पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित !
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ
|
नवी देहली – १९ जुलैपासून चालू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सकाळी प्रारंभ होताच विरोधी पक्षांनी महागाई, शेतकरी आंदोलन, ‘पेगासस’ आदी विविध विषयांवरून गदारोळ घातल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. १३ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात अर्थविषयक २ विधेयकांसह ३१ विधेयके मांडली जाऊ शकतात.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात विरोधकांचा जोरदार गदारोळ, लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब.@DDNewslive @DDNewsHindi #ParliamentMonsoonSession pic.twitter.com/6h8a79dFO4
— सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) July 19, 2021
१. सकाळी लोकसभेचे कामकाज चालू झाल्यानंतर नवीन सदस्यांचा शपथविधी पार पडला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन मंत्र्यांचा परिचय करून देण्यासाठी उभे रहाताच विरोधकांनी गदारोळ घालण्यास चालू केले. विरोधकांच्या घोषणाबाजीतच पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या नवीन मंत्र्यांचा परिचय दिला.
२. या वेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी महागाई, शेतकरी आंदोलन, पेगासस यांसह विविध विषयांवरून घोषणाबाजी चालू केली. या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘मला तर वाटत होते आज सभागृहात उत्साहाचे वातावरण असेल; कारण मोठ्या संख्येने महिला, दलित, आदिवासी आणि शेतकरी कुटुंबांतील खासदार यांना मंत्री करण्यात आले आहे. त्यांचा परिचय करून देतांना मला आनंद होत आहे; मात्र महिला, दलित, ओबीसी आणि शेतकरी पुत्र यांना मंत्री केलेले बहुतेकांना पहावलेले दिसत नाही. ही मंडळी त्यांचा परिचयसुद्धा देऊ देत नाहीत.’’
३. या वेळी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव पेगासस संबंधातील आरोपांवर उत्तर देत असतांना विरोधी पक्षांनी गदारोळात वाढ केल्याने लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले.
‘पेगासस’ प्रकरण काय आहे ?‘द गार्डियन’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या आंतरराष्ट्रीय दैनिकांनी भारतातील अनेक पत्रकार, केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि प्रशासकीय अधिकारी यांचे दूरभाष गुपचूप ध्वनीमुद्रीत (टॅप) करून हेरगिरी करण्यात आल्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. इस्रायलस्थित एका आस्थापनाच्या माध्यमातून ‘पेगासस’ नावाच्या विशेष संगणकीय प्रणालीद्वारे हेरगिरी केली जात असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. |
‘पेगासस’विषयीचा अहवाल चुकीचा ! – केंद्रशासन
माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव सभागृहात म्हणाले, ‘‘संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच असे अहवाल प्रकाशित होतात हा काही योगायोग असू शकत नाही. दूरभाष क्रमांकांच्या माध्यमातून डेटा हॅक झाल्याचे संबंधित अहवालातून ठामपणे सांगण्यात आलेले नाही. वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ‘पाळत ठेवली गेली आहे’ हे सिद्ध होऊ शकत नाही. इस्रायलचे आस्थापन ‘एन्.एस्.ओ.’कडूनही ‘संबंधित अहवाल धादांत खोटा आणि तथ्यहीन आहे’, असे सांगण्यात आले आहे. दूरभाष क्रमांकांशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींचे भ्रमणभाष संच ‘पेगासस’ या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचा कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही. त्यामुळे देण्यात आलेले दूरभाष क्रमांक खरेच हॅक झाले होते का ? हे सिद्ध होत नाही. आपल्या देशाच्या प्रबळ संस्थांमध्ये हेरगिरी करणे किंवा अवैध पद्धतीने पाळत ठेवणे अजिबात शक्य नाही.’’
खासदारांनी कठीणातील कठीण प्रश्न विचारावेत ! – पंतप्रधान मोदी यांचे आवाहन
अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी संसद परिसरात प्रसारमाध्यमांना संबोधित करतांना म्हटले की, मी सर्व खासदारांना विनंती करतो की, त्यांनी कठीणातील कठीण प्रश्न विचारावेत. त्यांनी कितीही वेळा प्रश्न विचारले, तरी चालतील; पण शांतता बाळगून शासनालाही बोलण्याची संधी द्यावी. अधिवेशनात परिणामकारक चर्चा व्हायला हवी. यातून जनतेला माहिती मिळते. देशाच्या प्रगतीचा वेग वाढतो. देशातील जनतेला उत्तर हवे आहे आणि ती देण्यास शासन सिद्ध आहे.
‘बाहु’बली व्हा !
पंतप्रधान मोदी यांनी या वेळी लोकांना लसीकरणाचे आवाहन करतांना म्हटले की, सर्वांनी कोरोना लसीचा एक डोस घेतला असेल, अशी मी अपेक्षा बाळगतो. बाह्यांवर जेव्हा लस टोचली जाते, तेव्हा तुम्ही ‘बाहु’बली होता. कोरोना काळात बाहुबली होण्याची हीच एक पद्धत आहे. कोरोनाच्या विरोधात आतापर्यंत ४० कोटी लोक ‘बाहुबली’ झाले आहेत. पुढेसुद्धा हेच काम झपाट्याने व्हायला हवे.