गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षि व्यास यांची वर्णिलेली महती !

१. महर्षि व्यास ‘वेदव्यास’ झाले !

‘महर्षि व्यास म्हणजेच ऋषि पराशर आणि माता सत्यवती यांचे पुत्र ! जन्माने ते काळे होते; म्हणून त्यांचे नाव कृष्ण, तर यमुनाद्वीपात जन्मलेले म्हणून कृष्णद्वैपायन ! त्यांनी लोकांना दैवी, तेजस्वी आणि सांस्कृतिक जीवन जगण्यासाठी प्रेरित होईल, अशा स्वरूपाचा वैदिक विचार प्रत्येकापर्यंत पोचावा, त्याचे संवर्धन व्हावे, यासाठी आपल्या जीवनात महान कार्य केले. ते कार्य म्हणजे मौखिक परंपरेने आलेल्या वेदांचे संकलन केले. विषयानुसार ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद असे चार वेगवेगळे भाग करून आपले शिष्य जैमिनी, पैल, सुमंत आणि वैशंपायन यांना दिले. जणू वेदांची चार स्वतंत्र विद्यापिठेच स्थापन झाली. वेदांचे सखोल अध्ययन आणि संशोधन त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू झाले. हे कार्य पुढे सहस्रो वर्षे आजतागायत टिकले. त्यामुळे तत्कालीन समाजाने त्यांना ‘वेदव्यास’ ही उपाधी दिली.

२. प्रत्यक्ष भगवंताच्या मुखामधून निघालेली भगवद्गीता म्हणजे महाभारत आणि त्याचे लेखन करणारे महर्षि व्यास !

महर्षि व्यासांनी ‘महाभारता’सारख्या कालातीत ग्रंथाचे लेखन केले. महाभारत हे केवळ महाकाव्य नव्हे, तर शूरपुरुष आणि स्त्रिया यांची, तसेच दैवी गुणसंपन्न आशीर्वाद लाभलेल्या काही व्यक्तींची जीवनकथा आहे. महाभारत हा अनंत रंग आणि धागे असलेला विशाल असा रंगपट आहे. वेगवेगळ्या व्यक्ती आणि वैविध्यपूर्ण प्रसंगांनी भरलेली प्रतिकूल परिस्थितीत खंबीरपणे उभी रहाणारी अन् अनुकूल परिस्थिती येता वहात न जाणारी वेगवेगळी चरित्रे व्यासांनी महाभारतामध्ये रेखाटली आहेत. मानवी जीवनातील भावभावना आणि गुंतागुंतीचा ठाव घेणारी विलक्षण प्रतिभा व्यासांचे ठायी विलसत होती. राजा शंतनुपासून राजकुमार अभिमन्यूपर्यंत जवळपास पाच पिढ्यांचा विस्तृत कालखंड ! महाभारत म्हणजे भारताचे सांस्कृतिक संचित ! पिढ्यान्पिढ्यांचा अनमोल वारसा ! विशेष म्हणजे महाभारतामध्ये प्रत्यक्ष भगवंताच्या मुखामधून निघालेली भगवद्गीता आहे. विश्वातील मानवाला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतर प्रयत्न केला आहे. जीवनसंग्रामात शक्तीनिशी उभे रहाण्याची शक्ती गीता देते.

‘महाभारत’ ग्रंथ लिखाणासाठी वेदव्यासांनी प्रत्यक्ष गणपतीचे साहाय्य घेतले. बुद्धी व्यासांची, लेखणी गणेशाची आणि तत्त्वज्ञान विचार वेदांचे असा हा त्रिवेणी संगम होता. जगातील कुठल्याही मानवजातीला उपयुक्त असे हे तत्त्वज्ञान जिवंत प्रेरणा देणारे आणि म्हणूनच धर्म, पंथ, जात, देश यांच्या सीमारेषा ओलांडून व्यासांनी लिहिलेल्या ग्रंथांनी जगद्मान्यता मिळवली.

३. व्यासपिठाचे महत्त्व

व्यासांचे जीवन अमर करण्यासाठी त्यांचे अनुयायी, हितचिंतक आणि संस्कृतीचा प्रसार करणारे अशा सर्वांनी सगळ्यांनी त्यांच्यासाठी व्यास हे संबोधन निश्चित केले. ज्या पिठावरून संस्कृतीचे विचार सांगितले जातात, त्या पिठाला ‘व्यासपीठ’ असे म्हणायला प्रारंभ केला. आपण ‘व्यासपीठ’ हा शब्द कुठल्याही सामाजिक, राजकीय, नाटक किंवा चित्रपट यांच्या कार्यक्रमासाठी वापरतो, हे चुकीचे आहे. व्यासपिठावरून बोलणार्‍या व्यक्तीने वेदमान्य, ऋषिमान्य, व्यासमान्य अशाच विचारांचे संबोधन केले पाहिजे. तो सरस्वतीचा उपासक असला पाहिजे. समाजाचे जीवन उन्नत करण्यासाठी त्याची वाणी ईश्वरभक्तीच्या स्वरूपात वाहिली पाहिजे.

४. व्यासपौर्णिमा आणि व्यास !

महर्षि व्यास हे समाजाचे गुरु होते; म्हणून परंपरागत व्यासपूजा ही गुरुपूजा मानली गेली. व्यासपौर्णिमा ही ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून संपूर्ण भारतवर्षात साजरी होऊ लागली. या दिवशी आपल्या वैदिक संस्कृतीचे शिल्पकार असलेल्या महर्षि वाल्मीकि, महर्षि व्यास यांसारख्या ऋषिमुनींना विनम्र अभिवादन आणि कृतज्ञतापूर्वक नमस्कार करायचा !’

– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे