देवता आणि संत यांच्याप्रती भोळा भाव असणार्या अन् भाववृद्धीचे प्रयत्न करून तीव्र आध्यात्मिक त्रासांवर मात करणार्या रामनाथी आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल
आषाढ शुक्ल पक्ष एकादशी, म्हणजे देवशयनी एकादशी (२०.७.२०२१) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्या सौ. वैशाली मुद्गल यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या दोन्ही मुलींच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सौ. वैशाली मुद्गल यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
कु. गौरी मुद्गल (थोरली मुलगी, वय २० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. मुलीला तत्त्वनिष्ठतेने साधनेत साहाय्य करणे
‘आई माझी आध्यात्मिक मैत्रीण आहे. ती मला ‘आध्यात्मिक मैत्रीण’ आणि ‘आई’ म्हणून तत्त्वनिष्ठतेने साहाय्य करते. माझ्याकडून काही चुका झाल्यानंतर ती ‘तशा चुका पुन्हा होऊ नयेत’, यासाठी मला साधनेविषयी योग्य दृष्टीकोन सांगते आणि मला कोणत्याही प्रसंगातून सहजतेने बाहेर काढते.
२. स्वतःची चूक झाल्यावर मुलीची क्षमा मागणे
आईला तिच्याकडून झालेल्या चुकांविषयी खंत वाटते. तिच्याकडून माझ्याशी संबंधित चूक झाली, तरी ती नम्रपणे माझी क्षमा मागते. ‘चुका स्वीकारून नम्रपणे क्षमायाचना कशी करावी ?’, हे मला आईकडून शिकायला मिळाले.
३. भावपूर्ण सेवा करणे
आई धान्य निवडण्याची सेवा करतांना सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी रचलेली भजने म्हणते आणि नेहमी परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण करते.’
कु. अमृता मुद्गल (धाकटी मुलगी, वय १९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. मायेपासून अलिप्त होणे
‘पूर्वी आई माझ्याकडून आणि माझी मोठी बहीण कु. गौरी हिच्याकडून पुष्कळ अपेक्षा करत असे. आता तिच्या अपेक्षांचे प्रमाण न्यून झाले आहे. आमची आठवण आल्यावर ती भक्तीभावाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण करते. काही दिवसांपासून ‘ती मायेकडून देवाच्या दिशेने वाटचाल करत आहे’, असे मला वाटते.
२. ती तिला होणार्या शारीरिक त्रासांविषयी तक्रार करत नाही.
३. प्रतिदिन परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीकृष्ण, राधा आणि संत मीराबाई यांच्या चरणी आत्मनिवेदन करणे
आईने खोलीत परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र, श्रीकृष्णाची मूर्ती, तसेच राधा अन् संत मीराबाई यांची चित्रे ठेवली आहेत. आई त्यांच्यासमोर बसून प्रतिदिन सकाळ-संध्याकाळ त्यांना ‘दिवसभरातील सुख-दुःखाचे सर्व प्रसंग, स्वतःकडून व्यष्टी साधनेसाठी झालेले प्रयत्न आणि सेवा करतांना झालेल्या चुका’, यांविषयी आत्मनिवेदन करते अन् स्वतःकडून झालेल्या चुकांसाठी क्षमायाचनाही करते.
(जुलै २०२१)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |