सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हानी !
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले, तर शेतीबागायती पाण्याखाली गेली आहे. काही ठिकाणी घरे, गोठे यांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी रस्ते खचले, तर काही ठिकाणी खराब झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
१. मालवण तालुक्यातील चिंदर, लब्देवाडी, तेरई आणि भगवंत गड या परिसरांतील घरांना पाण्याचा वेढा पडला आहे. भातशेतीही पाण्याखाली गेल्याने शेतकरीही चिंतेत पडला आहे. गडनदीला पूर आल्याने खोतजुवा आणि मसुरकर जुवा या बेटांवरील ग्रामस्थांच्या घरांना पाण्याचा वेढा पडला आहे. मुसळधार पावसामुळे मसुरे गावचा संपर्क तुटला आहे. पुराचे पाणी वाढल्याने मळावाडी, बांदिवडे येथील ग्रामस्थांनी त्यांची गुरे, तसेच वाहने बांदिवडे पुलाच्या जोडरस्त्यावर आणून ठेवली आहेत.
२. आचरा पारवाडी, कालावल खाडीला पूर आल्याने खाडीकिनार्याच्या लगतच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. १८ जुलैला पडलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामस्थांनी संपूर्ण रात्र भीतीखाली जागून काढली. येथे पाण्याचा निचरा होत नसल्याने भातशेतीत पाणी घुसले आहे.
३. वैभववाडी तालुक्यात कुसूर, खडकवाडी येथे रस्ता खचला आहे. त्यामुळे या मार्गावर सध्या एकेरी वाहतूक चालू आहे.
४. कणकवली तालुक्यात वागदे-कसवण-आंब्रड रस्ता मांगरवाडी येथे खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. बिडवाडी मार्गे सांडवे या गावी जाणार्या मार्गावर मोरीवर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली. त्यामुळे येथील बिडवाडी गावच्या सांडवे, निरोम, बुधवळे, खुडी या वाड्यांचा संपर्क सुटला आहे. कणकवली शहरात सलग ३ वर्षे आणि यावर्षी दुसर्या वेळी येथील रामेश्वर प्लाझा या इमारतीत पाणी घुसले.
५. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथे काही ठिकाणी वस्तीमध्ये पाणी घुसले आहे.
६. देवगड तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. फणसगाव चव्हाटा ते कोर्ले ब्रह्मदेव मंदिर रस्त्यावर पाणी आल्याने येथील ८ वाड्यांचा संपर्क तुटला आहे.
यावर्षीही श्री गणेशभक्तांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागणार ?
गेले ८ दिवस पडत असलेल्या पावसात जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी रस्ते खचलेही आहेत. गणेशोत्सव हा कोकणातील मोठा सण असून यासाठी लाखो गणेशभक्त कोकणात येत असतात. त्यामुळे यावर्षीही श्री गणेशभक्तांवर खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ येणार आहे, असे चित्र दिसत आहे.