नाणार येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्प जनतेची लूट आणि कोकण उद्ध्वस्त करणारा असेल ! – प्रा. महेंद्र नाटेकर, अध्यक्ष, स्वतंत्र कोकण संघटना
कणकवली – रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे होऊ घातलेल्या विनाशकारी तेल शुद्धीकरण प्रकल्पाला (रिफायनरी) शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प आपल्या गावात यावा, यासाठी अनेक ग्रामपंचायती, तसेच नगरपालिका, तसे ठराव करून शासनाकडे मागणी करत आहेत. रत्नागिरीमध्ये हा प्रकल्प होत नसेल, तर तो रायगड किंवा ठाणे या जिल्ह्यांत व्हावा, अशीही काही राजकीय पक्ष मागणी करत आहेत. या प्रकल्पामुळे सर्व कोकणच उद्ध्वस्त होणार असल्याने त्यांच्या या मागण्या अज्ञानमूलक आणि हास्यास्पद आहेत, असे मत स्वतंत्र कोकण संघटनेचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी व्यक्त केले आहे. स्वतंत्र कोकण संघटनेची बैठक येथील सांस्कृतिक भवनमध्ये झाली.
या वेळी प्रा. नाटेकर पुढे म्हणाले की,
१. आखाती देशातून सुमारे ६०० मेट्रिक टन कच्चे तेल आयात करून त्याच्यावर प्रक्रिया करून त्यातून पेट्रोल, डिझेल आणि विमानाचे इंधन सिद्ध केले जाणार आहे. वार्षिक ६ कोटी टन उत्पादन असणारी जगातील ही सर्वांत मोठी ‘रिफायनरी’ असेल.
२. प्रकल्पासाठी औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारून प्रतिदिन १८ सहस्र टन कोळसा जाळून तेल शुद्धीकरण केले जाईल. त्यातून ६०० टन राख निर्माण होऊन ती सर्वत्र पसरल्याने प्रचंड प्रदूषण वाढणार आहे. याचसमवेत प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात ‘कार्बनडायऑक्साइड’ आणि ‘नायट्रोजन ऑक्साइड’ हे वायू बाहेर पडून ते संपूर्ण कोकण व्यापून टाकतील.
३. ‘रिफायनरी’मुळे होणार्या वायूप्रदूषणामुळे सजीव सृष्टीवर घातक परिणाम होतात, हे माहूल (मुंबई), मथुरा, कोची, विशाखापट्टणम्, मंगळुरू आदी ठिकाणी असलेल्या ‘रिफायनरी’च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
४. या अहवालानुसार कर्करोग, हृदयविकार, मज्जा संस्थांवर घातक परिणाम, दमा, श्वसनाचे त्रास होऊन संपूर्ण मानवी जीवनच उद्ध्वस्त होते हे सिद्ध झाले आहे. माहूल, मथुरा इत्यादी छोट्या ‘रिफायनरी’मधून एवढा विनाश होतो, तर जगातील सर्वांत मोठी ‘रिफायनरी’ नाणार येथे उभारल्यास त्यामधून किती विनाश होईल, याची कल्पनाही करवत नाही.
५. विनाशकारी रिफायनरी प्रकल्प कुणालाच नको असतो. त्याला कुणीही भूमी देत नाही. त्यामुळे व्यापारी आणि राजकारणी यांनी ‘रिफायनरी’ प्रकल्प नाणार येथे होणार हे केंद्रशासनाकडून गुप्तरूपाने समजल्याने नाणार येथील शेकडो एकर भूमी कवडीमोलाने खरेदी केली.
६. जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पासाठी कवडीमोलाने खरेदी केलेली भूमी अखेर दीड कोटी रुपये एकर या भावाने विकली गेली. हे उदाहरण राजकारण्यांसमोर होते. त्यामुळे त्यांनी गोरगरिबांची शेकडो एकर भूमी खरेदी केली. त्यातून त्यांना कोट्यवधी रुपयांचा लाभ होईल, असा त्यांचा अंदाज आहे.
७. नाणार येथील तरुणांना हाताशी धरून ‘नाणार येथेच रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे’, यासाठी आंदोलने केली जात आहेत. शासनावर विरोधी पक्ष दबाव आणत आहेत. नाणार येथील प्रकल्प झाल्यास १ लाख नोकर्या उपलब्ध होतील, अशी दिशाभूल करून लोकांना भडकवले जात आहे. कोकणातील शासकीय नोकर्यांपैकी ५ टक्के नोकर्याही कोकणी लोकांना मिळत नाहीत.
८. ‘कोकणात रिफायनरी प्रकल्प होत नसेल, तर आम्ही तो विदर्भ किंवा मराठवाडा येथे नेतो’, अशा धमक्या विरोधी पक्ष देत आहेत. हा केवळ दिखावा आहे. विदर्भात प्रकल्प नेत असतील, तर चांगलेच आहे; मात्र असे म्हणण्यामागे राजकीय खेळी ही आहे की, ‘येथील जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होईल की, ‘विदर्भात प्रकल्प चालतो, मग कोकणात का नको ?’ याचाच लाभ उठवून प्रकल्पाला समर्थन मिळवायचे आहे.