वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करतांना तासगाव (जिल्हा सांगली) येथील साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आलेल्या अनुभूती
श्री. राजेंद्र माळीे
जिज्ञासूंना गुरुपौर्णिमेचा विषय उत्स्फूर्तपणे सांगता येऊन आनंद अनुभवणे : ‘या वेळी गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसारसेवा करतांना ‘समोरच्या व्यक्तीला काय सांगायचे ?’, हे देवच सुचवत होता. समाजातील धर्मप्रेमी ‘आमच्याकडे प्रतिवर्षी अर्पण न्यायला या’, असे उत्स्फूर्तपणे सांगत होते. तेव्हा ‘समाजाला साधनेची आवश्यकता समजली आहे आणि ते साधना ऐकून घेत आहेत’, हे माझ्या लक्षात आले. ‘गुरुकृपेने सेवेतील सर्व अडथळे दूर होतात आणि सेवेतील आनंद मिळवता येतो’, हे अनुभवायला आले.’
श्री. संतोष पाटील
१. सेवेची ओढ लागून ‘गुरुपौर्णिमा वर्षभर असायला हवी होती’, असे वाटणे : ‘पूर्वी दुचाकीवरून सेवा करतांना ‘माझा पेट्रोलवरील व्यय वाढत आहे आणि उत्पन्नाचे साधन अल्प आहे’, असे विचार मनात असायचे; परंतु या वर्षी गुरुपौर्णिमेची सेवा करतांना ‘धर्मकार्य आणि गुरुकार्य यांसाठी हे अर्पण होत आहे’, असा भाव होता. त्यामुळे मनात कोणतेही नकारात्मक विचार आले नाहीत. सेवा करतांना ‘सेवा संपू नये’, असे वाटायचे. सकाळी शेतातून घरी आल्यावर ‘कधी एकदा सेवेला जातो’, असे विचार मनात असायचे आणि बाहेर पडल्यावर आनंद मिळायचा. गुरुपौर्णिमा झाल्यावर मला वाटले, ‘गुरुपौर्णिमा वर्षभर असायला हवी होती.’
२. देवाने प्रतिमेच्या विचारांतून बाहेर काढणे आणि ‘देवच सर्व करवून घेणार आहे’, या विचाराने भाव जागृत होणे : मी साधनेत येण्यापूर्वी ‘एल्.आय.सी.’ची (जीवन विमा निगमची) ‘एजन्सी’ घेतली होती. तेव्हा ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूमुळे ‘लोकांकडे पैसे कसे मागायचे ?’, असे मला वाटायचे. नंतर मी तो व्यवसायच बंद केला. नंतर गुरुपौर्णिमेच्या सेवेनिमित्त सहसाधकांसमवेत गेल्यावर ‘अर्पण मागितल्यावर धर्मप्रेमी धर्मासाठी अर्पण देतात’, असे लक्षात आले. तेव्हा देवाने प्रतिमेच्या विचारांतून बाहेर काढले आणि ‘देवच सर्व करवून घेणार आहे’, या विचाराने माझा भाव जागृत झाला.’
सौ. मंगल पाटील
१. सेवेला जातांना ‘श्रीकृष्णाने माझे बोट धरले आहे आणि तोच मला घेऊन जात आहे’, असा भाव सेवेत अखंड टिकून रहात होता.
२. माझी समाजातील धर्मप्रेमींशी जवळीक वाढली होती. त्यामुळे धर्मप्रेमी मला बोलावून अर्पण देत होते.
३. साधकांची टिंगल करणार्या एका महिलेने अर्पणात दिलेले रिकामे पोते अर्पण आलेले धान्य ठेवण्यास उपयोगी होणे : सेवेला जातांना एक महिला आमची टिंगल करायची. ती प्रतिदिन आम्हाला सेवेला जातांना पहायची आणि ‘तुम्हाला पोतेभर धान्य देऊ का ?’, असे विचारायची. तेव्हा आम्ही सकारात्मक राहून तिला सांगितले, ‘‘तुम्ही जे काही द्याल, ते गुरुकार्यासाठी घेऊ.’’ त्या महिलेने आम्हाला रिकामे पोते दिले, तरी आम्ही कृतज्ञच होतो; कारण इतरांनी दिलेले धान्य ठेवण्यासाठी त्याचा उपयोग झाला.’
सौ. कांचन पाटील
गुरुपौर्णिमेच्या सेवेला प्रथमच जाऊन विषय सांगितल्यावर एका महिलेने ‘तुम्ही विषय चांगला सांगितला’, असे कौतुक करणे : ‘मी या वर्षी प्रथमच गुरुपौर्णिमेच्या सेवेला गेले होते. मला सकाळी उठल्यापासून सेवेची ओढ लागायची आणि ‘घरातील कामे कधी पूर्ण व्हायची ?’, ते माझ्या लक्षातही यायचे नाही. मला सेवेतून पुष्कळ आनंद मिळाला. प्रसाराला गेल्यावर मीही विषय सांगू लागले. एकदा मी विषय सांगत असतांना एका धर्माभिमानी महिलेने माझे कौतुक केले आणि ‘तुम्ही विषय चांगला सांगितला’, असे सांगितले.’
श्री. भगवान गुरव
‘देवच सेवेला घेऊन जात आहे’, असे वाटून ‘गुरुपौर्णिमेचे दिवस संपूच नयेत’, असे वाटणे : ‘मी एक वर्षापासून साधनेत आहे. मला गेल्या वर्षी अर्पण मागायला नको वाटत होते; म्हणून या वर्षी मी ‘एकच अर्पण पुस्तक संपवायचे आणि पुन्हा अर्पण मागायला जायचे नाही’, असे ठरवले होते; परंतु मी शेतातून काम करून घरी आल्यावर ‘कधी एकदा सेवेला जातो’, असे मला व्हायचे. माझी सेवेची आंतरिक ओढ वाढली आणि ‘देवच मला सेवेला घेऊन जात आहे’, असे वाटू लागले. प्रथम माझी स्थिती नकारात्मक होती; पण नंतर सेवा करतांना माझी भावजागृती होऊ लागली. ‘मी गुरूंची आज्ञा पाळली, तरच माझा उद्धार आणि प्रगती होणार आहे’, हे कळल्यावर ‘गुरुपौर्णिमेचे दिवस संपूच नयेत’, असे मला वाटू लागले. आम्ही वेगवेगळ्या गावांत अर्पणाच्या सेवेला जात होतो. सेवेला जातांना आणि सेवा पूर्ण झाल्यावर ग्रामदेवता, इष्टदेवता, कुलदेवता आणि श्रीकृष्ण यांना सामूहिक प्रार्थना होत होती. त्यामुळे सेवेत कोणतेही अडथळे आले नाहीत.’
सौ. विमल घाटगे
१. ‘पंढरीचा वारकरी असून देवासाठी भिकारी झालो आहे’, असा भाव ठेवणे : ‘सेवा करणे हे साधकाचे कर्तव्य आहे’, असा भाव ठेवून अर्पण मागतांना ‘मी पंढरीची वारकरी आहे आणि देवासाठी भिकारी झाले आहे’, असा भाव माझ्याकडून ठेवला गेला होता. ‘आपल्याला देवासाठी मागायला काहीच अडचण नाही’, असा विचार केल्यावर माझा भाव जागृत झाला आणि समाजातील सर्वांनी आम्हाला अर्पण दिले.
२. सांधेदुखी न्यून होणे : गुरुपौर्णिमेच्या आधी सांधेदुखीमुळे मला बसतांना-उठतांना त्रास होत होता; परंतु सेवेमुळे माझा सांधेदुखीचा त्रास न्यून झाला आणि शरिराची हालचाल व्यवस्थित होऊ लागली.’
(जुलै २०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |