ईदनिमित्त नियमित १ सहस्र जनावरे कापण्याची अनुमती मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली !
मुंबई – देवनार येथील पशूवधगृहामध्ये ईदनिमित्ताने २१ ते २३ जुलै या कालावधीत नियमित ३०० मोठी जनावरे कापण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अनुमती दिली आहे. ही संख्या वाढवून नियमित १ सहस्र जनावरे कापण्यासाठी अनुमती मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. या सुनावणीच्या वेळी ‘मानवी आरोग्यापेक्षा धर्म मोठा नाही’, असे नमूद करत १ सहस्र जनावरे कापण्याची मागणी न्यायालयाने अमान्य केली आहे.
‘महानगरपालिकेने निश्चित केलेली संख्या योग्य आहे. अशा प्रकारे सवलत देणे सर्वसामान्यांच्या हिताचे ठरणार नाही. अन्यथा प्रशासन कुणावरही नियंत्रण ठेवू शकणार नाही’, असे न्यायालयाने म्हटले आहे. २० जुलै या दिवशी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी झाली.