आपत्कालीन स्थितीत (कोरोनाच्या पार्श्वभूमीवर) धर्मशास्त्रानुसार गुरुपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत !
‘२३ जुलै २०२१ या दिवशी व्यासपौर्णिमा, म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे. प्रतिवर्षी अनेक जण एकत्रित येऊन त्यांच्या संप्रदायानुसार गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करतात; परंतु या वर्षी देखील कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याने आपण एकत्रित येऊन गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करू शकत नाही. तरी याविषयी पुढीलप्रमाणे पूजन करू शकतो.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वजण एकत्र येऊन आपल्या गुरूंचे समारंभपूर्वक पूजन करतात. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांनुसार एकत्र येऊन गुरुपूजन करणे या वर्षी शक्य नाही. तरी सर्वांनी घरी राहूनच श्री गुरूंची प्रतिमा, मूर्ती किंवा पादुका यांचे पुढीलप्रमाणे पूजन करावे. असे केल्यानेही या दिवशी वातावरणात सहस्र पटींनी कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा लाभ आपल्याला करून घेता येईल.
अ. या वर्षी पौर्णिमा ही तिथी २३ जुलै या दिवशी सकाळी १०.४४ वाजता आरंभ होत आहे. तरी यानंतर सूर्यास्तापर्यंत म्हणजे सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत पूजन करावे.
आ. पूजनाच्या वेळी श्रीगुरूंची प्रतिमा, मूर्ती किंवा पादुका यांना गंध, पुष्प, धूप, दीप आदि उपचार अर्पण करावेत. यानंतर घरीच बनवलेल्या गोड पदार्थाचा अथवा दूध-साखरेचा नैवेद्य समर्पण करावा.
इ. श्रीगुरूंची भावपूर्ण आरती करून पूजनाची सांगता करावी.
ई. ज्यांना साहित्याच्या अभावामुळे सर्व उपचार अर्पण करणे शक्य नाही, त्यांनी शक्य होईल तितके उपचार अर्पण करून श्रीगुरूंचे पूजन करावे. असेही करणे ज्यांना शक्य होणार नाही, त्यांनी श्री गुरूंची मानसपूजा करावी.
उ. गुरुपौर्णिमेचा संपूर्ण दिवस गुरूंच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करावा. यासाठी गुरूंच्या लीलांचे स्मरण करणे, गुरूंनी दिलेल्या मंत्राचा अधिकाधिक जप करणे आदि करू शकतो.’
– सनातन पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.७.२०२१)