कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीही गुरुपौर्णिमा महोत्सव साध्या पद्धतीनेच होणार ! – साईबाबा संस्थानची माहिती
नगर (शिर्डी), २१ जुलै – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे साई संस्थानच्या वतीने ५ एप्रिल २०२१ पासून साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे २२ जुलै ते २४ जुलै २०२१ या कालावधीत साजरा करण्यात येणारा गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करणार आहे, अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.
बगाटे यांनी सांगितले की, २२ आणि २३ जुलै या दिवशी पहाटे ४.३० पासून साई मंदिरात काकड आरती, पोथीची मिरवणूक, श्री साई सच्चरितचे अखंड पारायण, पाद्यपूजा, माध्यान्ह आरती आणि कीर्तन, असे कार्यक्रम होणार आहेत. २२ जुलै या दिवशी श्री साई सच्चरित अखंड पारायणासाठी व्दारकामाई मंदिर आतील बाजूने रात्रभर खुले ठेवण्यात येईल. २३ जुलै या दिवशी अखंड पारायण समाप्ती, साईंचे मंगलस्नान इत्यादी कार्यक्रम होणार असून २४ जुलै या दिवशी मंदिरात रुद्राभिषेक होणार आहे. तसेच उत्सव कालावधीत पदयात्री साईभक्तांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालखी घेऊन शिर्डी येथे येऊ नये आणि संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहनही बगाटे यांनी केले आहे.