आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची सपत्नीक महापूजा !
आषाढीतील वारकर्यांनी तुडुंब भरलेले पंढरपूर पहायला मिळू दे ! – मुख्यमंत्र्यांची श्री विठुरायाला प्रार्थना
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – आषाढी एकादशीनिमित्त २० जुलै या दिवशी पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. मंदिरातील वीणेकरी केशव कोलते आणि सौ. इंदूबाई कोलते यांना ठाकरे दाम्पत्यासमवेत ‘वारकरी प्रतिनिधी’ म्हणून महापूजा करण्याचा मान मिळाला. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाला ‘कोरोना संसर्गाचे संकट दूर कर आणि आम्हाला पूर्वीचे आषाढीतील वारकर्यांनी तुडुंब भरलेले पंढरपूर पहायला मिळू दे’, अशी प्रार्थना केली.
या वेळी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्यासाठी बंगळुरू (कर्नाटक) येथून रेशमी पोषाख आणण्यात आला होत. आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल मंदिर विविध रंगांच्या फुलांनी सजवण्यात आले होते.
महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोलते दाम्पत्य यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे हेही उपस्थित होते. या प्रसंगी मंदिरातील संत कान्होपात्रा मंदिराजवळील वृक्ष जीर्ण झाल्याने तेथे श्री. ठाकरे यांच्या हस्ते पुन्हा नव्याने रोपण करण्यात आले.
वारकरी भक्तांच्या गर्दीने फुलून जाणारी पंढरी यंदाही भक्तांविना ओस पडली !
आषाढी यात्रेसाठी प्रतिवर्षी १० लाखांहून अधिक वारकर्यांची गर्दी होत असते; मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीने सलग दुसर्या वर्षीही आषाढी यात्रेचा सोहळा भक्तांविना प्रतिकात्मक पद्धतीने साजरा करण्यात आला. यात्राकाळात पंढरपूर शहर आणि लगतच्या १० गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त वारकरी भक्तांच्या गर्दीने फुलून जाणारी पंढरी यंदाच्या वर्षी भक्तांविना ओस पडली आहे. |