परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे आणि मुलींना साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे नागपूर येथील श्री. श्रीकांत रामचंद्र पाध्ये (वय ७० वर्षे) !
आषाढ शुक्ल पक्ष एकादशी, म्हणजे देवशयनी एकादशी (२०.७.२०२१) या दिवशी नागपूर येथील सनातन संस्थेचे साधक श्री. श्रीकांत रामचंद्र पाध्ये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या दोन्ही मुली आणि धाकटे जावई यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्री. श्रीकांत रामचंद्र पाध्ये यांना ७० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
सौ. योगेश्री चिंतामणि घोळे (थोरली मुलगी), पुणे
१. स्वावलंबी
‘वयाच्या ७० व्या वर्षीही बाबा स्वतःची कामे स्वतःच करतात.
२. सातत्य असणे
बाबा प्रतिदिन पहाटे ४ वाजता उठून नामजप करतात. त्यांचा हा दिनक्रम गेली कित्येक वर्षे नियमित चालू आहे.
३. प्रामाणिकपणा
पूर्वी नोकरी करतांना त्यांना लेखा परीक्षणासाठी (‘ऑडिट’साठी) अनेकदा दौर्यावर जावे लागत असे. तिथे काम करतांना बाबांना इतरांच्या लक्षात आलेल्या त्रुटी लपवण्यासाठी पुष्कळदा काही जणांनी त्यांना पैशांचे आमीष दाखवले; पण ते कधीच त्या आमिषांना भुलले नाहीत. त्यामुळे त्यांचे वरिष्ठ, मित्र परिवार आणि सहकारी यांना त्यांच्याविषयी आदर होता.
४. आई-वडिलांची सेवा मनोभावे करणे
माझी आजी शेवटची ३ – ४ वर्षे अंथरुणावरच होती. त्यांतील २ वर्षे ती आमच्याकडे होती. ती भ्रमिष्टासारखी वागायची, तरी बाबा पुष्कळ संयमाने तिची सेवा करायचे. ते प्रतिदिन सकाळी कार्यालयात जाण्यापूर्वी आजीला अंघोळ घालत आणि तिची सर्व सेवा करत. आजोबा शेवटच्या काळात रुग्णाईत असतांना बाबांनी एक मास सुटी घेतली आणि आजोबांचीही सेवा मनापासून केली.
५. सेवेची तळमळ
वर्ष १९९८ मध्ये आई-बाबांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. त्या वेळी आई-बाबा अध्यात्मप्रसाराची सेवा करण्यासाठी बाहेरगावी जायचे. ते प्रसारासाठी अमरावती आणि चंद्रपूर येथे काही मास रहात असत. तेव्हा दुर्ग (छत्तीसगड) येथे त्यांनी सनातन संस्थेचे कार्य शून्यातून चालू केले. पूर्वी दुर्ग येथे बरेच मास त्यांच्या समवेत सेवेसाठी कुणीही साधक नव्हते; पण आई-बाबा निष्ठेने ‘अध्यात्मप्रसार करणे, सत्संगाचे आयोजन करून तो घेणे, ग्रंथप्रदर्शन लावणे’ इत्यादी सेवा करत असत.
६. साधनेचे गांभीर्य असणे
साधकांच्या लक्षात आलेल्या चुका बाबा मोकळेपणाने सांगतात, तसेच ते ‘त्या चुकांवर स्वतः साधनेच्या दृष्टीने कसा दृष्टीकोन ठेवायचा ?’, याविषयी सनातनचे संत पू. अशोक पात्रीकरकाका यांचे मार्गदर्शन घेतात आणि त्यानुसार कृती करतात.
७. प.पू. गुरुमाऊलीच्या कृपेने वडिलांना सनातनच्या संतांचे मार्गदर्शन मिळणे आणि त्यानुसार प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या मनातील भूतकाळासंबंधी विचार न्यून होणे
पूर्वी भूतकाळातील प्रसंग आठवून बाबांना पुष्कळ मानसिक त्रास होत असे. त्या विचारांनी त्यांना एवढे त्रस्त केले होते की, त्यांची अवस्था फारच गंभीर झाली होती. त्या वेळी बाबांनी पू. पात्रीकरकाकांचे मार्गदर्शन घेतले आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले मंत्रजपादी उपायही नियमित केले. तेव्हापासून त्यांचे भूतकाळात अडकणे न्यून झाले. ‘प.पू. गुरुमाऊलीनेच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच) त्यांना या त्रासांतून बाहेर काढले’, यासाठी आम्ही सर्व जण प.पू. गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.
८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव
८ अ. मुलीला एकाच वेळी नवीन नोकरी आणि रामनाथी आश्रमात सेवेची संधी मिळाल्यावर बाबांनी तिला कृतज्ञताभावाने ‘गुरुसेवेच्या संधीचे सोने कर’, असे सांगणे : माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर मला प्रथमच नोकरी मिळाली होती. त्याच वेळी मला रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात सेवेला जाण्याची संधी मिळाली. मी याविषयी बाबांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘या संधीचे सोने कर ! श्री गुरूंनी तुला बोलावले आहे, तर तू जायला पाहिजे.’’ हे सांगतांना त्यांचे डोळे भावाश्रूंनी भरून आले. त्या वेळी ‘असे साधक आई-वडील मिळाले’, यासाठी मला गुरूंप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. आम्हा कुटुंबियांना बाबा वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांच्या मायेच्या सावलीत आम्हाला आनंद होतो. ते आमचे आधारस्तंभ आहेत.
८ आ. वडिलांनी ‘तू घरी न येता आश्रमातच दीपावली साजरी कर’, असे मुलीला सांगणे आणि याविषयी कळल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘असे आई-वडील मिळायला मोठे भाग्य लागते’, असे सांगणे : एकदा दिवाळीला आश्रमातील काही साधक आपापल्या घरी जात होते. तेव्हा मलाही ‘घरी जावे’, असे वाटले. मी त्याविषयी बोलण्यासाठी घरी भ्रमणभाष केला. तेव्हा बाबा मला म्हणाले, ‘‘तू मुळीच घरी येऊ नकोस. ‘गुरूंच्या घरी दीपावली साजरी करणे’, ही पुष्कळ भाग्याची गोष्ट आहे. तू घरी आलीस, तर आम्हाला वाईट वाटेल. तू घरी येण्याचा विचार मनातून काढून टाक.’’ तेव्हा मी घरी जाण्याचा निर्णय पालटला. याविषयी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कळवल्यावर त्यांनाही पुष्कळ आनंद झाला. त्यांनी सांगितले, ‘‘तू एक टप्पा पार केलास. चांगले वाटले. असे आई-वडील मिळायलाही मोठे भाग्य लागते.’’
८ इ. कृतज्ञताभाव : एकदा मी बाबांना विचारले, ‘‘तुम्हाला काही अनुभूती आली असेल, तर सांगा.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘मी अजून जिवंत आहे अन् भगवंताचे नाम घेऊ शकतो. माझ्या मनात प.पू. गुरुमाऊलीप्रती श्रद्धा आहे. हीच माझ्यासाठी अनुभूती आहे.’’ आजही सनातन संस्थेचे जुने साधक आई-बाबांशी जोडलेले आहेत. आता आई-बाबा वयोमानानुसार शारीरिक सेवा करू शकत नाही, तरीही काही साधक त्यांना स्वतःहून भेटायला येतात. तेव्हा बाबांचा प.पू. गुरुमाऊलीप्रतीचा कृतज्ञताभाव जागृत होतो.
९. वडिलांमध्ये जाणवलेला पालट
पूर्वीपेक्षा बाबांचा तोंडवळा पुष्कळ शांत आणि प्रसन्न जाणवतो.
१०. प्रार्थना
‘हे गुरुमाऊली, ‘तुमच्याच कृपेमुळे आम्हाला या जन्मात साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे आई-वडील मिळाले आहेत. त्यांच्यातील गुण आम्हाला आत्मसात करता येऊ देत आणि त्यांना आपल्या चरणी येण्याचा लागलेला ध्यास लवकर पूर्ण होऊ दे’, हीच श्री चरणी प्रार्थना आहे.’
श्री. अंकुश देशपांडे आणि सौ. शुचिता देशपांडे (धाकटे जावई आणि धाकटी मुलगी), नागपूर
१. वेळेचे पालन करणे
‘बाबा कोणत्याही ठिकाणी नेहमी नियोजित वेळेच्या १० मिनिटे आधी पोचतात. त्यांना कोणत्याही कार्यक्रमाला उशिरा जाणे मुळीच आवडत नाही.
२. साधनेची तळमळ
बाबांनी १४ वर्षांपूर्वी अध्यात्मप्रसाराची सेवा करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.
३. वडिलांमध्ये जाणवलेला पालट
पूर्वी बाबांचा स्वभाव पुष्कळ तापट होता. त्यांना त्यांची चूक सांगितल्यावर ते ती मान्य करत नसत. आता त्यांना चूक सांगितल्यास ते ऐकून घेण्याचा प्रयत्न करतात.
४. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘हे श्रीकृष्णा आणि हे परात्पर गुरु डॉक्टर, ‘तुम्ही आम्हाला इतके चांगले साधक वडील दिले आहेत. त्यांच्यामुळेच तुम्ही आम्हाला भेटलात. भगवंता, ही भावना आजपर्यंत कधी व्यक्त झाली नाही; परंतु ‘आज ती व्यक्त व्हावी’, असे वाटत आहे. आम्हाला वडिलांनी पुष्कळ काही दिले. आम्ही त्यांचे ऋण कधीच फेडू शकत नाही. हे भगवंता, ‘बाबांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती करवून घे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
(१.७.२०२१)