अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ते संकेतस्थळावर प्रसारित केल्याप्रकरणी उद्योजक राज कुंद्रा यांना अटक !

२३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

राज कुंद्रा

मुंबई – अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ते संकेतस्थळावर प्रसारित केल्याच्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अटक केली आहे. १९ जुलैच्या रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून राज कुंद्रा यांनी अश्लील चित्रपटांच्या निर्मितीसाठी ८ ते १० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ गुन्हे नोंदवले असून ९ जणांना अटक केली आहे. राज कुंद्रा यांना २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते संकेतस्थळांवर प्रसारित करणे, यांविषयी फेब्रुवारी २०२१ मध्ये गुन्हा नोंदवून अन्वेषणाला प्रारंभ केला होता. त्यात राज कुंद्रा हे मुख्य गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.

ब्रिटनमधील स्वतःच्या भावाच्या साहाय्याने कुंद्रा यांनी ‘केनरिन’ नावाचे आस्थापन स्थापन केले होते. या आस्थापनाच्या ‘ॲप’द्वारे अश्लील व्हिडिओ दाखवले जात होते. भारतीय कायद्यातून वाचण्यासाठी त्यांनी या आस्थापनाची नोंदणी विदेशात केली होती. भारतातील हॉटेल किंवा भाड्याने घरे घेऊन तेथे या अश्लील व्हिडिओचे चित्रीकरण केले जात होते. मोठ्या चित्रपटांमध्ये काम देण्याचे आमीष दाखवून ‘मॉडेल्स’चे अश्लील चित्रीकरण केले जात होते. यानंतर संबंधित व्हिडिओ ‘वी ट्रान्स्फर’द्वारे विदेशात पाठवले जात होते. या प्रकरणी राज कुंद्रा यांच्या विरोधात ठोस पुरावे असून अटक करण्यात आलेल्या अन्य आरोपींनीही राज कुंद्रा यांचे नाव घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.