पाकला झेपत नसल्यास आतंकवाद्यांना नष्ट करण्यासाठी चिनी सैनिकांना तेथे पाठवू ! – चीनची पाकला चेतावणी
पंतप्रधान इम्रान खान यांचे कारवाई करण्याचे आश्वासन !
कालपर्यंत पाकमधील आतंकवाद्यांना संयुक्त राष्ट्रांमध्ये पाठीशी घालणार्या चीनलाच आता पाकमधील आतंकवादी डोळे दाखवू लागल्याने चीनला आता खरी स्थिती लक्षात आली असेल, अशी अपेक्षा !
बीजिंग (चीन) – पाकिस्तानला आतंकवाद्यांचा बंदोबस्त करणे झेपत नसेल, तर चिनी सैनिकांना क्षेपणास्त्रांसह पाकमध्ये पाठवले जाऊ शकते, अशा शब्दांत चीनने पाकला चेतावणी दिली. यावर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘दोषींना सोडले जाणार नाही’, असे सांगत चीनला आश्वस्त केले. पाकमध्ये आतंकवाद्यांनी चिनी अभियंते आणि कामगार यांना घेऊन जाणार्या बसला लक्ष्य करण्यासाठी केलेल्या बॉम्बस्फोटात चीनचे ९ अभियंते आणि कामगार ठार झाले होते. त्यावरून चीनने ही चेतावणी दिली आहे.
चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’च्या संपादकांनी या आक्रमणावरून ट्वीट करून म्हटले आहे की, या आक्रमणामध्ये सहभागी आतंकवादी अद्याप समोर आलेले नाहीत; मात्र त्यांना शोधून नष्ट केले पाहिजे. जर पाकमध्ये क्षमता नसेल, तर त्याच्या सहमतीने चीन क्षेपणास्त्रांसह विशेष पथकाला तेथे पाठवू शकतो.