परभणी येथील युवा साधिका कु. साक्षी रुद्रकंठवार  (वय १८ वर्षे) हिने पदोपदी अनुभवलेले श्रीकृष्णाचे साहाय्य !

१. साधनेमुळे देवाविषयी ओढ वाटणे आणि प्रार्थना अन् नामजप केल्यावर अभ्यासाचा ताण दूर होणे

कु. साक्षी रुद्रकंठवार

‘साधना समजल्यानंतर खर्‍या अर्थाने माझ्यात पालट होऊ लागला. माझ्या मनात देवाविषयी ओढही निर्माण झाली; मात्र माझ्याकडून व्यष्टी साधना होत नव्हती. इयत्ता १० वीत असतांना मला अभ्यासाचा ताण यायचा. आईने मला प्रार्थना आणि नामजप करण्यास सांगितले. त्यानंतर ताण न येता मी अभ्यास करू लागले.

२. सात्त्विक पोषाख करणे आणि कपाळावर टिकली न लावता कुंकू लावणे 

मी अभ्यासासाठी मैत्रिणीकडे जायचे. तेव्हा तिची आई मला म्हणाली, ‘‘तू पंजाबी पोशाख का घालतेस ? ‘जीन्स’ का घालत नाहीस ?’’ मी त्यांना मला ‘जीन्स’ आवडत नसल्याचे सांगितले. माझ्या मैत्रिणी म्हणायच्या, ‘‘तू कुंकू नको, तर टिकली लाव. मोठ्या बायकांसारखे कुंकू काय लावतेस ?’’ मैत्रिणींनी असे सांगूनही माझ्या कृतीत पालट झाला नाही. त्यानंतर मात्र त्यांनी मला सांगणे सोडून दिले.

३. श्रीकृष्णाने वेळोवेळी केलेले साहाय्य

३ अ. पुढील शिक्षणासाठी काकांच्या घरी उमरखेडला जाणे आणि श्रीकृष्णाच्या कृपेने तेथे एकटेपणा न जाणवणे : इयत्ता १० वी झाल्यानंतर मला पुढील शिक्षणासाठी उमरखेड (जिल्हा यवतमाळ) येथे जावे लागले. तेथे मी काका, काकू आणि त्यांच्या मुलीसह राहू लागले. तेथे मी आरंभी अधिक बोलायचे नाही. शांत रहायचे. जेवढी साधना करायला पाहिजे, तेवढी मी करत नव्हते, तरीही श्रीकृष्णाने मला कधीच एकटेपणा जाणवू दिला नाही.

३ आ. ‘कोणत्याही परिस्थितीवर मात कशी करायची ?’, हे श्रीकृष्णाने शिकवल्याने मन खंबीर होणे : काकांकडे गेल्यावर काही दिवसांनंतर माझ्या चुलत बहिणीची काही चूक झाल्यास मी तिला ती सांगू लागले. त्यामुळे तिला माझा राग येत असे. परिणामी आमच्यातील वादविवादाचे प्रमाण वाढले. तेव्हा मला आईची पुष्कळ आठवण यायची. त्या परिस्थितीत मी देवाला पुष्कळ आठवायचे आणि देव माझ्या साहाय्याला धावत यायचा. ‘आता वादविवाद होईल’, असे वाटल्यावर मी देवाला प्रार्थना करू लागले, ‘देवा, तूच ही परिस्थिती योग्य रितीने हाताळ.’ अशा रितीने ‘कोणत्याही परिस्थितीवर मात कशी करायची’, हे मला श्रीकृष्णाने क्षणोक्षणी सांगितले आणि त्यानंतर माझे मन खंबीर झाले.

३ इ. एकटेपणावर मात करण्यासाठी श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर तो दूर होणे : पुढे मी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे माझ्या ओळखीचे कुणीच नव्हते. त्यामुळे मला एकटेपणा जाणवायचा; मात्र देवाला आळवल्यावर एकटेपणा दूर व्हायचा. मी प्रत्येक शिक्षकांमध्ये श्रीकृष्णाला पाहू लागले. महाविद्यालयात मला बर्‍याच मैत्रिणी भेटल्या. त्या माझ्याशी पुष्कळ प्रेमाने वागायच्या.

३ ई. घरातील काम करण्यास कंटाळा आल्यावर देवाने ‘प्रत्येक काम सेवा म्हणून कर’, असे सांगणे : महाविद्यालयातून घरी आल्यावर मला थकवा यायचा आणि काम करण्यास कंटाळा यायचा. अशा वेळी देवाने मला ‘प्रत्येक काम सेवा म्हणून कर’, असे सांगितले. तेव्हापासून मी प्रत्येक काम सेवा म्हणून करू लागले आहे.

हे सर्व पालट श्रीकृष्णामुळे माझ्यात घडले असून त्यानेच मला योग्य मार्ग दाखवून पुष्कळ आधार दिला आहे.

४. प्रत्येक शिक्षकावर कविता करणे आणि हा गुण देवाने ‘देणगी’ म्हणून दिल्याची श्रद्धा असणे

मी माझ्या प्रत्येक शिक्षकांवर कविता केली होती. ती त्यांना पुष्कळ आवडली. माझ्या मैत्रिणी म्हणायच्या, ‘‘तुला कसे सुचते ?’’ पण मला ठाऊक आहे की, हा गुण मला श्रीकृष्णाने ‘दैवी देणगी’ म्हणून दिला आहे.

५. शिक्षणासाठी बाहेरगावी राहू लागल्यानंतर स्वतःमध्ये जाणवलेले पालट

५ अ. माझ्यात समजूतदारपणा आणि सहनशीलता वाढली असून माझा राग उणावला आहे, तसेच माझी सकारात्मकताही वाढली आहे.

५ आ. मोठ्या व्यक्तींशी मला आदराने वागता येऊ लागले आहे.

मी स्वतःला पुष्कळ भाग्यवान समजते; कारण प्रत्येक क्षणी श्रीकृष्ण माझ्या साहाय्यासाठी धावून येतो. मला योग्य-अयोग्य याची जाणीव करून देऊन मार्गदर्शन करतो. मला वेळोवेळी सूक्ष्म रूपातून आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साधनेत मार्गदर्शन करणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे मिळाले, यासाठी मी भगवान श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु राजेंद्रदादा यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– कु. साक्षी संतोष रुद्रकंठवार, मु.पो.ता. मानवत, परभणी. (१३.८.२०१९)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.