टी साधनेच्या अंतर्गत ‘तळमळीने प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे, स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे’ इत्यादी प्रयत्न नियमित पूर्ण करत असत.’ – सौ. मेघा कट्टे आणि श्री. विनायक ठिगळे
आ. ‘एखाद्या दिवशी काही कारणाने काकांकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न पूर्ण झाले नाहीत, तर आढावा सत्संगामध्ये ते स्वतःचे कान पकडून परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सर्व साधक यांच्याकडे क्षमायाचना करत असत.’ – सौ. मेघा कट्टे
इ. ‘काकांकडून कधी चूक झाली, तर ते त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या साधकांचीही निःसंकोचपणे क्षमा मागत असत, तसेच ते साधकांना ‘माझी काही चूक झाली, तर मला ती सांगून साधनेत साहाय्य करा’, असेही नम्रपणे सांगत असत.’ – सौ. ज्योती कुंभार
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव
अ. ‘गुरुमाऊलीचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) केवळ नाव घेतले, तरी काकांचा भाव जागृत होत असे. गुरुमाऊलीविषयी बोलतांना काकांना भावाश्रू येत असत.’ – सौ. मेघा कट्टे
आ. ‘काका प्रत्येक कृती करतांना गुरुमाऊलीच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना करायचे, तसेच ‘स्वतःजवळ जे काही आहे, ते माझ्या गुरुमाऊलीचेच आहे’, असा त्यांचा भाव असे.
इ. काका कृतज्ञताभावाने साधकांना म्हणायचे, ‘‘कोरोना महामारीमुळे ओढवलेल्या प्रतिकूल काळातही गुरुमाऊली आपली काळजी घेत आहे. आपण साधनेचे प्रयत्न नियमित पूर्ण करूया.’’
– सौ. ज्योती कुंभार
८. अनुभूती
खुस्पेकाकांना प्रत्यक्ष पाहिले नसूनही त्यांच्याशी भ्रमणभाषद्वारे बोलतांना साधिकेची भावजागृती होणे : ‘मी काकांना कधी प्रत्यक्ष पाहिले नाही. मी त्यांच्याशी केवळ भ्रमणभाषद्वारेच बोलले आहे. त्यांच्याशी बोलतांना कधी कधी माझी भावजागृती होत असे. त्यांच्याकडून मला बर्याच गोष्टी शिकता आल्या.’ – सौ. मेघा कट्टे
कै. रामचंद्र खुस्पेकाका यांना आपत्काळाच्या दृष्टीने औषधी वनस्पतींची जोपासना करण्याविषयी आलेल्या अनुभूती१. अनेक वर्षांपूर्वी काकांना स्वप्नात ‘शेतात औषधी वनस्पतींची लागवड केली असून तेथे सनातनचा आश्रम आहे’, असे दिसणे आणि प्रत्यक्षातही काही वर्षांनी त्यांनी सेवा म्हणून शेतात औषधी वनस्पतींची लागवड करणे ‘अनेक वर्षांपूर्वी काकांना एकदा स्वप्नात दिसले, ‘शेतात औषधी वनस्पतींची लागवड केली आहे आणि त्या ठिकाणी सनातनचा आश्रम असून तिथे साधक सेवा करत आहेत.’ काही वर्षांनी काकांनी आपत्काळात उपयुक्त म्हणून स्वतःच्या शेतात औषधी वनस्पतींची लागवड सेवा म्हणून केली. त्या वेळी काकांना ‘पूर्वी स्वतःला पडलेले स्वप्न, म्हणजे देवाने दिलेली एक अनुभूतीच होती’, असे लक्षात आले. २. औषधी वनस्पतींच्या जोपासनेची सेवा करतांना काकांना शारीरिक त्रासांची जाणीव न होणे आणि त्यांना सतत सेवारत रहावेसे वाटणे ‘काकांना पाठीच्या मणक्यासंबंधी तीव्र त्रास होता; परंतु शेतात औषधी वनस्पतींची जोपासना करण्याची सेवा करतांना त्यांना मणक्याचा त्रास कधी जाणवत नसे. त्यांना ‘हर्निया ’चाही (हर्निया म्हणजे अंतर्गळ – अवयवांना त्यांच्या जागी स्थिर ठेवणारे स्नायू शिथिल झाल्याने अवयव गळणे) त्रास होता, तरीही त्यांनी ‘औषधी वनस्पतींना पाणी देणे, रोपांसाठी अळे (झाडाच्या मुळाशी पाणी रहाण्यासाठी घातलेला मातीचा बांध) करणे’ इत्यादी सेवा केल्या. या संदर्भात काका म्हणायचे, ‘‘सेवेमुळे मला शारीरिक त्रासांची जाणीव होत नाही. त्यामुळे मला सतत सेवेत रहावेसे वाटते.’’ – एक साधक, सातारा (२९.५.२०२१) |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |