ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची केंद्र सरकारची माहिती : विरोधकांची टीका !
कोरोनाच्या दुसर्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्ण दगावल्याची अनेक प्रकरणे प्रसारमाध्यमे आणि अन्य स्रोत यांद्वारे पुढे आली. त्यामुळे जनतेसाठी हा संवेदनशील विषय आहे. त्याविषयी माहिती देतांना सरकारने जनतेच्या भावनांचा आदर राखावा आणि याविषयी सखोल अन्वेषण करून माहिती संसदेत प्रसारित करावी, अशी लोकांची अपेक्षा आहे !
नवी देहली – संसदेच्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने २० जुलै या दिवशी ‘कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशातील कोणतेही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश येथेे एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली नाही’, अशी माहिती दिली. यावर विरोधी पक्षांनी टीका केली.
Govt says no deaths due to lack of oxygen reported by states/UTs; dumbfounded citizens call it ‘state of denial’#OxygenCrisis #OxygenShortage #OxygenDeaths #COVID19 #SecondWave #Viral https://t.co/xFuJ3lrsV4
— Free Press Journal (@fpjindia) July 21, 2021
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी ‘केवळ ऑक्सिजनचीच कमतरता नव्हती, तर संवेदनशीलता आणि सत्य यांचीही कमतरता होती अन् आजही ती आहे’, अशा शब्दांत सरकारवर टीका केली. काँग्रेसचे खासदार के.सी. वेणूगोपाल यांनी या सूत्रावरून आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे सांगितले. (काँग्रेसने सत्तेत असतांना इतकी वर्षे जनताद्रोही कारभार केला. इतरांवर टीका करतांना काँग्रेसी नेत्यांनी याविषयी आत्मपरीक्षण करावे ! – संपादक)
आरोग्यमंत्र्यांकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांचे अहवाल प्रसारित !
विरोधकांच्या आक्षेपानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्वीट करून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांचे अहवाल प्रसारित केले. मांडवी म्हणाले की, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश कोरोनामुळे होणार्या मृत्यूंची आकडेवारी नियमितपणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला देत असतात; पण एकही राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश यांनी ‘ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला’, अशी माहिती दिलेली नाही. (राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांनी चुकीची माहिती दिली, हे स्पष्ट आहे. असे असले, तरी या माहितीची शहानिशा करून ती संसदेत देणे सरकारकडून अपेक्षित आहे ! – संपादक) कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसर्या लाटेच्या वेळी वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी बरीच वाढली होती. पहिल्या लाटेत ३ सहस्र ९५ ‘मेट्रिक’ टन ऑक्सिजनची मागणी होती, तर दुसर्या लाटेत ही मागणी ९ सहस्र ‘मेट्रिक’ टन इतकी होती.