आषाढीच्या निमित्ताने टाळ मृदंग-हरि नामाच्या गजरात ‘श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी’ नंदवाळकडे रवाना !

विश्व हिंदु परिषदेचे अधिवक्ता रणजितसिंह घाटगे यांच्या हस्ते अश्व पूजन

दिंडी मार्गस्थ होण्यापूर्वी पोलीस प्रशासनाच्या वतीने दिंडीचे करण्यात आलेले स्वागत

कोल्हापूर, २० जुलै (वार्ता.) – प्रतिवर्षी आषाढीच्या निमित्ताने भक्त मंडळ आणि ‘जय शिवराय फूटबॉल प्लेअर तरुण मंडळ’ यांच्या वतीने असणार्‍या ‘श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी’ने मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरापासून सकाळी ८.३० वाजता नंदवाळकडे प्रस्थान केले. युवानेते ऋतुराज क्षीरसागर आणि ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव देशमुख यांच्या हस्ते आरती झाली. विश्व हिंदु परिषदेचे अधिवक्ता रणजितसिंह घाटगे यांच्या हस्ते अश्व पूजन झाले. कोरोनाच्या संसर्गामुळे ही दिंडी फुलांनी सजवलेल्या ‘के.एम्.टी.’बसमधून रवाना झाली.

वाटेत बिनखांबी गणेश मंदिर, खंडोबा देवालय, तसेच विविध ठिकाणी भाविकांनी पालखी घेऊन जाणार्‍या ‘के.एम्.टी.’वर फुले उधळली. ‘सायबा’ समूहाच्या वतीने वारकर्‍यांना चहा आणि फराळ देण्यात आला. सोहळ्यासाठी संस्थापक दीपक गौड, संतोष कुलकर्णी, पत्रकार राजेंद्र मकोटे, संभाजी पाटील, गंगाधर दास, ह.भ.प. एम्.पी. पाटील, दिंडीप्रमुख ह.भ.प. आनंदराव लाड महाराज आणि ह.भ.प. बाळासाहेब पवार यांनी परिश्रम घेतले.